jat news

Table of Contents

jat news: जत तालुक्यात ‘देवभूमी जत’ नामकरण आणि विकासकामे हे प्रमुख चर्चेचे विषय ठरले आहेत. नामकरणाचे गॅझेट लवकरच प्रसिद्ध होईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले असून, म्हैसाळ योजना, भुयारी गटार, क्रीडा संकुल, एमआयडीसी आणि विमानतळासह विविध विकासकामांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, नामकरणाऐवजी पाणी, रस्ते, रोजगार व मूलभूत सुविधांना प्राधान्य द्यावे, अशी विरोधकांची भूमिका आहे. नामकरणाविरोधात सर्वपक्षीय मोर्चाही काढण्यात आला.

जत वनपरिक्षेत्रातील प्रस्तावित प्राणिसंग्रहालयाचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान, वाषाण येथे घरात घुसून ७० वर्षीय वृद्ध महिलेवर हल्ला करून सुमारे दीड लाखांचे दागिने लुटल्याने परिसरात चिंता निर्माण झाली आहे.

jat news

जतच्या विकासाला वेग; ‘देवभूमी जत’ नामकरणाचे गॅझेट लवकरच

जत : जत jat तालुक्याच्या विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असून, ‘देवभूमी जत’ नामकरणाचे गॅझेट लवकरच प्रसिद्ध होईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. जत नगरपरिषदेच्या नूतन इमारतीसह विविध विकासकामांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मागणीनुसार जतच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी गावनिहाय विकास आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने कामे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

हेदेखील वाचा: Health Hazards from Adulterated Milk/ भेसळयुक्त दुधामुळे आरोग्य धोक्यात: आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम आणि त्यावरील उपाय; जाणून घ्या 6 महत्त्वाचे मुद्दे

आमदार पडळकर यांनी जतची दुष्काळी ओळख कायमची पुसण्याचा निर्धार व्यक्त केला. म्हैसाळ योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले असून, विस्तारित योजनेसाठी नाबार्डकडून ९१९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. क्रीडा संकुलासाठी ७२ कोटींचा आराखडा, शहरासाठी सुमारे १०० कोटींची भुयारी गटार योजना आणि रात्रीच्या वस्त्यांसाठी वीजपुरवठ्यासाठी २० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

उमदी एमआयडीसीसह केंद्राचा मोठा प्रकल्प जतला मिळावा, यासाठीही पाठपुरावा सुरू असल्याचे पडळकर यांनी सांगितले. जत-कवठेमहांकाळ सीमेवर विमानतळ उभारण्यासाठी ३०० एकर जागा उपलब्ध करून देण्याची तयारी असून, केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात येत आहे.

या वेळी जत नगरपरिषदेची १० कोटींची नूतन इमारत, १५ कोटींचे आरटीओ स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र, एक कोटींचे नमो उद्यान व अभ्यासिका आणि ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या कामांचा प्रारंभ करण्यात आला.

दरम्यान, ‘देवभूमी जत’ नामकरणामुळे विकासाचे प्रश्न सुटणार आहेत का, असा सवाल आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केला. नामांतरापेक्षा रस्ते, पाणी, आरोग्य आणि रखडलेली विकासकामे यांना निधी देण्यावर सरकारने भर द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

वाषाणमध्ये वृद्धेवर हल्ला; दीड लाखांचे दागिने लुटले

जत : वाषाण-बेळुंखी सरहद्दीवरील माळी वस्तीमध्ये घरात घुसलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी ७० वर्षीय वृद्ध महिलेवर हल्ला करून सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी रात्री घडली.

तानुबाई दाजी शेळके यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन अनोळखी इसमांनी घरात प्रवेश करून दागिने काढून देण्याची धमकी देत त्यांना मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या कानाला दुखापत झाली असून एक दात पडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

चोरट्यांनी सोन्याची बोरमाळ, मण्यांची टिक, कर्णफुले, बेल-बुगडी आदी दागिने असा सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात दोन अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जतच्या प्रस्तावित प्राणिसंग्रहालयाचा मार्ग मोकळा; केंद्राकडे प्रस्ताव

jat news

जत : जत वनपरिक्षेत्रातील प्रस्तावित प्राणिसंग्रहालयासाठी महाराष्ट्र वन विभागाने मास्टर लेआऊट प्लॅनसह संपूर्ण प्रस्ताव केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे (CZA) मान्यतेसाठी सादर केला आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या मंजुरीकडे जतकरांचे लक्ष लागले आहे.

वन विभागाच्या ११ ऑगस्टच्या पत्रानुसार, जत वनपरिक्षेत्रातील सर्व्हे क्रमांक ५२७, ५२८, ५२९, ५३० आणि ५३२ या क्षेत्रात प्राणिसंग्रहालय उभारण्याचे नियोजन आहे. येथे सुमारे ३३ ते ३५ प्रजातींचे वन्य प्राणी व पक्षी ठेवण्याची योजना आहे.

प्रकल्पात प्राण्यांच्या दर्शनासोबतच अत्याधुनिक पशुवैद्यकीय रुग्णालय, प्रशासकीय इमारत, कर्मचाऱ्यांसाठी निवासव्यवस्था, पर्यटक सुविधा, माहिती व शिक्षण केंद्र आणि लँडस्केपिंगचा समावेश करण्यात आला आहे. प्रस्तावाला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यास जतच्या पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *