Sangli Crime News : सांगलीवाडीतील हॉटेल अनुयश येथे झालेल्या वादातून विजय पाटील या ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू. दोन पोलिस भाऊ आणि त्यांचा साथीदार संशयित; सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात, संशयितांच्या शोधासाठी तीन पथके रवाना.
सांगली : सांगलीवाडी येथे हॉटेलमधील वादातून दोन पोलिस भावांनी आणि त्यांच्या साथीदाराने केलेल्या बेदम मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विजय वसंत पाटील (वय ३६, रा. अमर चौक, धनगर गल्ली, सांगलीवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी (१० नोव्हेंबर) मध्यरात्रीनंतर साडेबारा वाजण्याच्या सुमारास हॉटेल अनुयश येथे ही घटना घडली. या प्रकरणातील संशयित पोलिस कर्मचारी सुशील भीमराव सरगर, सुमित भीमराव सरगर आणि त्यांचा साथीदार घटनेनंतर पसार झाले असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेती व्यवसाय करणारे विजय पाटील हे मंगळवारी रात्री मित्र विशाल काटकर यांच्यासोबत सांगलीवाडीतील हॉटेल अनुयश येथे जेवण्यासाठी गेले होते. या हॉटेलचे मालक माजी नगरसेवक हरिदास पाटील आहेत. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास विजय आणि हॉटेल मालक हरिदास पाटील यांच्यात वाद झाला. त्यावेळी हरिदास पाटील हे विजय यांना शिवीगाळ करत असल्याचे सांगण्यात येते.
याचवेळी हॉटेलमध्ये पोलिस कर्मचारी सुशील सरगर, सुमित सरगर हे दोघे भाऊ आणि त्यांचा एक साथीदार जेवणासाठी बसले होते. विजय आणि हरिदास यांच्यात सुरू असलेल्या वादात या तिघांनी हस्तक्षेप करत विजय यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, विजय यांचा भाऊही मित्रांसह हॉटेलमध्ये आला. भावाला मारहाण होत असल्याचे पाहून त्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयितांनी विजय यांना बेदम मारहाण करून त्यांचे डोके भिंतीवर आणि लोखंडी शटरवर आपटल्याचा आरोप आहे.

या मारहाणीत विजय गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यानंतर संशयित तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. जखमी विजय यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हेदेखील वाचा : सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचा दावा; महेंद्र लाड यांचे नाव चर्चेत
सीसीटीव्हीत मारहाणीचा थरार कैद
या संपूर्ण घटनेचे चित्रण हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाले आहे. फुटेजमध्ये दोघे पोलिस भाऊ आणि त्यांचा साथीदार विजय यांना मारहाण करत असल्याचे दिसत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याच्या आधारे तपास सुरू आहे.
‘राम-लखन’ नावाने ओळखले जाणारे पोलिस भाऊ
सुशील आणि सुमित सरगर हे दोघे भाऊ परिसरात ‘राम-लखन’ या टोपणनावाने ओळखले जात असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांचीही २००८ मध्ये पोलिस दलात भरती झाली होती. त्यापैकी एकजण नवी मुंबईत, तर दुसरा कळंबोली येथे कार्यरत असल्याचे सांगण्यात येते.
माजी नगरसेवक हरिदास पाटील यांची चौकशी
विजय पाटील यांचा मृत्यू होण्यापूर्वी हॉटेल मालक तथा माजी नगरसेवक हरिदास पाटील यांच्याशी वाद झाल्याची नोंद पोलिसांत दाखल फिर्यादीत करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हरिदास पाटील यांची चौकशी केली आहे. वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, त्यात पोलिस कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप का केला, वाद मिटवण्याऐवजी मारहाण का करण्यात आली आणि घटनेवेळी मृताचा भाऊ नेमका कसा घटनास्थळी पोहोचला, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा प्रकार अचानक झालेल्या वादातून घडला की त्यामागे अन्य काही कारण होते, याचा तपास पोलिस करत आहेत.
पोलिसच संशयित असल्याने संतापाची लाट
कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवरच तरुणाच्या खुनाचा आरोप झाल्याने सांगली परिसरात संताप व्यक्त होत आहे. घटनेतील संशयितांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या घटनेबाबत सांगलीचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले, “सांगलीवाडीतील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यातील संशयित पोलिसांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. ते पोलिस ज्या ठिकाणी कामाला आहेत, त्यांच्या वरिष्ठांना त्यांचा अहवाल पाठवला आहे. लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाईल.”
