सेवानिवृत्त कलाशिक्षक व लेखक सुदाम विश्वे यांचा ‘विनयच्या गोष्टी’ हा पहिला बालकथा संग्रह प्रकाशित. ३२ कथांमधून संस्कार, देशप्रेम, पर्यावरण संवर्धन, इतिहासाची आवड आणि जीवनमूल्यांची शिकवण.
लेखन ही मनाची साधना तर वाचन ही जीवनाची संपत्ती आहे असं मांडणाऱ्या सेवानिवृत्त कला शिक्षक सुदाम विश्वे यांचा ‘ विनयच्या गोष्टी ‘हा बालकथा संग्रह वाचण्यात आला .विविध वर्तमानपत्र साप्ताहिके मासिके यामधून विपुल लेखन करणारे लेखक कवी सुदाम विश्वे यांचा हा पहिलाच बालकथा संग्रह नुकताच प्रकाशित झालेला आहे . विशेष म्हणजे याची आकर्षक मुखपृष्ठ व आतील कथांना साजेशी अशी चित्रे त्यांनी स्वतःच ए.आय.च्या मदतीने तयार केली आहेत.ही कौतुकास्पद बाब आहे .
या बाल कथासंग्रहात एकूण बत्तीस कथा आहेत या कथा छोट्या असल्यातरी त्यातला आशय मोठा आहे . ‘पाडवा गोड झाला ‘ या कथेपासून ते ‘पारंपारिक वाढदिवस ‘पर्यंत सर्वच कथा संस्कारक्षम अशा आहेत . शेजारधर्म पाळावा इतरांना मदत करावी प्रसंगावधान राखावे परिवारावर प्रेम करावे देश प्रेम अंगी बाणवावे अशी अनेक संस्कार मूल्ये या कथा मधून आढळतात .
‘ विनय ‘हे एकच पात्र प्रतीक म्हणून त्याच्यामार्फत विद्यार्थ्यांना नकळत देण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.सामान्य ज्ञाना बरोबर इतिहास भूगोल कला या विषयाची आवड विद्यार्थ्यांमध्ये कशी निर्माण करता येईल याचाही विचार कलाशिक्षक म्हणून लेखकांनी या कथांमधून व्यक्त केलेला आहे.मुलांच्या भावविश्वातील गोष्टींचा समावेश यामध्ये आहे . सोपं लिहिणं अवघड असतं पण हे अवघड काम सोप्या पद्धतीने मांडले आहे .’ युध्दस्य कला ‘ या कथे मधून भविष्यातील स्वप्न पाहण्यास उद्युक्त केले आहे तर पर्यावरण रक्षणाची सुंदर संकल्पना ‘विठ्ठलाचे झाड ‘ या कथेद्वारे सादर केली आहे .

‘ स्वराज्याची शपथ ‘ , ‘सिंहाच्या आठवणीत रमला गड , ‘सिंहगडवरील सुटकेचा थरार ‘ आणि ‘लाखमोलाची शिवराई ‘ आदि कथा मधून इतिहासाची आवड निर्माण होईल प्रसंग अवधान कसे टाकावे याचे ज्ञान होईल . कायम आठवणीत राहणारी ‘समुद्रकिनाऱ्यावरील भाऊबीज ‘ ही आगळी वेगळी गोष्ट आहे . बहुत आल्याची भान आणि परिस्थितीची जाणीव या कथेमधून मिळते . स्वावलंबनाचे महत्त्व ‘ आनंदी स्वावलंबन ‘ करून देते तसेच ‘सहलीतील शिकवण ‘यामधून समय सूचकता दिसून येते .
हेदेखील वाचा : दि. बा. पाटील यांची ‘पालट’ कादंबरी : ग्रामीण जीवन, संघर्ष आणि परिवर्तनाचा वेध
स्टोरी टेल ,ईबुक, पॉकेट बुक , कुकु अशा विविध ॲपची माहिती देणारी विनयची शिकवणी आजोबांना आवडते ज्ञान आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम विविध कथांमधून साधला आहे .उदाहरणार्थ ‘ अजरामर वाक्ये ‘ ‘ सन्मान राष्ट्रगीताचा ‘ ‘ जबाबदार विद्यार्थी या सारख्या अनेक गोष्टी निश्चितच आवडतील . मुलांच्या कल्पना शक्तीचा विचार करून आधुनिक किल्ला ही कथा लिहिली गेलेली आहे . दिलेल्या भेटीच्या किमतीपेक्षा त्यामागील भावना व्यक्त करणारी ‘अनमोल भेट ‘या पुस्तकात आपल्याला भेटेल . मुलांच्याच संग्रह करण्याची वृत्ती लहानपणापासूनच असते .’छोटा संग्राहक ‘सुद्धा या मध्ये आहे .
विनय या एकाच कथानायकाच्या रूपाने दिलेल्या या कथा विनयच्या आयुष्यात पुढे काय होईल; कोणता प्रसंग , त्याप्रसंगी तो कसा वागेल हे उत्सुकता वाढवण्याची कला लेखकाने उत्तम साधली आहे . वाचता वाचता प्रत्येक विद्यार्थ्यात एक विनय दडलेला असतो व त्याचा शोध घेण्याचा संदेश लेखकाने दिला आहे.
सुदाम विश्वे हे कलाशिक्षक असून अनेक विषयाचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे लेखनाबाबतचे विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत .’ विनयच्या गोष्टी’ हा बालकथा संग्रह सर्वांनाच निश्चित आवडेल यात शंका नाही .
-बाळकृष्ण बाचल,
पुणे.( ९३७३३१०९२९ )
पुस्तकाचे नाव – ‘ विनयच्या गोष्टी .
लेखक – सुदाम विश्वे
प्रकाशक – अनिकेत प्रकाशन जत ता . सांगली
