शेगाव (ता. जत) येथील कवी लवकुमार मुळे यांच्या ‘कोलाहलाची क्षणचित्रे’ कवितासंग्रहाला लोकजागर प्रतिष्ठानचा उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार जाहीर. १४ नोव्हेंबरला हिंगणगाव येथे वितरण.
जत : शेगाव (ता. जत) येथील कवी लवकुमार मुळे यांच्या ‘कोलाहलाची क्षणचित्रे’ या कवितासंग्रहाला कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव येथील लोकजागर प्रतिष्ठानचा उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार जाहीर झाला आहे. नवव्या लोकजागर साहित्य संमेलनात शनिवारी, दि. १४ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे जत तालुक्याच्या साहित्य क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आम्ही हिंगणगावकर परिवार आणि लोकजागर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नववे लोकजागर साहित्य संमेलन २०२६ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात विविध साहित्य प्रकारांतील सहा साहित्यिकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये कवी लवकुमार मुळे यांच्या कवितासंग्रहाची उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

कवी लवकुमार मुळे यांचे ‘गुलमोहर’, ‘भावमुद्रा’, ‘काळीजवेणा’, ‘अर्ध वेलांटी’, ‘कोणत्याही शक्यतेच्या पलीकडे’, ‘कवीने पिंजून घ्यावा भोवताल’ आणि ‘कोलाहलाची क्षणचित्रे’ हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या ‘कोलाहलाची क्षणचित्रे’ या संग्रहाला यापूर्वीही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून, नुकताच संत नामदेव साहित्य पुरस्कारही जाहीर झाला आहे. त्यांचा ‘आत्मसंवादाचे पांढरपक्षी’ हा आगामी कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
हेदेखील वाचा : दि. बा. पाटील यांची ‘पालट’ कादंबरी : ग्रामीण जीवन, संघर्ष आणि परिवर्तनाचा वेध
मुळे हे जत तालुक्यातील मराठी साहित्य सेवा मंच या साहित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. गेल्या ३१ वर्षांपासून ते दरवर्षी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करीत आहेत. ग्रामीण भागातील साहित्यिक, कवी आणि साहित्यप्रेमींना एकत्र आणून साहित्य चळवळ जिवंत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करीत आहेत. जत तालुक्यातील एक महत्त्वाची साहित्य संस्था म्हणून मराठी साहित्य सेवा मंचची ओळख निर्माण झाली आहे.
दरम्यान, लोकजागर साहित्य संमेलनात प्रा. एम. एस. राजपूत यांच्या ‘किमयागार’ आत्मचरित्राला जीवनगौरव पुरस्कार, दि. बा. पाटील यांच्या ‘पालट’ कादंबरीला उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, नीलम माणगावे यांच्या ‘खेळखंडोबा’ला उत्कृष्ट लघुकादंबरी पुरस्कार, रावसाहेब पुजारी यांच्या ‘वालुक’ कथासंग्रहाला उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार आणि प्रा. संजय ठिगळे यांच्या ‘कधी मनातलं, कधी जनातलं’ लेखसंग्रहाला उत्कृष्ट लेखसंग्रह पुरस्कार जाहीर झाला आहे.
संमेलनात विवेकानंद पाटील यांचे ‘युवाशक्ती, स्पर्धा परीक्षा व सद्यस्थिती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच लेखक, निर्माता व दिग्दर्शक यश बनसोडे प्रस्तुत ‘720: A DREAM, A SACRIFICE, A SYSTEM’ या लघुपटाचे प्रमोशनही करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा साहित्य सोहळा पार पडणार आहे.
