जतच्या डॉ. गायत्री जावीर यांची कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी वर्ग-१ पदी नियुक्ती. ग्रामीण भागातून शिक्षण घेत मिळवले यश.

जत : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर जतच्या कन्येने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जत येथील डॉ. गायत्री म्हाळू जावीर यांनी एमबीबीएस आणि एमएस (स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र) ही उच्च वैद्यकीय पदवी प्राप्त केली असून, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून त्यांची वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोगतज्ज्ञ), गट-अ या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात पदभार स्वीकारला.

डॉ. गायत्री यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, येळदरी येथे झाले. माध्यमिक शिक्षण श्री. रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, जत येथे पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून रुग्णालयातून एमबीबीएसचे शिक्षण घेतले. त्यानंतर अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमएस (ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी) ही पदव्युत्तर पदवी संपादन केली.

उच्च शिक्षणानंतर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, शेगाव येथे सहा महिने वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथे आठ महिने स्त्रीरोगतज्ज्ञ वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून काम केले. या अनुभवाच्या जोरावर आता त्यांच्यावर कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतीविषयक रुग्णसेवेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

डॉ. गायत्री यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात वडील म्हाळू मारुती जावीर आणि आई जयश्री म्हाळू जावीर यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. त्यांचे वडील जत येथील भैरवनाथ कृषी सेवा केंद्राचे व्यावसायिक असून, आई जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, साळमळगेवाडी येथे शिक्षिका आहेत.

हेदेखील वाचा: जतच्या बालगावात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शेतकऱ्यांसोबत दिवाळी फराळ; दुष्काळ निवारणाचा दिला विश्वास

डॉ. गायत्री यांच्या या यशाबद्दल जत येथे त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार तथा डिजिटल मीडिया परिषद ज-त तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण पाटील, सेवानिवृत्त शिक्षक विजयकुमार बोराडे, प्रगतशील शेतकरी तानाजी बोराडे (शेगाव) आणि मुंबई येथील उद्योजक आबासाहेब तोरवे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे आई-वडील उपस्थित होते.

जत

ग्रामीण भागातील शाळेतून शिक्षणाची सुरुवात करून वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवीपर्यंत मजल मारत शासकीय सेवेत महत्त्वाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या डॉ. गायत्री जावीर यांच्या यशाचे ज-त परिसरातून कौतुक होत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *