जत तालुक्यात गुन्हेगारीच्या तीन घटना

जत तालुक्यात गुन्हेगारीच्या तीन घटना उघडकीस. पाच्छापूरच्या तरुणाची ५६.५५ लाखांची ऑनलाइन फसवणूक, वाषाणमध्ये दोन लाखांची डाळिंबे चोरीला; जत शहरात चौघांकडून एकाला मारहाण.

जत : जत तालुक्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या तीन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. विमा गुंतवणुकीवर भरघोस परतावा आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून पाच्छापूर येथील तरुणाची तब्बल ५६ लाख ५५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. दुसऱ्या घटनेत वाषाण येथील शेतकऱ्याच्या शेतातून सुमारे दोन लाख रुपये किमतीची डाळिंबे चोरून नेण्यात आली, तर जत शहरात जुन्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी मिळून एकाला मारहाण करून जखमी केले. या तिन्ही प्रकरणांत जत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विमा परताव्याच्या आमिषाने ५६ लाखांचा गंडा

सायबर गुन्हेगारांनी विमा गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून पाच्छापूर येथील २२ वर्षीय उमेश रमेश कोळी या तरुणाला ५६ लाख ५५ हजार ३७३ रुपयांचा गंडा घातला. संशयितांनी मोबाईलवरून संपर्क साधून तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास भाग पाडले.

उमेश याने स्वतःच्या तसेच वडिलांच्या बँक खात्यातून आणि फोन पे, गुगल पेच्या माध्यमातून वेळोवेळी रक्कम पाठवली. मात्र, आश्वासन दिलेला परतावा किंवा शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाषाणमध्ये दोन लाखांची डाळिंबे चोरीला

वाषाण येथील शेतकरी राम सुभाष शिरगिरे (वय ३१) यांच्या डाळिंब बागेतून भगवा जातीची सुमारे दोन हजार किलो डाळिंबे चोरट्यांनी लंपास केली. चोरीस गेलेल्या डाळिंबांची किंमत अंदाजे दोन लाख रुपये आहे.

शिरगिरे यांनी विक्रीसाठी ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी डाळिंबांची तोडणी करून ठेवली होती. मात्र, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी डाळिंबांवर डल्ला मारला. दुसऱ्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. परिसरात शोध घेऊनही डाळिंबांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेदेखील वाचा : जत-अथणी महामार्गावर अज्ञात वाहनाची धडक; बिळूरच्या 35 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

जुन्या भांडणातून चौघांकडून एकाला मारहाण

जत शहरातील कुलकर्णी पेट्रोल पंपाजवळील पंक्चरच्या दुकानासमोर जुन्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी मिळून भाऊसाहेब पांडुरंग वाघमोडे (वय ३९, रा. दुधाळवस्ती, ज-त) यांना मारहाण करून जखमी केले. या मारहाणीदरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि खिशातील पाकीट गहाळ झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी वाघमोडे वाहनाचे पंक्चर काढण्यासाठी दुकानात गेले होते. त्यावेळी नदीम मुल्ला आणि त्याच्यासोबत आलेल्या एका व्यक्तीने जुन्या भांडणाचा जाब विचारत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आणखी दोघे तेथे आले. चौघांनी मिळून हाताने, दगडाने आणि हातातील कड्याने मारहाण केली. याप्रकरणी नदीम मुल्ला याच्यासह चौघांविरोधात ज-त पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तीन वेगवेगळ्या घटनांमुळे तालुक्यात चोरी, सायबर फसवणूक आणि मारहाणीचे प्रकार चर्चेत आले आहेत. विशेषतः ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडून लाखो रुपये गमावण्याची घटना चिंताजनक आहे. अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या आर्थिक परताव्याच्या आश्वासनांना बळी न पडता नागरिकांनी आर्थिक व्यवहारांबाबत सतर्क राहण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *