राष्ट्रीय आरोग्य अभियानातील साडेतीन हजार गटप्रवर्तकांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी. जत येथे लाल बावटा युनियनच्या पदाधिकाऱ्यांची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी भेट.
जत : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या सुमारे साडेतीन हजार गटप्रवर्तकांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन, सांगलीच्या पदाधिकाऱ्यांनी जत तालुका दौऱ्यावर आलेले राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची रात्री उशिरा ११.३० वाजता भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी गटप्रवर्तकांनाही सेवेत समायोजित करून घेणार असल्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गटप्रवर्तक गेल्या १६ ते १७ वर्षांपासून आरोग्य विभागात सेवा बजावत आहेत. मात्र, इतकी वर्षे काम करूनही त्यांना अद्याप कंत्राटी आणि मानधन तत्त्वावरच काम करावे लागत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेऊन त्यांच्या सेवेला स्थैर्य द्यावे, अशी मागणी युनियनच्या वतीने करण्यात आली.
यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमोर गटप्रवर्तकांच्या दीर्घकालीन सेवेचा आणि त्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा मुद्दा मांडण्यात आला. त्यावर ‘गटप्रवर्तकांनाही सेवेत समायोजन करून घेणार आहोत,’ असे आश्वासक विधान आरोग्यमंत्र्यांनी केले. त्यामुळे राज्यातील हजारो गटप्रवर्तकांच्या कायमस्वरूपी सेवेत समावेशाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
विशेष म्हणजे, रात्री उशिराची वेळ असतानाही युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन गटप्रवर्तकांचा प्रश्न ठामपणे मांडला. या आश्वासनामुळे गटप्रवर्तकांच्या लढ्याला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी कॉ. हणमंत कोळी, कॉ. मीना कोळी, वैशाली पवार, प्रमिला साबळे, मालण व्हणकंडे, सरिता पवार, आशा शिंदे यांच्यासह अन्य गटप्रवर्तक उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी सेवेसाठी संघर्ष करणाऱ्या राज्यातील सुमारे साडेतीन हजार गटप्रवर्तकांचे लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
