सांगली जिल्हा बँक निवडणूक

सांगली जिल्हा बँकेच्या जत ‘अ’ गटाच्या निवडणुकीत राजकीय संघर्ष तीव्र. सोनलगीच्या मतदाराच्या कथित अपहरणप्रकरणी विनोद पवार, सुनील पवार यांच्यासह चौघांवर गुन्हा. विक्रमसिंह सावंत यांचा भाजपवर पूर्वनियोजित कटाचा आरोप.

जत : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जत तालुक्यातील ‘अ’ गटाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सोनलगी येथील मतदार श्रीशैल कळी यांच्या कथित अपहरणप्रकरणी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विनोद पवार, जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार यांच्यासह चौघांवर उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर पवार आणि पडळकर समर्थकांमध्ये उमदी पोलिस ठाण्यात जोरदार वादावादी झाली. दरम्यान, हा गुन्हा भाजपचा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जत तालुक्यातील ‘अ’ गटातून काँग्रेस आघाडीतर्फे विनोद पवार निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर रिंगणात आहेत. येत्या १ नोव्हेंबरला मतदान होणार असल्याने दोन्ही बाजूंकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, २३ ऑक्टोबर रोजी सोनलगी येथील श्रीशैल कळ्ळी यांना मतदानासाठी विनोद पवार यांच्या बाजूने आग्रह करण्यात आला. त्याला विरोध केल्याने त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि पांढऱ्या चारचाकी वाहनातून बळजबरीने उमदीच्या दिशेने नेण्यात आले, असा आरोप त्यांच्या आई पद्माक्का कळ्ळी यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीवरून उमदी पोलिसांनी विनोद पवार, सुनील पवार यांच्यासह चौघांविरुद्ध अपहरण आणि अन्य संबंधित आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक दिनेश धसाडे तपास करत आहेत.

हेदेखील वाचा: जत परिसरातील घटना : तालुक्यात पाणीटंचाई गंभीर; माहेरहून 30 लाख रुपये आणण्याची मागणी; विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांवर गुन्हा

या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर गुरुवारी (ता. २९) उमदी पोलिस ठाण्याच्या परिसरात दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य रमेश देवर्षी आणि काँग्रेस कार्यकर्ते वाहब मुल्ला यांच्यात वादावादी झाली. दिवसभर पोलिस ठाण्याच्या परिसरात राजकीय कार्यकर्त्यांची वर्दळ सुरू होती. संभाव्य तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार यांनी हा गुन्हा राजकीय हेतूने दाखल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. विरोधक सत्तेचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा दावा त्यांनी केला. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य रमेश देवर्षी यांनी सोनलगी येथे जाऊन श्रीशैल कळ्ळी यांच्या आईंचे कान भरले आणि त्यांच्याकडून खोटी तक्रार नोंदवून घेतली, असा आरोपही त्यांनी केला.

सांगली जिल्हा बँक निवडणूक

‘अपहरणाचा गुन्हा भाजपचा पूर्वनियोजित कट’

या प्रकरणावर काँग्रेसचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गंभीर आरोप केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पडळकर सत्तेचा गैरवापर करत असून, सोनलगी येथील मतदार श्रीशैल कळी यांच्या आईंना सोबत घेऊन अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा भाजपचा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप सावंत यांनी केला.

सावंत म्हणाले, उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी, दरोडे आणि खुनासारख्या गंभीर घटना घडतात. मात्र, अशा घटनांमध्ये पोलिस यंत्रणा तत्परता दाखवत नसल्याचा आमचा अनुभव आहे. दुसरीकडे, अपहरणाचा गुन्हा दाखल होताच पोलिस मतदाराला शोधण्यासाठी हैदराबादपर्यंत पोहोचतात, ही बाब संशयास्पद आहे.

संबंधित मतदार स्वतःच्या कामानिमित्त बाहेरगावी गेल्याचे व्हिडिओद्वारे सांगत आहे. आपण स्वतःहून आलो असून आपले अपहरण झालेले नाही, असे त्याने हैदराबाद येथे सांगितल्याचा दावा सावंत यांनी केला. तरीही त्याचे म्हणणे पोलिस ऐकून घेत नसल्याची तक्रार त्यांनी केली. कळी यांच्या आई उमदी पोलिस ठाण्यात आपले म्हणणे मांडण्यासाठी गेल्या असता त्यांचा जबाब का नोंदवण्यात आला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आमदार पडळकर यांचा पोलिसांवर दबाव असल्याचा आरोपही सावंत यांनी केला.

दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी ते नंतर संपर्क साधतील, असे सांगितले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना अपहरणाचा आरोप, परस्परविरोधी दावे आणि पोलिस ठाण्यातील वादावादीमुळे जत तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता पोलिस तपासातून स्पष्ट होणार असून, १ नोव्हेंबरच्या मतदानापूर्वी या घडामोडींचा निवडणुकीवर काय परिणाम होतो, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *