जत तालुक्यातील मेंढिगिरी येथे दुचाकी-ट्रॅक्टरच्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. उमदी विठ्ठलवाडीत पाणंद रस्त्याच्या वादातून हाणामारी व दगडफेक; पोलिस कर्मचाऱ्यासह पाच ते सहा जण जखमी.
जत : जत तालुक्यात गुरुवारी दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. मेंढिगिरी गावाजवळ दुचाकी आणि वैरणीने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर उमदी विठ्ठलवाडी येथे पाणंद रस्त्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी आणि दगडफेक झाली. या घटनेत वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यासह पाच ते सहा जण जखमी झाले. या दोन्ही घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मेंढिगिरी येथे अपघातात तरुणाचा मृत्यू
जत : जत शहरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मेंढिगिरी गावाजवळ दुचाकी आणि वैरणीने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीची धडक होऊन धनेश्वर शंकर रोट्टी (वय १९, रा. गोब्बी मळ्याजवळ, मेंढिगिरी, ता. जत) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी हा अपघात घडला. या घटनेने मेंढिगिरी परिसरात शोककळा पसरली आहे.
धनेश्वर हा जत शहरातील एका दुचाकी शोरूममध्ये कामाला होता. दिवसभराचे काम संपवून तो दुचाकीवरून आपल्या गावाकडे निघाला होता. मेंढिगिरी गावाबाहेर जत रस्त्यावर वैरणीने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीशी त्याच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. ट्रॉलीचे फाळके बाहेर आलेले असल्याने त्याचा धक्का धनेश्वरच्या छातीला बसला. यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रॅक्टरचालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे. या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा करण्यात आली.
धनेश्वर हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. तरुण मुलाच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हेदेखील वाचा: जत येथे लाडकी बहीण योजनेतील वंचित महिलांसाठी निवेदन; लाभ पुन्हा सुरू करण्याची मागणी
उमदीत पाणंद रस्त्याच्या वादातून हाणामारी, दगडफेक
उमदी : उमदी विठ्ठलवाडी येथे पाणंद रस्त्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी आणि दगडफेक झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत वाद मिटविण्यासाठी गेलेला उमदी पोलिस ठाण्यातील एक कर्मचारी आणि अन्य पाच ते सहा जण जखमी झाले. जखमींना ज-त येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
विठ्ठलवाडी हद्दीतील एका शेतजमिनीतून पाणंद रस्ता करण्याच्या कारणावरून संबंधित शेतकरी आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. या प्रकरणी संख येथील अप्पर तहसीलदार न्यायालयात दावा सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, गुरुवारी सकाळी संबंधित ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असताना दोन्ही बाजूंच्या मंडळींमध्ये वादावादी झाली. हा वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर हाणामारी आणि दगडफेकीत झाले. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल मोटे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
दोन्ही गटांतील वाद सोडविण्याचा प्रयत्न करत असताना कॉन्स्टेबल मोटे यांना दगड लागून ते जखमी झाले. या घटनेत अन्य काही जणांनाही दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर ज-तचे पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच, प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
