जत तालुक्यात विविध विकासकामांना वेग आला आहे. संख येथील बोऱ्याळवस्ती रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात, सबई व शिळीनवस्तीला नवीन ट्रान्सफॉर्मर आणि जत सत्र न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम पुन्हा वेगात सुरू झाले आहे. राजे रामराव महाविद्यालयात रानभाजी सप्ताहाचेही आयोजन करण्यात आले.
चाळीस वर्षांची प्रतीक्षा संपली; बोऱ्याळवस्ती रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात
आयर्विन टाइम्स
संख / प्रतिनिधी : जत तालुक्यातील संख येथील बोऱ्याळवस्ती रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ बुधवारी उत्साहात करण्यात आला. तब्बल चाळीस वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या या रस्त्याला अखेर मुहूर्त मिळाल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
या रस्त्याच्या कामासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने बोऱ्याळवस्ती परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची अवस्था अत्यंत खराब होती. पावसाळ्यात चिखल आणि खड्ड्यांमुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत होती. शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती.
या मागणीची दखल घेत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ नेते व पंचायत समितीचे माजी सभापती आर. के. पाटील, जिल्हा परिषद सदस्या कविता पाटील आणि पंचायत समिती सदस्य सदाशिव दर्गाकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कामाला मंजुरी मिळाली.
रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माजी सभापती आर. के. पाटील यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर तसेच पाठपुरावा करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
शुभारंभप्रसंगी नेते किरण पाटील यांच्यासह बोऱ्याळवस्ती परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून शेतमालाची वाहतूकही सोपी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि वाहतूक खर्च वाचण्यास मदत होणार आहे.
चाळीस वर्षांची प्रतीक्षा संपून रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाल्याने बोऱ्याळवस्ती परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
राजे रामराव महाविद्यालयात रानभाजी सप्ताहाचे उद्घाटन; वनस्पतीशास्त्र विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

जत (प्रतिनिधी) : राजे रामराव महाविद्यालय, जत येथे वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने “रानभाजी सप्ताह २०२६” या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन इचलकरंजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के.खाडे यांच्या शुभहस्ते व महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य कृष्णा रानगर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी मार्गदर्शनपर बोलताना प्राचार्य डॉ.एस.के.खाडे म्हणाले की, रानभाज्यांचे औषधी व पोषणमूल्य अतिशय महत्त्वाचे आहे. शरिरासाठी उपयुक्त असणारे जीवनसत्त्वे फायबर आपणास रानभाज्यातून मिळतात. फास्ट फूड च्या जमण्यात आपण रानभाज्याना विसरत चाललो आहोत. पावसाळ्यात आपल्या आजूबाजूला अनेक रानभाज्या आहेत. त्यांची माहिती होण्याच्या दृष्टीने हा रानभाज्या सप्ताह अतिशय महत्वाचा आहे असे सांगून त्यांनी रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व व दैनंदिन जीवनातील उपयोग याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी प्राचार्य कृष्णा रानगर यांनी रानभाज्या या नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या वनस्पतींचे संवर्धन व जतन करण्याची गरज असल्याचे सांगितले. प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात डॉ.मधुमती शिंदे यांनी रानभाज्यांची ओळख,जैवविविधतेतील स्थान आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. आभार डॉ.एस.एल.सौदागर यांनी केले.
या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.अरविंद पवार, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ.मल्लाप्पा उर्फ प्रकाश सज्जन, गणितशास्त्र विभागप्रमुख प्रा.वैभव चांडवले, प्राध्यापिका भाग्यलक्ष्मी माळी, लॅब सुपर वायझर श्री. बी. के. पुजारी यांच्यासह प्राध्यापक वृंद व महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संख येथे सबई व शिळीन वस्तीला नवीन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन

आयर्विन टाइम्स
संख / प्रतिनिधी :
जत तालुक्यातील संख येथे सबई वस्ती व शिळीनवस्ती परिसरातील शेतकऱ्यांची वीजपुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निधीतून तसेच जिल्हा परिषद सदस्या सौ. कविता पाटील आणि पंचायत समिती सदस्य सदाशिव दर्गाकर यांच्या पाठपुराव्याने दोन्ही ठिकाणी १०० क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
सबई वस्ती येथे नव्याने बसविण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सौ. कविता पाटील यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले. तर शिळीनवस्ती येथे बसविण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरचे पंचायत समिती सदस्य सदाशिव दर्गाकर यांच्या हस्ते पूजन करून उद्घाटन करण्यात आले.
गेल्या काही काळापासून या परिसरातील शेतकऱ्यांना कमी दाबाचा वीजपुरवठा, वारंवार वीज खंडित होणे तसेच शेतीपंप सुरू ठेवताना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला. जिल्हा परिषद सदस्या कविता पाटील व पंचायत समिती सदस्य सदाशिव दर्गाकर यांच्या पाठपुराव्यामुळे ही मागणी पूर्णत्वास आली. नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे शेतीपंपांना अधिक सुरळीत वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार असून, शेतकऱ्यांची वीजपुरवठ्यामुळे होणारी गैरसोय कमी होणार आहे. शेतीच्या कामांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी भाजपचे युवा नेते किरण पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव, ग्रामस्थ व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निधीअभावी रखडलेले जत सत्र न्यायालयाचे बांधकाम पुन्हा वेगात

आयर्विन टाइम्स
जत / प्रतिनिधी : जतकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न असलेल्या सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम निधीअभावी संथगतीने सुरू होते. शासनाने या प्रकल्पासाठी तब्बल ३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला, तरी निधीचा पुरेसा पुरवठा न झाल्याने बांधकामाला अपेक्षित गती मिळत नव्हती. मात्र, आता ठेकेदार संस्थेने उपलब्ध साधनसामग्रीच्या जोरावर कामाला वेग दिला असून, सुमारे ६० कामगार सध्या बांधकामात कार्यरत आहेत.
जत वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड. शिवशंकर खटावे यांनी या प्रकल्पासाठी शासनाकडून तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनीही या कामासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जत येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे कामकाज सध्या संस्थानकालीन काळातील जुन्या व अपुऱ्या इमारतीत सुरू आहे. न्यायालयीन कामकाजासाठी जागेची कमतरता असून अभिलेख कक्ष, बाररूम तसेच न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांसाठी आवश्यक सुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे न्यायालयीन कामकाजावरही त्याचा परिणाम होत आहे.
सत्र न्यायालयासाठी पशुवैद्यकीय दवाखान्याजवळील राजे रामराव महाविद्यालयाच्या रस्त्यालगतची जागा आरक्षित करण्यात आली आहे. या ठिकाणी तीन मजली भव्य न्यायालयीन इमारत उभारण्यात येणार असून, त्यासाठी शासनाने ३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाची जबाबदारी ‘मोहिते अँड सन्स’ या ठेकेदार संस्थेकडे आहे. याच संस्थेने सांगली सत्र न्यायालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे.
जत येथील इमारतीच्या बांधकामाला सुमारे अडीच वर्षांपूर्वी सुरुवात झाली. तळमजल्याचे अंदाजे चार कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले आहे. निधीअभावी कामाची गती मंदावली होती. मात्र, आता ठेकेदार संस्थेने कामाला पुन्हा वेग दिला असून, सध्या सुमारे ६० कामगार दिवसरात्र काम करीत आहेत. येत्या दोन-तीन महिन्यांत पहिल्या मजल्याचा स्लॅब टाकण्याचे नियोजन असल्याचे कामगारांनी सांगितले.
नव्या इमारतीत पाच न्यायाधीशांसाठी स्वतंत्र न्यायालय कक्ष, महिला व पुरुष वकिलांसाठी स्वतंत्र बाररूम, कॉन्फरन्स हॉल, लोकअदालत हॉल, न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी कार्यालये तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
न्यायालयाची नवी इमारत ही केवळ बांधकामाची बाब नसून, सामान्य नागरिकाच्या न्यायहक्काशी निगडित आहे. शासनाने मंजूर निधी वेळेत उपलब्ध करून दिल्यास जतकरांचे सत्र न्यायालयाचे स्वप्न लवकर साकार होईल. आमदार गोपीचंद पडळकर यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अॅड. शिवशंकर खटावे यांनी केली.
न्यायालयीन इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर जत तालुक्यातील न्यायप्रणालीला मोठा दिलासा मिळणार असून, न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांना अधिक सक्षम व सुविधायुक्त वातावरण उपलब्ध होणार आहे.
