जत : अल्पवयीन मुलीचा विनयभंग

जत तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जगदिश चव्हाण याला सांगली न्यायालयाने ४ वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सांगली : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जगदिश सुभाष चव्हाण (वय २५, रा. डफळापूर, ता. जत, जि. सांगली) याला सांगली येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. ४, श्रीमती जे. ए. मोहती यांच्या न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आरोपीला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

न्यायालयीन माहितीनुसार, आरोपी हा पीडित अल्पवयीन मुलीच्या घराजवळ राहत होता. तिच्या बालवयाचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्याशी जवळीक साधून तिचा विश्वास संपादन केला. पीडिता अंगणात खेळत असताना आरोपीने तिला शेजारील घर दाखवण्याच्या बहाण्याने आपल्या घरी नेले. तेथे त्याने तिचा विनयभंग केला.

घटनेनंतर घाबरलेली पीडिता ओरडत आपल्या घरी परतली. तिने घडलेली घटना आई-वडिलांना सांगितली तसेच आरोपीची ओळखही करून दिली. त्यानंतर तिच्या वडिलांनी जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २४९/२०२४ दाखल करण्यात आला.

जत : अल्पवयीन मुलीचा विनयभंग

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड यांनी केला. तपास पूर्ण करून त्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान पीडित मुलीने न्यायालयात दिलेली साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. इतर काही साक्षीदारांनी दबावामुळे घटनेला दुजोरा देण्याचे टाळले असले, तरी पीडितेने धैर्याने आणि ठामपणे आपली साक्ष नोंदवली.

हेदेखील वाचा: जत येथे 46 वा युवा महोत्सव उत्साहात; 56 महाविद्यालयांतील 1289 विद्यार्थ्यांचा सहभाग

पीडितेची साक्ष व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी जगदिश चव्हाण याला दोषी ठरवत चार वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता व्ही. के. मुरचिटे, ए. एम. साटविलकर आणि एस. आर. हिंगमिरे यांनी काम पाहिले. तसेच पैरवी कक्ष अधिकारी मुद्दस्सर शेख (सहा. पो. नि.), जत पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम बंडगर (ब. नं. ६२१) आणि पैरवी कक्षातील महिला पोलीस कॉन्स्टेबल रेखा खोत (ब. नं. २५४७) यांनी या प्रकरणात सहकार्य केले.

या निकालामुळे अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये पीडितेची साक्ष आणि उपलब्ध पुराव्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *