जत नगरपरिषदेला सात उद्यानांच्या विकासासाठी पाच कोटी, तर तालुक्यातील विविध विकासकामांसाठी दहा कोटींचा निधी मंजूर. शहरासह तालुक्याच्या विकासाला चालना.
जत : शहराच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाने नगरपरिषदेला पाच कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहरातील सात ठिकाणी उद्यानांची निर्मिती आणि विकास करण्यात येणार आहे. याशिवाय प्रादेशिक पर्यावरण विकास योजनेअंतर्गत जत तालुक्यातील विविध विकासकामांसाठी आणखी दहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे शहरासह तालुक्याच्या विकासासाठी एकूण १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
याबाबत नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने ६ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान’ या योजनेतून जत नगरपरिषदेसाठी पाच कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.
या निधीतून विठ्ठलनगर, महात्मा बसवेश्वर चौक, भूमी अभिलेख कार्यालयासमोरील परिसर, यशवंतनगर, विजयतानगर, घाणेश्वरी नगर आणि चैतन्य उद्यान या सात ठिकाणी उद्यानांची निर्मिती व विकास करण्यात येणार आहे. प्रत्येक कामासाठी ५० ते ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या उद्यानांमुळे शहरातील नागरिकांना विरंगुळ्यासाठी आणि मनोरंजनासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज-त शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून हा निधी मंजूर झाला आहे. शहरातील मूलभूत सुविधा आणि नागरी विकासाला यामुळे बळ मिळणार असून, नियोजित विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील, असे नगराध्यक्ष डॉ. आरळी यांनी सांगितले.
तालुक्यातील गावांसाठीही दहा कोटी
दरम्यान, प्रादेशिक पर्यावरण विकास योजनेअंतर्गत जत तालुक्यातील विविध विकासकामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये जत शहरातील श्री यल्लमा देवी मंदिर परिसरातील सभामंडपाच्या कामासह काराजंगी, बेवनूर, बालगाव, वज्रवाड, येळदरी, संख, कोळगिरी, दरीबडची आणि कोनबोबलाद या गावांतील विकासकामांचा समावेश आहे.
शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी एकाच वेळी १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने आगामी काळात विविध विकासकामांना चालना मिळणार आहे. या निधीमुळे जतच्या विकासाचा नियोजित आराखडा प्रत्यक्षात आणण्यास मदत होईल, असा विश्वास नगराध्यक्ष डॉ. आरळी यांनी व्यक्त केला. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे ज-त शहर व तालुक्याच्या वतीने त्यांनी अभिनंदन केले.
यावेळी उपनगराध्यक्ष विक्रम ताड, गौतम ऐवळे, पापा कुंभार, अण्णा भिसे, प्रमोद हिरवे, मिथुन भिसे, परशुराम मोरे, संतोष पट्टणशेट्टी, सोनुले, अनिल पाटील यांच्यासह भाजपचे नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
