जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी काँग्रेसने तहसीलदारांना निवेदन दिले. टँकरने पाणीपुरवठा, चारा छावण्या, म्हैसाळचे पाणी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी.
जत : तालुक्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी, शेतमजूर, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिकांना तातडीने दिलासा द्यावा, या मागणीसाठी जत तालुका काँग्रेस कमिटी आक्रमक झाली आहे. दुष्काळी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले. प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यंदा पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील पेरणीही पाण्याअभावी संकटात सापडली आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून जनावरांसाठी चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिणामी ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईग्रस्त गावांना तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, विस्तारित म्हैसाळ योजनेचे पाणी दुष्काळग्रस्त गावांतील तलावांमध्ये सोडावे, चारा छावण्या आणि चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पीकविमा आणि दुष्काळी अनुदानाचे वितरण तातडीने करावे, शेतीपंपांच्या वीजबिलात सवलत द्यावी आणि मनरेगाअंतर्गत रोजगाराची कामे सुरू करावीत, असे निवेदनात म्हटले आहे.
कृष्णा आणि वारणा खोऱ्यातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून जत तालुक्याला प्राधान्य द्यावे, कोरड्या तलावांचे पुनर्भरण करावे आणि जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महादेव पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी सेलचे उपाध्यक्ष तुकाराम माळी, माजी सभापती बाबासाहेब कोडग, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रामचंद्र सरगर, नारायण जगताप, रावसाहेब मंगसुळी आदी उपस्थित होते.
प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने संबंधित विभागांची तातडीने बैठक घेऊन दुष्काळी उपाययोजनांबाबत निर्णय घ्यावा आणि मागण्यांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली. दुष्काळग्रस्त शेतकरी, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास शेतकरी व जनतेला सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.
