जत तालुक्यातील शाळांना टँकरच्या पाणीपुरवठ्यात प्रथम प्राधान्य द्या

जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शाळांना टँकरच्या पाणीपुरवठ्यात प्रथम प्राधान्य आणि प्रत्येक शाळेत प्रथमोपचार पेटी देण्याची मागणी शिक्षक समन्वय समितीने केली.

जत : तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. या पार्श्वभूमीवर गावात टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात जिल्हा परिषद शाळांना प्रथम प्राधान्य द्यावे, अशी मागणी शिक्षक समन्वय समितीच्या वतीने जतचे गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांच्याकडे करण्यात आली.

शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी पाटील यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली. गावात पाण्याचा टँकर आल्यानंतर सर्वप्रथम शाळांना पाणी उपलब्ध करून द्यावे आणि त्यानंतर गावातील अन्य ठिकाणी पाणीपुरवठा करावा, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली. दुष्काळाच्या काळात विद्यार्थ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जत तालुक्यातील शाळांना टँकरच्या पाणीपुरवठ्यात प्रथम प्राधान्य द्या

याशिवाय तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला आवश्यक औषधे आणि प्राथमिक उपचार साहित्य असलेली प्रथमोपचार पेटी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. शाळेत खेळताना, व्यायाम करताना किंवा विविध उपक्रमांमध्ये सहभागी होताना विद्यार्थ्यांना दुखापत होण्याची शक्यता असते. अशा वेळी तातडीने प्राथमिक उपचार मिळणे आवश्यक असल्याने प्रत्येक शाळेत प्रथमोपचार पेटीची सुविधा असावी, असे पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.

हेदेखील वाचा : जत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू; समान काम समान वेतनाची मागणी

यावेळी शिक्षकांच्या विविध प्रशासकीय आणि सेवाविषयक प्रलंबित प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सकारात्मक दृष्टिकोनातून मार्गी लावाव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

याप्रसंगी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष भारत क्षिरसागर, शिक्षक समितीचे अध्यक्ष दीपक कोळी, शिक्षक भारतीचे अध्यक्ष दिगंबर सावंत, श्रावण कोरे, शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष देवाप्पा करांडे, जुनी पेन्शन संघटनेचे नेते तानाजी टेंगले, मोहन चौगुले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता महत्त्वाची

दुष्काळाच्या काळात पिण्याच्या पाण्याअभावी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी शाळांना टँकरच्या पाणीपुरवठ्यात प्राधान्य देणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक शाळेत प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेलाही बळ मिळेल. विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी शिक्षक समन्वय समितीने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *