सांगलीत अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र 2029 अभियान

अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र २०२९ अभियानाची सांगली जिल्ह्यात अंमलबजावणी होणार. १२ विभाग, ४० निकष आणि ६५० गुणांच्या मूल्यांकन आराखड्यासह व्यसनमुक्तीसाठी जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना.

सांगली : अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करून महाराष्ट्राला अमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ‘अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र २०२९’ हे अभियान हाती घेतले आहे. या अभियानाची सांगली जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीच्या (NCORD) बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

१२ विभाग, ४० निकष आणि ६५० गुणांचे मूल्यांकन

‘अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र २०२९’ अभियानासाठी जिल्हास्तरीय मूल्यांकन आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये १२ शासकीय विभाग, ४० मूल्यांकन निकष आणि एकूण ६५० गुणांची गुणांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस, अन्न व औषध प्रशासन, आरोग्य, सामाजिक न्याय, शिक्षण, क्रीडा, महसूल, वन, कृषी, ग्रामविकास आणि कारागृह प्रशासन अशा विविध विभागांच्या माध्यमातून जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, व्यसनमुक्ती आणि पुनर्वसनासाठी एकत्रित प्रयत्न केले जाणार आहेत.

अमली पदार्थांची अवैध लागवड, निर्मिती, साठवणूक, वाहतूक आणि विक्री रोखण्याबरोबरच व्यसनाधीन व्यक्तींचे समुपदेशन, उपचार व पुनर्वसन यावर विशेष लक्ष द्यावे. शाळा-महाविद्यालयांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबवावी. जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे व्यसनमुक्तीविषयक कार्यक्रमांचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

सांगली

अन्न व औषध प्रशासनाने औषध विक्री केंद्रांची तपासणी करून तेथील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री करावी. तसेच अमली पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या संभाव्य रासायनिक घटकांचे उत्पादन, साठवणूक आणि वाहतुकीवर उद्योग विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने नियमित लक्ष ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.

हेदेखील वाचा : सांगली जिल्हा वृत्त : कवठेमहांकाळच्या देशिंगमध्ये 70 फूट खोल विहिरीत बुडून महिला आणि दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू; आकाशातून कोसळला सात ते आठ किलोचा बर्फाचा गोळा

प्रत्येक तालुक्यात व्यसनमुक्ती उपचार सुविधा

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व्यसनमुक्ती उपचार सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. ‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत ग्रामपंचायती आणि गावांमध्ये अमली पदार्थविरोधी शपथ कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्यसनमुक्तीविषयक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.

महसूल, वन आणि कृषी विभागाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने अमली पदार्थांच्या अवैध लागवडीच्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी आणि डिजिटल सर्वेक्षण करावे. अशा अवैध लागवडीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी संयुक्त कारवाई करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

सांगली जिल्हा मध्यम गुन्हेप्रमाणाच्या गटात

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले की, अमली पदार्थांच्या गुन्ह्यांच्या प्रमाणानुसार राज्यातील जिल्ह्यांची तीन गटांत विभागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश मध्यम गुन्हेप्रमाण असलेल्या ‘गट ब’ मध्ये करण्यात आला आहे. या अभियानाचा कालावधी १ नोव्हेंबर २०२६ ते ३० एप्रिल २०२७ असा निश्चित करण्यात आला आहे.

अमली पदार्थमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस दलासोबत जिल्हा प्रशासन, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. सर्व विभागांनी बैठकीत दिलेल्या सूचनांची गांभीर्याने अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

२०२६ मध्ये १६२ गुन्हे; १९२ आरोपींवर कारवाई

बैठकीत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सन २०२६ मध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत सांगली जिल्ह्यात एकूण १६२ गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणांत १९२ आरोपींवर अटक अथवा नोटीसद्वारे कारवाई करण्यात आली आहे. तसेच अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरोधात १३३ गुन्हे दाखल करून १५९ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.

नशामुक्त भारत अभियानाचाही आढावा

या बैठकीत नशामुक्त भारत अभियान (NMBA) आणि मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना (NAPDDR) यांच्या जिल्हास्तरीय कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. नशामुक्त भारत अभियानाच्या सहाव्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम तसेच २६ नोव्हेंबर रोजी राबविण्यात येणाऱ्या जनजागृती उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.

अमली पदार्थांविरोधातील लढा केवळ पोलिसांपुरता मर्यादित न ठेवता तो सामाजिक चळवळ बनविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने विविध विभागांच्या समन्वयातून व्यापक उपाययोजना राबविण्याचे नियोजन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *