लंगरपेठ पीएमश्री शाळेत हिवाळी शिबिर

लंगरपेठ येथील पीएमश्री जिल्हा परिषद शाळेत १४ ते १८ नोव्हेंबरदरम्यान हिवाळी शिबिराचे आयोजन. कथाकथन, चित्रकला, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कौशल्यविकास उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना मिळणार वाव.

सांगली : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी पीएमश्री जिल्हा परिषद शाळा, लंगरपेठ येथे हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १४ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत होणाऱ्या या शिबिरात कथाकथन, चित्रकला, बालसभा, मनोरंजनात्मक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध कौशल्यविकास उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महेश पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कौशल्याधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच स्वतःमधील सुप्त गुण ओळखण्याची आणि ते विकसित करण्याची संधी मिळते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा शिबिरांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.

उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात जीवन सावंत यांनी कथाकथनाचा कार्यक्रम सादर केला. आपल्या खुमासदार आणि विनोदी कथनशैलीतून त्यांनी विद्यार्थ्यांना हसवून मनोरंजन केले. या सत्रामुळे विद्यार्थ्यांना मनोरंजनातून आनंददायी शिक्षणाचा अनुभव मिळाला.

हेदेखिलवाचा : सांगली जिल्ह्यात गुन्हेगारीचा रक्तरंजित आलेख! वर्षभरात 61 खून; टोळीयुद्ध, नशेखोरीचा विळखा

दुसऱ्या सत्रात प्राची पाटील यांनी चित्रकलेविषयी मार्गदर्शन केले. रेखाचित्र काढण्याच्या विविध पद्धती, चित्रकलेतील बारकावे आणि कलात्मक अभिव्यक्तीचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि कलात्मक दृष्टिकोनाला प्रोत्साहन मिळाले.

लंगरपेठ पीएमश्री शाळेत हिवाळी शिबिर

या पाच दिवसीय शिबिरात बालसभा, कथाकथन, चित्रकला, रेखाचित्र, विविध कला, मनोरंजनात्मक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कौशल्यविकासाचे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत व्यवहारज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळणार आहे.

विद्यार्थ्यांमधील कल्पकता, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास विकसित करण्याबरोबरच सहकार्याची भावना, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, संवादकौशल्य आणि सामाजिक जाणीव वाढविण्यावर शिबिरात विशेष भर देण्यात येणार आहे. ‘कृतीतून शिक्षण आणि अनुभवातून ज्ञान’ या संकल्पनेवर आधारित या शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

यावेळी लंगरपेठचे उपसरपंच दत्तात्रय सूर्यवंशी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधाकर इमडे, उपाध्यक्ष दत्तात्रय जळकर, समितीचे सदस्य, सेवाज्येष्ठ शिक्षक विठोबा सूर्यवंशी, लंगरपेठ विकास सोसायटीचे संचालक गुलाब मुलाणी, ज्ञानू कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक उन्मेष शेटे यांच्यासह अनिल हंकारे, संभाजी सुतार, शिवाजी कदम, विद्या कदम, रमेश झिटे आणि सतीश गिरीबुवा आदी शिक्षक परिश्रम घेत आहेत. विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांत सहभागी करून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षकांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *