जत येथील राजे रामराव महाविद्यालयात इंदिरा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. विक्रम ढोणे यांनी इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाचा आणि महिला सक्षमीकरणातील योगदानाचा गौरव केला.
जत : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि भारतरत्न इंदिरा गांधी यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने भारतीय महिलांसाठी नेतृत्वाची नवी दालने खुली केली. प्रतिकूल परिस्थितीतही कणखर नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी भारतीय राजकारणात स्वतंत्र ठसा उमटविला, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा राजे रामराव महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विक्रम ढोणे यांनी केले.
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जत येथील राजे रामराव महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विक्रम ढोणे यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. कृष्णा के. रानगर होते.
हेदेखील वाचा: जतच्या दुष्काळाबाबत प्रशासनाला आमदार गोपीचंद पडळकरांचा सक्त इशारा
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ढोणे म्हणाले की, देशाच्या विकासासाठी घेतलेले धाडसी निर्णय, जागतिक राजकारणातील प्रभावी भूमिका आणि राष्ट्राप्रती असलेली निष्ठा यांमुळे इंदि-रा गांधी यांचे व्यक्तिमत्त्व भारतीय इतिहासात अजरामर झाले आहे. त्यांच्या जीवनप्रवासातून आजच्या युवा पिढीने नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य प्रा. कृष्णा के. रानगर म्हणाले की, इंदि-रा गांधी यांचे जीवन संघर्ष, जिद्द आणि कणखर नेतृत्वाचा प्रेरणादायी प्रवास आहे. भारतीय राजकारणात त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतंत्र स्थान निर्माण केले. राजकारणासह विविध क्षेत्रांत नेतृत्व करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी त्यांचे व्यक्तिमत्त्व आजही प्रेरणादायी आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
