जत/एकुंडी : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जत तालुक्यात विविध शाळांमध्ये देशभक्तीपर कार्यक्रमांसह गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. एकुंडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शालांत परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, तर जत येथील जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक १ व मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक संभाजी कोडग यांचा लोकमत समूहाचा एक्सलन्स अवॉर्ड मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. स्वामी विवेकानंद ऑलिम्पियाड स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या महापुरुषांच्या वेशभूषेने स्वातंत्र्यदिन सोहळ्याची रंगत वाढवली.
एकुंडीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

एकुंडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मार्च २०२६च्या शालांत परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. गुणानुक्रमे सृष्टी बसवराज पाटील हिने प्रथम, चैतन्य विकास मोटे याने द्वितीय, तर विजय ईश्वर हेळकर याने तृतीय क्रमांक मिळविला.
मराठी आणि हिंदी विषयात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना ट्रॉफी, रोख रक्कम, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
आयर्विन टाइम्सचे संपादक, प्रिंट मीडिया, वेब पोर्टल व यूट्यूब माध्यमकर्मी तसेच मराठी साहित्य क्षेत्रातील लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या संकल्पनेतून गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
तसेच स्वर्गीय श्रीमती सजाबाई हरिबा पाटोळे यांच्या स्मरणार्थ मुख्याध्यापक कृष्णदेव पाटोळे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, रोख रक्कम व शाल देऊन सत्कार करण्यात आला. स्वर्गीय पिरगोंडा काडेश चौगुले सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीनेही विद्यार्थ्यांना ट्रॉफी व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास सरपंच सौ. निकिता कांबळे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय नाईक, सोसायटीचे चेअरमन श्रीमंत गुडोडगी, व्हाईस चेअरमन नीलकंठ नाईक, माजी व्हाईस चेअरमन मलगोंडा हेळकर, माजी सरपंच बसगोंडा कोटलगी, प्रवचनकार अशोक नाईक महाराज, ग्रामपंचायत सदस्य शिवानंद लठ्ठी, सोसायटी सदस्य रावसाहेब लठ्ठी यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्याध्यापक कृष्णदेव पाटोळे, शिक्षक संभाजी ओलेकर, लता ज्योत्सना शिंदे, विकास मोटे, इराप्पा चौगुले, संतोष वाघमोडे तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंभीरे, शिक्षक शेळके, वानखेडे, पावरा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंभीरे सर यांनी केले. चौगुले सर यांनी सूत्रसंचालन केले, तर गंभीरे सर यांनी आभार मानले.
मुख्याध्यापक संभाजी कोडग यांचा एक्सलन्स अवॉर्डबद्दल सत्कार

जत येथील जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक १ व मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक संभाजी कोडग यांना लोकमत समूहातर्फे एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष देवकर यांच्या हस्ते हा सत्कार झाला.
मुख्याध्यापक संभाजी कोडग आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांच्या प्रयत्नातून शाळेने गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेतही शाळेने तालुका व जिल्हास्तरावर लौकिक मिळविला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीवरही शाळेत भर दिला जात आहे.
यावेळी जत पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील बाबर, केंद्रप्रमुख शिंदे, दिनेश वसावे, पत्रकार बादल सर्जे, श्रीकृष्ण पाटील, शिवाजीराव जाधव, गणेश गिड्डे, बाळू चव्हाण, नगरसेवक इम्रान गवंडी यांच्यासह शिक्षक, पालक व मान्यवर उपस्थित होते.
महापुरुषांच्या त्यागातून देशभक्तीची प्रेरणा घ्या

जत येथील स्वामी विवेकानंद ऑलिम्पियाड स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना दिनराज वाघमारे यांनी, स्वातंत्र्यसैनिक आणि महापुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग, संघर्ष व बलिदान विद्यार्थ्यांनी स्मरणात ठेवून त्यांच्या विचारांतून देशभक्तीची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
संस्थेचे खजिनदार प्रा. तुकाराम सन्नके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्याचा खरा अर्थ केवळ उत्सव साजरा करण्यात नसून देशाप्रती असलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यात असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत शिस्त, सामाजिक बांधिलकी, संस्कार आणि राष्ट्रप्रेम जोपासावे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा साकारल्या. देशभक्तिपर गीत, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. महापुरुषांच्या वेशभूषेतील चिमुकले कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी प्रतिक बोबडे, शाळेच्या समन्वयक सायली सोनावणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जत तालुक्यातील या विविध कार्यक्रमांतून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, गुणवंतांचा गौरव आणि विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जोपासण्याचा संदेश अधोरेखित झाला.
