जतला नावाची नव्हे, विकासाची ओळख हवी!

जतला ‘देवभूमी’ नाव देण्याची मागणी चर्चेत असताना पाणी, शेती, रोजगार, उद्योग, शिक्षण, क्रीडा आणि पर्यटनाच्या विकासाला प्राधान्य देण्याची गरज आहे. जतची खरी ओळख नावात नव्हे, तर विकास आणि कर्तृत्वात निर्माण झाली पाहिजे.

जत तालुका म्हटले की डोळ्यांसमोर उभा राहतो तो दुष्काळाशी दोन हात करणारा कष्टकरी शेतकरी, डाळिंबाच्या बागा, ज्वारी-बाजरीची शेती, ऐतिहासिक वारसा, श्रद्धास्थाने आणि आपल्या मातीशी घट्ट नाळ जोडलेला स्वाभिमानी समाज. जतचा इतिहास जितका प्राचीन, तितक्याच त्याच्या विकासाच्या अपेक्षाही जुन्या आहेत. आज मात्र या तालुक्याच्या नावाला ‘देवभूमी’ जोडण्याच्या मागणीवरून राजकीय आणि सामाजिक चर्चा रंगली आहे.

‘देवभूमी जत’ हे नाव भावनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या आकर्षक असू शकते. जतच्या गावागावांत असलेली प्राचीन मंदिरे, देवस्थाने, शिलालेख आणि ऐतिहासिक ठेवा निश्चितच या भूमीचे वैशिष्ट्य सांगतात. माडग्याळ, उमराणी, बनाळी यांसारख्या परिसरात आढळणारा पुरातन वारसा जतच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देतो. प्रतापराव गुजर आणि बहलोलखान यांच्यातील संघर्षासारख्या ऐतिहासिक घटनांमुळे या भूमीला पराक्रमाची परंपराही लाभली आहे. म्हणून जतला ‘देवभूमी’ म्हणण्याची भावना चुकीची आहे, असे म्हणता येणार नाही. प्रश्न मात्र इतकाच आहे की नाव बदलल्यानंतर जतच्या जनतेच्या आयुष्यात काय बदलणार आहे?

आज जतसमोरचा सर्वात मोठा प्रश्न नामांतराचा नाही; तो आहे पाण्याचा. वर्षानुवर्षे ज-तच्या जनतेने पाण्यासाठी संघर्ष केला. मोठ्या जलसिंचन योजनांच्या घोषणा झाल्या. महिशाळ, बबलेश्वर यांसारख्या योजनांमुळे आशा निर्माण झाल्या. मात्र योजना जाहीर होणे आणि त्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणे यात मोठे अंतर आहे. हे अंतर जोपर्यंत भरून निघत नाही, तोपर्यंत जतच्या विकासाची चर्चा अपुरीच राहणार.

ज-तचा शेतकरी पाण्याची वाट पाहत असताना त्याला ‘देवभूमी’ या नावाचा अभिमान नक्कीच वाटेल; पण त्याच्या शेतात पाणी आले, उत्पादनाला योग्य बाजार मिळाला आणि कष्टाचे उत्पन्न वाढले, तर तो अभिमान अधिक दृढ होईल.

ज-तचे हवामान डाळिंब, ज्वारी, बाजरी आणि द्राक्ष यांसारख्या पिकांसाठी उपयुक्त आहे. डाळिंब उत्पादनाने तालुक्याला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. द्राक्ष उत्पादकांनीही प्रतिकूल परिस्थितीत आपली क्षमता सिद्ध केली आहे. मग या कृषी सामर्थ्यावर आधारित प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज, पॅकिंग, निर्यात केंद्रे आणि मूल्यवर्धन उद्योग का उभे राहू नयेत? शेतमाल पिकविणारा जत जर त्यावर प्रक्रिया करून त्याची किंमत वाढवू लागला, तर रोजगाराची नवी दारे उघडू शकतात. यासाठी एमआयडीसीची चर्चा केवळ कागदावर राहता कामा नये. उद्योग आले तरच रोजगार येईल, रोजगार आला तरच युवकांचे स्थलांतर कमी होईल आणि रोजगारासोबत बाजारपेठ, शिक्षण, वाहतूक आणि इतर सेवांचाही विस्तार होईल.

हेदेखील वाचा: सरकारी शाळांची घटती पटसंख्या : शिक्षण व्यवस्थेसमोरील गंभीर इशारा; चार वर्षांत जवळपास 17 टक्के विद्यार्थ्यांनी सरकारी शाळांपासून ठेवले अंतर

ज-तच्या विकासाची दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे शिक्षण आणि कौशल्य विकास. ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या शिक्षणासाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. स्पर्धा परीक्षा, तांत्रिक शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण, संगणक शिक्षण आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची दर्जेदार केंद्रे तालुक्यातच निर्माण झाली, तर ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळू शकते. त्याचप्रमाणे खेळाकडेही गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. ज-तच्या मातीतून चांगले खेळाडू घडू शकतात. मात्र त्यासाठी मैदान, प्रशिक्षक, क्रीडा साहित्य आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणाची गरज आहे. स्पोर्ट्स अकॅडमी ही केवळ क्रीडाविषयक सुविधा नसून युवकांच्या भवितव्याची गुंतवणूक आहे.

नामांतराच्या मागणीला विरोध करणाऱ्यांचा मुख्य मुद्दा हाच आहे की, नाव बदलण्यापेक्षा विकासाला प्राधान्य द्यावे. हा प्रश्न राजकीय विरोधापुरता मर्यादित ठेवणे योग्य ठरणार नाही. कारण जनतेला पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, उद्योग, रोजगार आणि शेतीमालाला बाजारपेठ हवी आहे. त्याच वेळी ज-तच्या इतिहासाचा आणि धार्मिक-सांस्कृतिक वारशाचाही सन्मान हवा आहे. म्हणून ‘देवभूमी जत’ आणि ‘विकसित जत’ यांच्यात संघर्ष निर्माण करण्याची गरज नाही. उलट या दोन्ही संकल्पनांचा संगम करता येऊ शकतो.

ज-तला ‘देवभूमी’ म्हणायचे असेल तर तिच्या देवस्थानांचा पर्यटनदृष्ट्या विकास करा. ऐतिहासिक मंदिरांचे संवर्धन करा. पुरातत्त्वीय ठेव्याचे दस्तऐवजीकरण करा. धार्मिक पर्यटनाची साखळी उभी करा. स्थानिक युवकांना पर्यटन मार्गदर्शक, हस्तकला, खाद्यपदार्थ, वाहतूक आणि निवासव्यवस्थेत रोजगार द्या. मग ‘देवभूमी’ हा शब्द केवळ फलकावर राहणार नाही; तो अर्थव्यवस्थेलाही चालना देईल. राजकारणात मतभेद असणे स्वाभाविक आहे. मात्र ज-तच्या विकासाच्या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. नामांतराच्या बाजूने असणाऱ्यांनीही विकासाचा अजेंडा पुढे न्यावा आणि विरोध करणाऱ्यांनीही केवळ विरोधासाठी विरोध न करता पर्यायी विकास आराखडा मांडावा. ज-तला नावाची नवी ओळख हवी असेल तर ती स्वागतार्ह; पण त्याहून आधी कामाची नवी ओळख निर्माण झाली पाहिजे.

ज-तच्या शेतकऱ्याच्या शेतात पाणी, युवकाच्या हाताला रोजगार, विद्यार्थ्याच्या हातात दर्जेदार शिक्षण, खेळाडूच्या पायाखाली उत्तम मैदान, उद्योजकाला उद्योगाची संधी आणि इतिहासप्रेमीला जतन केलेला वारसा मिळाला, तर ‘देवभूमी जत’ ही संकल्पना खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल. शेवटी प्रश्न एवढाच— ज-तचे नाव काय असावे, यावर वाद कितीही झाला तरी जतचे भवितव्य कसे असावे, यावर एकमत कधी होणार?

आज ज-तला राजकीय घोषणांपेक्षा कृतीची गरज आहे. नाव बदलण्यापेक्षा नियती बदलण्याची गरज आहे. आणि ती नियती बदलणार आहे ती पाण्याच्या प्रत्येक थेंबाने, रोजगाराच्या प्रत्येक संधीने, शिक्षणाच्या प्रत्येक नव्या दालनाने आणि विकासासाठी एकत्र येणाऱ्या प्रत्येक हाताने. ज-तची खरी ओळख नावात नाही; ती तिच्या माणसांच्या कर्तृत्वात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *