साई पल्लवी, रश्मिका मंदाना, तमन्ना भाटिया, नयनतारा, राशी खन्ना, मृणाल ठाकूर यांसारख्या दक्षिणेतील अभिनेत्रींचा बॉलिवूडमधील वाढता प्रभाव जाणून घ्या.
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूड यांच्यातील नाते काही दशकांपासून घट्ट आहे. दक्षिणेतील कथानकं, कलाकार आणि चित्रपटांच्या शैलीचा बॉलिवूडवर प्रभाव पडत आला आहे; त्याचबरोबर दक्षिण भारतीय अभिनेत्रींचाही हिंदी चित्रपटसृष्टीकडे ओढा कायम राहिला आहे. चित्रपटसृष्टीचा इतिहास पाहिला, तर दक्षिण भारतातून आलेल्या अनेक अभिनेत्रींच्या अभिनयाने हिंदी चित्रपटांना वेगळी रंगत मिळाल्याचे दिसते.
१९६० आणि १९७०च्या दशकात वैजयंतीमाला, जे. जयललिता, बी. सरोजा देवी, लक्ष्मी यांसारख्या अभिनेत्री हिंदी चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. पुढे हेमा मालिनी, रेखा, जयाप्रदा आणि श्रीदेवी यांनी आपल्या अभिनय आणि व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत भक्कम स्थान निर्माण केले.
आता ‘पॅन इंडिया’ चित्रपटांची संकल्पना लोकप्रिय झाल्याने दक्षिण आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे सहकार्य आणखी वाढले आहे. त्यामुळे दक्षिणेतील अभिनेत्री हिंदी चित्रपटांत अधिक मोठ्या आणि महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. साई पल्लवीपासून नयनतारा, रश्मिका मंदाना, तमन्ना भाटिया आणि राशी खन्नापर्यंत अनेक अभिनेत्रींची नावे या यादीत आघाडीवर आहेत.
साई पल्लवी
साई पल्लवीने आमिर खान प्रॉडक्शनच्या ‘एक दिन’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या चित्रपटात आमिर खान यांचा मुलगा जुनैद खान तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत आहे.

यानंतर साई पल्लवी बहुप्रतीक्षित आणि बिग बजेट पौराणिक चित्रपट ‘रामायण’मध्ये सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. दोन भागांत तयार होणाऱ्या या चित्रपटाचा पहिला भाग दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
याशिवाय साई पल्लवी प्रसिद्ध गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारत आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील तिच्या आगामी प्रवासाकडे विशेष लक्ष लागले आहे.
तमन्ना भाटिया
‘बाहुबली : द बिगिनिंग’च्या माध्यमातून तमन्ना भाटियाने हिंदी पटातील प्रेक्षकांचेही लक्ष वेधून घेतले. अभिनयासोबतच तिच्या नृत्याचीही विशेष चर्चा झाली आहे.
‘स्त्री’मधील ‘आज की रात’, ‘जेलर’मधील ‘कावाला’ आणि ‘रेड’मधील ‘नशा’ यांसारख्या गाण्यांमधील तिच्या दमदार नृत्यामुळे तमन्ना विशेष लोकप्रिय ठरली. तिच्या ग्लॅमरस अंदाजासोबतच नृत्यकौशल्याचीही या गाण्यांमधून झलक पाहायला मिळाली.
आगामी काळात तमन्ना लोककथेवर आधारित ‘वी वन : फोर्स ऑफ द फॉ

रेस्ट’ या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत झळकणार आहे.
रश्मिका मंदाना
‘पुष्पा’ आणि ‘पुष्पा २’च्या यशानंतर रश्मिका मंदानाची लोकप्रियता देशभरात मोठ्या प्रमाणात वाढली. दक्षिण भारतीय चित्रपटांपासून सुरू झालेला तिचा प्रवास आता हिंदी चित्रपटसृष्टीतही विस्तारला आहे.
आगामी काळात रश्मिका तिचा पती विजय देवरकोंडासोबत ‘रणबली’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
याशिवाय अर्जुनसोबत ‘राका’ आणि ‘पुष्पा ३’ या चित्रपटांतही ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.
मृणाल ठाकूर
मृणाल ठाकूरने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाचा प्रवास विविध धाटणीच्या चित्रपटांमधून झाला आहे.
हृतिक रोशनसोबत ‘सुपर ३०’, जॉन अब्राहमसोबत ‘बाटला हाऊस’, फरहान अख्तरसोबत ‘तुफान’, कार्तिक आर्यनसोबत ‘धमाका’ आणि शाहिद कपूरसोबत ‘जर्सी’ या चित्रपटांत तिने भूमिका साकारल्या आहेत.
आगामी काळात मृणाल ‘सन ऑफ सरदार २’, हिंदी-तेलुगू भाषेत तयार होत असलेला ‘डकैत’, ‘तुम हो तो’ आणि ‘पूजा मेरी जान’ यांसह विविध चित्रपटांत दिसणार आहे. वरुण धवनसोबत ‘जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटातही तिची भूमिका आहे.
नयनतारा

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या नयनताराने शाहरुख खानसोबत ‘जवान’मधून हिंदी प्रेक्षकांमध्येही आपली छाप पाडली. चित्रपटातील तिच्या भूमिकेची विशेष चर्चा झाली.
यानंतर नयनतारा ‘टॉक्सिक’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली. आता ती सलमान खानसोबत एका पॅन इंडिया चित्रपटात काम करत आहे. त्यामुळे तिच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील पुढील वाटचालीकडेही प्रेक्षकांचे लक्ष आहे.
राशी खन्ना

तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेल्या राशी खन्नाने ‘मद्रास कॅफे’मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ‘योद्धा’मध्येही तिने भूमिका साकारली.
आता राशी खन्नाच्या हातात अनेक महत्त्वाचे प्रकल्प आहेत. अनीस बज्मी यांच्या आगामी कॉमेडी चित्रपटात ती अक्षय कुमार आणि विद्या बालनसोबत दिसणार आहे.
याशिवाय ‘फर्जी सीझन २’मध्ये शाहिद कपूरसोबत, ‘लाखों में एक’मध्ये विक्रांत मॅसीसोबत आणि यूकेच्या पार्श्वभूमीवर आधारित एका सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटात आर. माधवनसोबत ती झळकणार आहे.
कीर्ती सुरेश
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री कीर्ती सुरेशही हिंदी चित्रपटसृष्टीत आपली उपस्थिती मजबूत करत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेता राजकुमार रावसोबत ती एका अनामिक हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
कल्याणी प्रियदर्शन
कल्याणी प्रियदर्शनही आगामी हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. विविध प्रकल्पांबरोबरच ती रणवीर सिंहसोबत ‘प्रलय’ या चित्रपटातही दिसणार आहे.
दक्षिणेपासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास
दक्षिण भारतीय अभिनेत्रींचा हिंदी चित्रपटसृष्टीतील हा प्रवास केवळ भाषेच्या सीमा ओलांडणारा नाही, तर भारतीय चित्रपटसृष्टी अधिकाधिक एकसंध होत असल्याचेही तो दर्शवतो. ‘पॅन इंडिया’ चित्रपटांमुळे कलाकारांना विविध भाषांतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे दक्षिणेतील अभिनेत्रींच्या हिंदी चित्रपटांमधील सहभागाचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. येत्या काळात या दोन्ही चित्रपटसृष्टीतील सहकार्याचा विस्तार आणखी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.
