अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध ‘जलसा’ बंगल्याच्या मालकी हक्कावरून कौटुंबिक वाद निर्माण झाला आहे. संमतीशिवाय नाव हटवल्याचा रमोल बच्चन यांचा आरोप. प्रकरणाची चौकशी सुरू; अमिताभ आणि जया बच्चन यांच्याकडून खुलासा मागवला.
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील प्रसिद्ध ‘जलसा’ बंगल्याच्या मालकी हक्कावरून बच्चन कुटुंबात वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. अमिताभ बच्चन यांचे धाकटे बंधू अजिताभ बच्चन यांच्या पत्नी रमोल बच्चन यांनी त्यांच्या संमतीशिवाय बंगल्याच्या मालकी हक्कातून आपले नाव हटवून ते जया बच्चन यांच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे बॉलिवूडमधील बच्चन कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
१९९३ पासून मालकी हक्काचा वाद
रमोल बच्चन यांच्या दाव्यानुसार, हा संपूर्ण प्रकार १९९३ मधील असून, त्यांनी ‘जलसा’ बंगला कोणाच्या नावावर करण्यासाठी कधीही संमती दिली नव्हती. तसेच, यासंदर्भात कोणतेही अधिकृत दानपत्र (गिफ्ट डीड) तयार केले नव्हते. मात्र, २००६ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या अभय योजनेअंतर्गत या दानपत्राची नोंदणी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या योजनेत जुन्या दस्तऐवजांच्या नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क आणि दंडामध्ये सवलत देण्याची तरतूद होती.

सात महिन्यांपासून तक्रारींचा पाठपुरावा
या प्रकरणी रमोल बच्चन गेल्या सात महिन्यांपासून नोंदणी प्राधिकरणाकडे सातत्याने तक्रारी करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नोंदींमध्ये जया बच्चन यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, सरकारी मालमत्ता पत्रकावर (प्रॉपर्टी कार्ड) अद्याप त्यांचे स्वतःचे नाव कायम आहे. २०२६ मध्ये सरकारी अभिलेखांमधूनही आपले नाव हटवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हेदेखील वाचा मानसशास्त्रीय चित्रपटांचा बदलता चेहरा; अंधश्रद्धेकडून वास्तवाकडे प्रवास
अमिताभ आणि जया बच्चन यांच्याकडून खुलासा मागवला
या वादाची दखल घेत अंधेरी येथील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या उपनिबंधकांनी प्रकरणाची सुनावणी सुरू केली आहे. यासंदर्भात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. दुसरीकडे, पुणे येथील नोंदणी विभागाकडूनही २००६ मध्ये साध्या कागदावर तयार करण्यात आलेले दानपत्र अभय योजनेअंतर्गत नेमके कोणत्या आधारावर स्वीकारण्यात आले, याची चौकशी सुरू आहे.
बच्चन कुटुंबाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया नाही
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. अभिषेक बच्चन यांच्या प्रवक्त्याने मात्र हा कुटुंबाचा खासगी विषय असल्याचे सांगत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ‘जलसा’ बंगल्याच्या मालकी हक्कासंदर्भातील हा वाद आता चौकशीतून कोणते नवे तपशील समोर आणतो, याकडे लक्ष लागले आहे.
(विविध प्रसारमाध्यांवर आधारित)
