जत येथील कवी-गझलकार विनायक तथा सुरेश कुलकर्णी यांना ‘आभार वेदनांचे’ या गझलसंग्रहासाठी २०२६ चा राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे.
सांगली : प्रसिद्ध कवी आणि गझलकार तसेच जत येथील शब्दगंधर्व साहित्य परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विनायक तथा सुरेश कुलकर्णी यांना त्यांच्या ‘आभार वेदनांचे’ या गझलसंग्रहासाठी २०२६ चा राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे. गडचिरोली येथील नाट्यश्री संस्थेच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार संस्थेचे प्रमुख आणि ज्येष्ठ नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी नुकताच जाहीर केला.
विनायक कुलकर्णी यांचे आतापर्यंत तीन कवितासंग्रह आणि गझलसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत त्यांना यापूर्वीही विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या लेखनातून काव्य आणि गझल क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करतानाच त्यांनी जत तालुक्यातील साहित्य चळवळ समृद्ध करण्यासाठीही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

नवोदित आणि प्रस्थापित साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या साहित्यिक प्रतिभेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने त्यांनी ‘शब्दगंधर्व साहित्य परिवार’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. सध्या ते समरसता साहित्य परिषद, सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
१९९६ पासून त्यांनी अनेक अखिल भारतीय साहित्य संमेलनांमध्ये आपल्या कविता आणि गझल सादर केल्या आहेत. गेयता, भावस्पर्शी आशय आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर त्यांनी काव्यरसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. विविध साहित्य संमेलनांमधील त्यांच्या सहभागामुळे त्यांना रसिकप्रियता लाभली आहे.
‘आभार वेदनांचे’ या गझलसंग्रहाला महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार जाहीर
‘आभार वेदनांचे’ या गझलसंग्रहाला महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या साहित्यिक प्रवासातील आणखी एका मानाच्या शिरपेचात तुरा खोवला गेला आहे. या पुरस्काराबद्दल साहित्यिक, कवी आणि काव्यरसिकांकडून विनायक कुलकर्णी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
