lavani: पारंपरिक लावणी आणि ‘डीजे लावणी’तील नेमका फरक काय? शृंगार आणि अश्लीलतेची सीमारेषा, बदलती बाजारपेठ आणि लावणी कलेच्या संवर्धनासाठी काय गरजेचे आहे, जाणून घ्या.
लावणी म्हणजे केवळ नृत्य नव्हे. लावणी म्हणजे शब्द, सूर, ताल, अभिनय, भाव आणि प्रेक्षकांशी साधला जाणारा जिवंत संवाद. तिच्या मुळाशी कविता आहे आणि त्या कवितेला शरीर, आवाज आणि नजरेतून अर्थ देणारी कलाकार आहे. ढोलकी, तबला आणि हार्मोनियमच्या जिवंत साथीवर घुंगरांचा नाद मिसळतो आणि त्यातून लावणीचा अस्सल रंग खुलतो.
पारंपरिक लावणीमध्ये कलाकार एखादी ओळ पुन्हा पुन्हा सादर करते. मात्र प्रत्येक वेळी तिचा भाव बदलतो. कधी त्यात प्रेम असते, कधी विरह, कधी उपरोध, कधी खट्याळपणा, तर कधी सामाजिक भाष्य. ‘घोळवणे’ या तंत्रातून एकाच ओळीला वेगवेगळ्या भावछटांनी खुलवले जाते. वादकांचा ताल, प्रेक्षकांची दाद आणि कलाकाराची उत्स्फूर्तता—या सगळ्यांच्या परस्परसंवादातून लावणी जिवंत होते.
‘डीजे लावणी’ म्हणजे लावणीचे आधुनिक रूप आहे का?
याउलट आज लोकप्रिय होत असलेली ‘डीजे लावणी’ (lavani) ही बहुतांश वेळा रेकॉर्ड केलेल्या संगीतावर सादर होते. नऊवारी साडीच्या आधुनिक आवृत्त्या, उत्तर भारतीय किंवा पाश्चिमात्य पोशाख आणि मराठी चित्रपटगीते, मुजरा, बॉलिवूड तसेच पाश्चिमात्य संगीताच्या वेगवान रिमिक्सवर नृत्य—असे तिचे स्वरूप दिसते. पण या सादरीकरणातून लावणीची अनेक मूलभूत वैशिष्ट्येच गायब होतात. जिवंत वादक नाहीत, घुंगरांचा अर्थपूर्ण नाद नाही, काव्याला आवाजातून अर्थ देणारे गायन नाही, उत्स्फूर्त अभिनय नाही आणि कलाकार-वादक-प्रेक्षक यांच्यातील तो जिवंत संवादही नाही. काही कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांवर फुले, दुपट्टे किंवा पाणी उडवले जाते. कधी प्रेक्षकांना, अगदी मुलांनाही, रंगमंचावर बोलावले जाते. त्यात सोशल मीडिया व्हिडिओ आणि ‘व्हायरल कंटेंट’ला विशेष महत्त्व आले आहे. म्हणून एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणे गरजेचे आहे— ‘डीजे लावणी’ ही आधुनिक साधनांनी सादर केलेली पारंपरिक लावणी (lavani) नाही. ती लावणीच्या नावाचा आणि तिच्या काही दृश्य प्रतिमांचा आधार घेत विकसित झालेला स्वतंत्र व्यावसायिक नृत्यप्रकार आहे.
नाव एकच; पण कला वेगळी
गावच्या जत्रा असोत, दहीहंडीचे उत्सव असोत, राजकीय कार्यक्रम असोत किंवा खासगी समारंभ—‘डीजे लावणी’चे कार्यक्रम झपाट्याने वाढले आहेत. त्यांना मोठी गर्दीही होते. मात्र त्याचबरोबर ‘अश्लीलते’च्या तक्रारीही वाढत आहेत. १४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने सार्वजनिक मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी एक परिपत्रक जारी केले. लावणी (lavani) , डीजे लावणी, तमाशा, लोकनाट्य आणि जत्रांसारख्या कार्यक्रमांसाठी आयोजकांना स्क्रिप्ट, निवेदन किंवा संक्षिप्त कथानकाच्या आधारे ‘योग्यता प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंजूर मजकुरापेक्षा वेगळे सादरीकरण केल्यास कलाकारांवरही कारवाई होऊ शकते. पण प्रश्न असा आहे की, या प्रमाणपत्रात नेमके काय तपासले जाणार? ज्येष्ठ लावणी कलाकार मीराबाई पुणेकर यांचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे.

त्या विचारतात, “संक्षिप्त कथानक तपासणे ठीक आहे; पण कलाकारांचे पोशाख, घुंगरू आणि हावभाव कोण तपासणार? काय योग्य आणि काय अयोग्य, हे कोण ठरवणार आणि कशाच्या आधारावर?” हा प्रश्न केवळ एका कलाकाराचा नाही; तो संपूर्ण लावणी परंपरेसमोर उभा असलेला प्रश्न आहे.
शृंगार म्हणजे अश्लीलता नव्हे
लावणीमध्ये विविध रसांचा आविष्कार आहे. मात्र शृंगार रस हा तिच्या आत्म्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रेम, प्रणय, आकर्षण, इच्छा, विरह आणि मानवी भावनांच्या अनेक छटा लावणीने आपल्या खास शैलीत मांडल्या आहेत. लावणीच्या ( lavani) परंपरेत विवाहपूर्व आणि विवाहबाह्य प्रेम, मासिक पाळी, लैंगिक सुख, लैंगिक समस्या यांसारख्या विषयांवरही विनोद, स्पष्टपणा आणि नजाकतीने भाष्य झाले आहे. म्हणून केवळ एखाद्या शब्दाकडे किंवा हावभावाकडे पाहून लावणीला ‘अश्लील’ ठरवणे योग्य ठरेल का?
अश्लीलता आणि शृंगार यांच्यातील सीमारेषा अत्यंत सूक्ष्म आहे.
एखादे गीत सेन्सॉर करून त्यातील शब्द मंजूर करता येतील; पण कलाकाराच्या नजरेतील भाव हा व्यक्तिरेखेचा भाग आहे की सोशल मीडिया ‘क्लिक’ मिळवण्यासाठी केलेला अभिनय, हे कागदावरच्या स्क्रिप्टमधून कसे ठरवणार? याचबरोबर डीजेवरील बंदी आणि पारंपरिक वाद्यांचा अनिवार्य वापर याबाबतही सरकारची भूमिका स्पष्ट असणे आवश्यक आहे. शृंगाराला अश्लीलता समजण्याची चूक झाली, तर लावणीचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नातूनच तिच्या मुळावर घाव बसू शकतो.
लावणीत डीजे आला तरी का?
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरकारमान्य ५० हून अधिक संगीत बारी आजही कलाकारांना रोजगार देतात. नर्तक, गायक आणि वादक मिळून एका पथकात साधारण १५ कलाकार असू शकतात. कार्यक्रमातून मिळणारे उत्पन्न त्यांच्यात वाटले जाते. मात्र काळ बदलला आहे. कुशल वादकांची संख्या कमी होत आहे. तरुण पिढीतील अनेक संगीतकार या क्षेत्रात येण्यास तयार नाहीत. त्यात जिवंत वाद्यसंगीतावर कार्यक्रम सादर करणे खर्चिक आहे. अशा परिस्थितीत डीजे हा अनेक आयोजकांना स्वस्त आणि सोपा पर्याय वाटू लागला. प्रेक्षकाने कोणतेही गाणे मागितले, तरी ते क्षणार्धात उपलब्ध. वादकांची संख्या कमी. खर्च कमी. कार्यक्रम अधिक ‘फास्ट’ आणि ‘व्हिज्युअल’.

एका पार्टी मालकिणीने या बदलामागचे वास्तव अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितले— ‘आता कलेची कोणाला पर्वा आहे? लोकांना मुली नाचताना दिसल्या की ते खूश असतात.’ ही केवळ एका व्यक्तीची प्रतिक्रिया नाही. ती बदलत्या बाजारपेठेचे वास्तव सांगते. जयपूरचा मुजरा आपल्याला इशारा देतो. या संदर्भात जयपूरच्या मुजरा परंपरेचा अनुभवही विचार करण्यासारखा आहे.
चांदपोल परिसरात गेल्या दशकभरात डीजेने मोठ्या प्रमाणावर जिवंत संगीताची जागा घेतली. ७० वर्षांच्या तवायफ राणी खान यांनी सुरुवातीला या बदलाचे स्वागत केले होते. कारण वादक महाग होते आणि त्यांच्या मागण्याही अधिक होत्या. मात्र आता त्या मागे वळून पाहताना म्हणतात—’ फक्त नाचण्यात आनंद नाही. साजिंदे वाद्ये वाजवत असताना आणि आम्ही स्वतः गात असताना जी रंगत यायची, ती आता कुठे आहे? मशीन फक्त पैसे छापू शकते. कोठा मालक शकीला बानो मात्र अधिक व्यावहारिक भूमिका मांडतात— ‘आज लोक डीजेची मागणी करतात. टिकून राहायचे असेल, तर काळानुसार बदलावे लागेल.’ कलेसमोरचा खरा धोका इथेच आहे—प्रेक्षकांची मागणी आणि बाजारपेठेचा दबाव कलाकारांना त्यांच्या परंपरेपासून दूर नेत आहे.
अभिरुची कायद्याने निर्माण करता येत नाही
एखाद्या कलेवर बंदी घालून त्या कलेबद्दल रसिकता निर्माण करता येत नाही. लोकांनी बैठकीची लावणी (lavani) , घोळवणे, जिवंत गायन आणि कलाकार-वादक-प्रेक्षक यांच्यातील जिवंत संवाद अनुभवलेच नाहीत, तर पारंपरिक लावणी आणि स्वस्त रिमिक्समधील फरक त्यांना कसा कळणार? खऱ्या कलेची चवच कधी लागली नाही, तर तिची मागणी निर्माण कशी होणार?
अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांचे मत यासाठी महत्त्वाचे आहे— ‘बदल हा आतून झाला पाहिजे; बाहेरून लादलेल्या बंदीतून नव्हे. लोकांमध्ये चांगल्या कलेची अभिरुची निर्माण झाली पाहिजे. कलाकारांना कठोर प्रशिक्षण मिळाले पाहिजे. समाजाला लहानपणापासून कला शिक्षण मिळाले पाहिजे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कलाकारांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळाली पाहिजे.’ हीच कदाचित या समस्येची खरी दिशा आहे.
लावणीला तिचा सन्मान कधी मिळणार?
लावणी (lavani) कलाकारांपैकी अनेक जणी दलित, मुस्लिम, भटक्या आणि मातृसत्ताक समुदायांतून आलेल्या आहेत. शतकानुशतके त्यांनी महाराष्ट्राला *मनोरंजन दिले, समाजावर भाष्य केले आणि प्रेम, इच्छा व मानवी भावनांना व्यक्त करण्यासाठी निर्भीड भाषा दिली. पण समाजाने त्यांना आणि त्यांच्या कलेला नेहमीच तितका सन्मान दिला नाही. ही विसंगती आपण मान्य करायलाच हवी. लावणी (lavani) ही केवळ तमाशाचा भाग नाही. ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य हिस्सा आहे. जशी भजने आपली आहेत, कीर्तने आपली आहेत, ओव्या आणि पोवाडे आपले आहेत, तशीच लावणीही ( lavani ) आपली आहे. म्हणून प्रश्न केवळ ‘डीजे लावणीवर बंदी घालायची की नाही?’ एवढाच नाही.
खरा प्रश्न आहे— आपल्याला लावणी (lavani) चे केवळ बाह्य रूप वाचवायचे आहे की तिचा आत्माही जपायचा आहे? बंदीने कदाचित कार्यक्रम थांबतील; पण *कलेची अभिरुची निर्माण होणार नाही. त्यासाठी कलाकारांना प्रशिक्षण, पारंपरिक वादकांना प्रोत्साहन, लोककलेला व्यासपीठ, शाळांपासून कला शिक्षण आणि कलाकारांना सामाजिक प्रतिष्ठा देणे आवश्यक आहे. कारण लावणी ( lavani )वाचवायची असेल, तर लावणीच्या नावावर चालणाऱ्या बाजारपेठेवर केवळ नियंत्रण ठेवून भागणार नाही; लावणीची खरी ओळख पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावी लागेल. आणि कदाचित त्यानंतरच ढोलकीचा ठेका, घुंगरांचा नाद आणि लावणीच्या शब्दांतील तो अस्सल मराठी शृंगार पुन्हा एकदा मनापासून ऐकू येईल.
