जॉनी लिव्हर यांचा 45 वर्षांचा संघर्ष

जॉनी लिव्हर यांनी ४५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांतून प्रेक्षकांना खळखळून हसवले. संघर्ष, यश-अपयश, बंदी, बदलती चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांचे प्रेम यांचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या.

विनोदाच्या दुनियेत काही कलाकार येतात आणि जातात; पण काही जण काळाच्या पलीकडे जाऊन प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करतात. जॉनी लिव्हर हे त्यापैकीच एक. जुन्या काळातील मेहमूद, किशोर कुमार यांसारख्या दिग्गजांनंतर विनोदी कलाकार म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे जॉनी लिव्हर यांनी १४ ऑगस्ट रोजी वयाची ७० वर्षे पूर्ण केली. तब्बल ४५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी चित्रपटसृष्टीत काम केले. या प्रदीर्घ प्रवासात यश आले, अपयशही आले; कामाचा ओघ कमी झाला, काही काळ बंदीचाही सामना करावा लागला. मात्र प्रेक्षकांचे प्रेम आणि आपल्या कलेवरील निष्ठा यामुळे ते आजही तितकेच लोकप्रिय आहेत.

जॉनी लिव्हर यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. कारखान्यात काम करणारा एक साधा कामगार ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी कलाकार—हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. स्वतः जॉनी लिव्हर म्हणतात, “मी जमिनीवरून आलो आहे. देवाने मला विनोदाची कला दिली. कामगार म्हणून ज्या प्रामाणिकपणाने आणि मेहनतीने काम केले, त्याच शंभर टक्के प्रामाणिकपणाने मी चित्रपटांमध्येही काम केले.” ३०० हून अधिक चित्रपट केल्यानंतरही त्यांच्या कामातील उत्साह पहिल्या चित्रपटाइतकाच आहे. पैसा, प्रसिद्धी किंवा पुरस्कार यांच्यामागे त्यांनी कधी धाव घेतली नाही. उलट, “इतकी वर्षे प्रेक्षकांनी प्रेम दिले आणि आजही त्यांना माझे काम पाहायचे आहे, यापेक्षा मोठा पुरस्कार कोणता?” अशी त्यांची भावना आहे.

कल्याणजी-आनंदजी ठरले मार्गदर्शक

जॉनी लिव्हर यांच्या कारकिर्दीला योग्य दिशा देण्यात संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांचा मोठा वाटा आहे. एका मित्राने जॉनी यांना कल्याणजींकडे नेले. त्यांच्या विनोदी प्रतिभेची झलक पाहिल्यानंतर ते कल्याणजी-आनंदजी यांच्या कार्यक्रमांचा भाग बनले. त्यावेळी कॅमेरा म्हणजे काय, चित्रपटाचे तंत्र काय, याचीही जॉनी यांना फारशी माहिती नव्हती. पण कल्याणजी सतत त्यांच्याशी चित्रपटांविषयी चर्चा करत. त्या वेळी त्यांचे बोलणे पूर्णपणे समजत नसले तरी पुढे याच संवादातून जॉनी यांच्या कलाविश्वाला नवी दिशा मिळाली. १९८१ मध्ये ‘ये रिश्ता ना टूटे’ या चित्रपटातून त्यांना पहिली मोठी संधी मिळाली. त्यानंतर ‘होप ८६’ हा कार्यक्रम त्यांच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा ठरला. तब्बल सात तासांचा हा भव्य कार्यक्रम पाहण्यासाठी राज कपूरपासून संपूर्ण चित्रपटसृष्टी उपस्थित होती. कार्यक्रमातील एका स्किटला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा आनंदजींनी अँकर अमजद खान यांना जॉनी लिव्हर यांना स्टेजवर पाठवण्यास सांगितले. जॉनी स्टेजवर आले आणि काही क्षणांतच वातावरण हास्याने दुमदुमून गेले. जितेंद्र आणि ऋषी कपूर यांच्यासह प्रेक्षकांनी ‘वन्स मोअर’ची मागणी केली. कार्यक्रमानंतरच्या चर्चेत अमिताभ बच्चन आणि जॉनी लिव्हर यांच्या सादरीकरणाची विशेष दखल घेण्यात आली.

जॉनी लिव्हर यांचा 45 वर्षांचा संघर्ष

मेहमूद आणि देव आनंद यांच्यासोबतचा अनुभव

मेहमूद हे जॉनी लिव्हर यांच्या आवडत्या कलाकारांपैकी एक. कल्याणजी-आनंदजी यांच्या अनेक कार्यक्रमांमुळे दोघांची ओळख झाली होती. मेहमूद यांच्या दिग्दर्शनाखाली ‘दुश्मन दुनिया का’ या चित्रपटात काम करण्याची संधी जॉनी यांना मिळाली. देव आनंद यांच्याबरोबरचा अनुभव मात्र त्यांच्यासाठी स्वप्नवत होता. “देव साहेबांकडून दिग्दर्शित होणे हेच माझ्यासाठी स्वप्नासारखे होते,” असे ते सांगतात.

विनोदाच्या चौकटीबाहेरही पाऊल

विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या जॉनी लिव्हर यांनी आता वेगळ्या धाटणीच्या भूमिकांकडेही मोर्चा वळवला आहे. सबसे बड़ा रुपैया या चित्रपटात ते प्रमुख भूमिकेत दिसणार असून, चित्रपटात विनोद असला तरी त्याचा प्रकार पूर्णपणे वेगळा आहे. पुरस्कार आणि राष्ट्रीय सन्मानांबाबत त्यांचा दृष्टिकोनही तितकाच सहज आहे. ज्यावेळी मिळायचा असेल, त्यावेळी मिळेल. नाही मिळाला तरी काही हरकत नाही. लोकांचे प्रेम कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहे, असे ते स्पष्टपणे सांगतात. १९९३ मधील बाजीगर हा जॉनी लिव्हर यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा. बाबूलाल ही व्यक्तिरेखा आजही त्यांच्या आवडत्या भूमिकांपैकी एक आहे. मात्र बाजीगरनंतर त्यांचा प्रवास कायमच यशस्वी राहिला, असे नाही. २००० नंतर अनेक वर्षे त्यांच्याकडे कामाची कमतरता होती. पण प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात चढ-उतार येतात, हे त्यांनी स्वीकारले. रोहित शेट्टी यांच्या ‘ऑल द बेस्ट’ आणि ‘गोलमाल ३’ या चित्रपटांनी पुन्हा त्यांच्या कारकिर्दीला वेग दिला. आपल्या या काळाची तुलना ते प्रभू श्रीरामांच्या १४ वर्षांच्या वनवासाशी करतात. “प्रत्येक कलाकाराला कमी-अधिक काळातून जावे लागते. अगदी प्रभू श्रीरामांनाही १४ वर्षे वनवास भोगावा लागला होता,” असे ते हसत सांगतात.

हेदेखील वाचा: ‘उपकार’ : 24 तासांत जन्मलेली आणि इतिहासात अजरामर ठरलेली देशभक्तीची गाथा/ A Saga of Patriotism Immortalized in History

‘विनोद’ ही केवळ चेहऱ्याची कसरत नाही!

जॉनी लिव्हर यांच्या मते चांगला विनोद हा केवळ कलाकाराच्या अभिनयावर अवलंबून नसतो. त्यासाठी उत्तम पटकथा, सक्षम दिग्दर्शक आणि कलाकाराचा प्रभावी अभिनय—या तिन्हींचा सुंदर मेळ आवश्यक असतो. त्यांना आजच्या चित्रपटसृष्टीबद्दल एक खंतही आहे. पूर्वी कलाकार आणि तंत्रज्ञ आपल्या कामासाठी भरपूर वेळ देत असत. चित्रपट १०० आठवडे चालत असत. आता मात्र अनेक चित्रपट काही दिवसांतच थिएटरमधून गायब होतात. त्यामुळे कामात पूर्वीसारखी मेहनत आणि गुंतवणूक कमी झाली आहे, असे त्यांना वाटते. मात्र स्वतःच्या कामाबाबत ते तडजोड करत नाहीत. लेखकाने व्यक्तिरेखा लिहिली म्हणून ती तशीच साकारायची, यावर त्यांचा विश्वास नाही. उलट व्यक्तिरेखेत स्वतःचे काहीतरी योगदान असावे, असे त्यांना वाटते. अनाड़ी नंबर १मधील दलेर मेहंदीच्या व्यक्तिरेखेचे उदाहरण ते देतात. ती व्यक्तिरेखा त्यांनी स्वतःच्या कल्पनेतून अधिक रंगतदार केली.

जॉनी लिव्हर यांचा 45 वर्षांचा संघर्ष

रोहित शेट्टींचा एकच सवाल—‘आणखी काय करू शकतोस?’

प्रियदर्शन आणि रोहित शेट्टी हे दोघेही विनोदाची उत्तम जाण असलेले दिग्दर्शक असल्याचे जॉनी सांगतात. प्रियदर्शन एखादा प्रसंग स्वतः करून दाखवतात. चेहऱ्यावरील हावभावापासून संवादफेकीपर्यंत प्रत्येक बारकावा ते समजावून सांगतात. रोहित शेट्टी मात्र जॉनी लिव्हर यांना सतत आव्हान देत राहतात—“आणखी काय करू शकतोस?” याच प्रश्नातून कलाकाराच्या कल्पनाशक्तीला नवी चालना मिळते. जॉनी यांच्या मते, दिग्दर्शकाने कलाकाराला प्रेरणा दिली की कलाकारही स्वतःचा विचार वापरून व्यक्तिरेखा अधिक प्रभावी बनवतो. कारण शेवटी प्रेक्षकांशी नाते जोडण्याची जबाबदारी कलाकाराचीच असते.

विनोदी कलाकारांसाठी बदललेले चित्र

पूर्वी चित्रपटांमध्ये स्वतंत्र विनोदी ट्रॅक असायचे. नायकापासून खलनायकापर्यंत अनेक कलाकार विनोद करायचे, पण स्वतंत्र विनोदी कलाकाराची जागा ठळक होती. नंतर मात्र नायक आणि खलनायकही विनोदी प्रसंग करू लागले आणि स्वतंत्र कॉमेडी ट्रॅक हळूहळू कमी झाले. या बदलाच्या काळातही जॉनी लिव्हर टिकून राहिले, त्याचे श्रेय ते स्वतःच्या योगदानाला देतात. तुम्ही एखाद्या व्यक्तिरेखेत काही भर घालू शकत असाल, तर तुम्हाला कोण नाकारेल?’ हा त्यांचा साधा पण महत्त्वाचा प्रश्न आहे.

बंदी आली, तरी विनोद थांबला नाही!

जॉनी लिव्हर यांच्या कारकिर्दीत एक काळ असा आला, जेव्हा त्यांच्या एका कार्यक्रमामुळे मध्य-पूर्वेतील काही लोक नाराज झाले. त्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांच्या संघटनेने त्यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. मध्य-पूर्व हा मोठा बाजार असल्याने निर्माते दबावाखाली होते. मात्र जॉनी यांनी हार मानली नाही. “माझे कार्यक्रम आणि प्रादेशिक चित्रपट आहेत. त्यावर मी काम करू शकतो,” असे त्यांनी सांगितले. नंतर ज्या प्रदेशात त्यांच्यावर बंदी होती, तिथे पाठवल्या जाणाऱ्या चित्रपटांच्या प्रिंटमधून त्यांची दृश्ये काढून टाकली जाऊ लागली. तरीही त्यांनी आपला प्रवास सुरूच ठेवला.

जॉनी लिव्हर यांचा 45 वर्षांचा संघर्ष

धर्म आणि विनोद : काळजीपूर्वक पाऊल

जॉनी लिव्हर यांनी विविध धर्म आणि व्यवसायांतील व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. मात्र बदलत्या सामाजिक वातावरणामुळे आता विनोद करताना अधिक सावध राहावे लागते, असे ते मान्य करतात.
“आज एखादा ख्रिश्चन कलाकार पुजारी, मियाभाई किंवा ख्रिश्चन व्यक्तिरेखा साकारतो, तरी काही लोकांना त्यात धर्माची खिल्ली उडवल्याचे दिसते,” असे ते म्हणतात. म्हणूनच अनावश्यक धोके घेणे त्यांनी कमी केले आहे. व्यवसाय किंवा व्यावसायिक व्यक्तिरेखा साकारण्याबाबत मात्र त्यांना विशेष अडचण वाटत नाही.

४५ वर्षांचा एकच मंत्र—कामावर प्रेम करा!

जॉनी लिव्हर यांच्या ४५ वर्षांच्या कारकिर्दीकडे पाहिले, तर एक गोष्ट ठळकपणे जाणवते— त्यांनी यशाचा पाठलाग केला नाही; त्यांनी आपल्या कलेचा पाठलाग केला. पुरस्कार मिळाले नाहीत, तरी प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. काम कमी झाले, तरी त्यांनी हार मानली नाही. बंदी आली, तरी विनोदाची साथ सोडली नाही. नवीन पिढी आली, तरी त्यांनी स्वतःला बदलत्या काळाशी जुळवून घेतले. आज वयाची ७० वर्षे पूर्ण करूनही त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि कामाविषयीची भूक कायम आहे. कदाचित म्हणूनच जॉनी लिव्हर केवळ एक विनोदी कलाकार राहिलेले नाहीत; ते भारतीय मनोरंजनविश्वातील हास्याचे एक जिवंत विद्यापीठ बनले आहेत.
-मच्छिंद्र ऐनापुरे जत जि. सांगली ७०३८१२१०१२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *