सांगलीतील कृष्णा घाट खून प्रकरण

सांगलीच्या कृष्णा घाट खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘आर. के. गँग’वर पोलिसांची मोठी कारवाई. टोळीप्रमुख राकेश कांबळेसह ८ जणांवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाईला मंजुरी; २ विधीसंघर्षग्रस्त बालकांचाही समावेश.

आयर्विन टाइम्स
सांगली : सांगली शहरातील कृष्णा घाट परिसरात झालेल्या खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कुख्यात ‘आर. के. गँग’वर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. टोळीप्रमुख राकेश शामराव कांबळे याच्यासह आठ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का–MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी या कारवाईच्या प्रस्तावास मंजुरी दिली. या कारवाईत दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचाही समावेश आहे.

टोळीप्रमुख राकेश कांबळे (वय ३१, रा. न्यू टिंबर एरिया, सांगली) याने साथीदारांसह संघटित गुन्हेगारी टोळी निर्माण केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. सांगली शहर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१६ ते २०२६ या कालावधीत या टोळीने खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणे, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे तसेच अवैध देशी दारू विक्री यांसारखे गंभीर गुन्हे केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. आर्थिक फायदा आणि परिसरात वर्चस्व निर्माण करण्यासाठी टोळीकडून हिंसाचाराचा वापर केला जात असल्याचेही तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सांगलीतील कृष्णा घाट खून प्रकरण

आठ जणांवर मोक्का

मोक्का कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये राकेश शामराव कांबळे, लखन पंडीत इसरडे (३५, रा. न्यू टिंबर एरिया), कृष्णा उर्फ मुक्या कुटनाप्पा कांबळे (२५, रा. भीमनगर), करण किशोर शिंदे (२७, रा. भीमनगर), महेश विजय नाटेकर (१९, रा. टिंबर एरिया), सुनिल उर्फ मुक्या निलाप्पा खडते (३८, रा. टिंबर एरिया) यांच्यासह दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे.

हेदेखील वाचा: sangli crime : सांगलीत 300 किलो गांजा जप्त; 1 कोटी 75 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पोलिसांच्या प्रस्तावाला मंजुरी

सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी सहाय्यक संचालक सरकारी अभियोक्ता उज्ज्वला थोरात यांच्या अभिप्रायानंतर मोक्का कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्याकडे सादर केला होता. पोलीस अधीक्षकांच्या शिफारशीनंतर विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी प्रस्तावास मंजुरी दिली.
या गुन्ह्याचा पुढील तपास ईश्वरपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या कारवाईनंतर टोळीच्या गुन्हेगारी कारवायांशी संबंधित इतर बाबींचाही तपास होण्याची शक्यता आहे.

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर, पोहेकॉ बसवराज शिरगुप्पी, दीपक गट्टे, विनायक शिंदे, पोकॉ गणेश कांबळे आणि गणेश कोळेकर यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *