जत तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात नेत्यांची पोलीस महानिरीक्षकांकडे मागणी, दुष्काळामुळे चारा छावण्या व टँकरची मागणी, शेड्याळला 24 हजार लिटर टँकर मंजूर, माडग्याळ मेंढीच्या कोकराला ₹2.60 लाखांचा विक्रमी भाव, तसेच गुन्हेगारीच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या.
जतच्या अवैध धंद्यांविरोधात माजी आमदार आक्रमक; विलासराव जगताप, विक्रमसिंह सावंत, प्रकाश जमदाडे यांनी घेतली पोलीस महानिरीक्षकांची भेट
जत : तालुक्यातील विविध गावांत सुरू असलेला अवैध जुगार, मटका, दारूविक्री, अमली पदार्थांची विक्री व तस्करी, खासगी सावकारीसह अन्य अवैध व्यवसायांविरोधात माजी आमदार विलासराव जगताप, विक्रमसिंह सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक राजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन अवैध धंद्यांवर कठोर कारवाईची मागणी केली.
वाढत असलेल्या अवैध व्यवसायांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. अवैध व्यवसायांमुळे युवा पिढी व्यसनांच्या विळख्यात जात आहे. अनेक कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक जीवन उद्ध्वस्त होत असल्याचेही निवेदनातून मांडण्यात आले.
या पार्श्वभूमीवर, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली विशेष पोलिस पथक नियुक्त करावे, संशयित ठिकाणी अचानक छापे टाकून कठोर कारवाई करावी, अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या मुख्य सूत्रधारांवरही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. जत तालुका अवैध व्यवसायमुक्त, सुरक्षित आणि भयमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कोणत्याही राजकीय अथवा आर्थिक दबावाला बळी न पडता निःपक्षपाती व ठोस कारवाई करावी, अशी भूमिका मांडण्यात आली.
भेटीदरम्यान तालुक्यातील अवैध व्यवसायांमुळे निर्माण झालेल्या सामाजिक प्रश्नांसह युवा पिढीवर होणारा परिणाम, अनेक कुटुंबांच्या आर्थिक-सामाजिक जीवनावर होणारे दुष्परिणाम याकडेही लक्ष वेधण्यात आले.
माजी सभापती सुजय शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक राम सरगर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाबासाहेब कोडग, काँग्रेस तालुकाध्यक्ष महादेव पाटील, युवराज निकम, नीलेश बामणे, पिरप्पा माळी, सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे, निंगाप्पा कोरे आदी उपस्थित होते.
जत तालुक्यात चारा छावण्या सुरू करा; जिल्हाधिकाऱ्याकडे शिवसेनेची मागणी
जत,(प्रतिनिधी) : पावसाअभावी जत तालुक्यातील खरीप पेरा वाया गेला आहे. चारा व पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. याकारणास्तव तालुक्यातील गावोगावी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शिवसेनेचे विधानसभा प्रमुख महादेव हिंगमिरे, युवा सेना विधानसभा प्रमुख प्रवीण अवरादी यांच्यासह शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. जतमध्ये प्रांताधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. पिके जळून गेली आहेत. विहिरी, तलाव आटले आहेत. चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून जनावरांचे हाल सुरू आहेत. महावितरणचा मनमानी कारभार सुरू आहे. दुष्काळातही वीज कंपनीकडून वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे. पाणी असूनही विजेअभावी ते देता येत नाही. ज्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
तालुक्यातील शेतकरी आणि पशुधन वाचवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत. तालुक्यात गावनिहाय चारा छावण्या व टँकर सुरू करावेत. महावितरणला कडक निर्देश देऊन शेतीचा वीजपुरवठा खंडित न करता तो सुरळीत व पूर्ण दाबाने सुरू ठेवावा, अशी मागणी केली आहे.
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराप्रकरणी एकावर गुन्हा
जत : अल्पवयीन मुलीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेश बसाप्पा चौगुले (रा. उटगी, ता. जत) याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला तीन दिवस कोठडी सुनावली. पीडित मुलगी अल्पवयीन असून संशयित महेश बसाप्पा चौगुले (रा. उटगी, ता. जत) याने मागील सुमारे दोन वर्षांपासून पीडित मुलीशी संपर्क ठेवला. या कालावधीत शेतामध्ये तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे पीडित मुलगी गरोदर झाल्याचेही पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून उमदी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
जतमध्ये बस स्थानक परिसरात १.१६ लाखांचे दागिने पळवले
जत: जत बस स्थानक परिसरात ५२ वर्षीय महिलेची फसवणूक करून तिच्या अंगावरील सुमारे १ लाख १६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना घडली. ११ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. याप्रकरणी १३ दिवसांनंतर जत पोलिस ठाण्यात दोघा अनोळखींवरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सखुबाई भीमराव नवले (वय ५२, बनाळी, ता. जत) यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ च्या सुमारास त्या जत बस स्थानकाबाहेर उभ्या असताना दोघा अनोळखींनी त्यांची फसवणूक केली. यामध्ये त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेण्यात आले. चोरून नेलेल्या दागिन्यांची किंमत १ लाख १६ हजार रुपये आहे.
घटनांनंतर सोमवारी (ता. २४) रात्री साडेआठच्या सुमारास जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) अन्वये गुन्ह्याची नोंद झाली आहे. दोघे संशयित अनोळखी असून त्यांना अद्याप अटक झाली नाही. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असून बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्राणाची तपासणी करण्यात येत आहे.
माडग्याळ मेंढीच्या कोकराला मिळाला २ लाख ६० हजारांचा भाव
जत : तालुक्यातील माडग्याळ येथील प्रसिद्ध शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात माडग्याळ जातीच्या मेंढीच्या अवघ्या पाच महिन्यांच्या कोकराला २ लाख ६० हजार रुपयांचा विक्रमी भाव मिळाला. विक्रमी दर मिळाल्याने पशुपालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
बंडगरवाडी येथील पशुपालक शेतकरी अनिल बंडगर हे माडग्याळ जातीचे पाच महिन्याचे कोकरू विक्रीसाठी माडग्याळ बाजारात घेऊन आले होते. सांगोला येथील शेतकरी बाबू मेटकरी यांनी या कोकराला तब्बल २ लाख ६० हजार रुपयांचा भाव देत खरेदी केले. व्यवहार पूर्ण होताच बाजारात उपस्थित पशुपालक व व्यापाऱ्यांमध्ये या विक्रमी दराची चर्चा रंगली.
या विक्रमी व्यवहारामुळे पशुपालकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, विक्रींनंतर हलगीच्या निनादात कोकराची भव्य मिरवणूक काढत शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला. माडग्याळ जातीच्या मेंढ्या रुबाबदार बांधा, विशिष्ट ठेवण तसेच मांसाची चव आणि स्वादासाठी प्रसिद्ध आहेत. दुष्काळी व माळरान भागात कमी चाऱ्यावरही या मेंढ्यांची चांगली वाढ होत असल्याने पशुपालकांमध्ये या जातीला मोठी मागणी आहे. रोगप्रतिकारक क्षमता आणि मांस उत्पादनासाठी माडग्याळ जात विशेष प्रसिद्ध आहे.
माडग्याळ येथील बाजारात महाराष्ट्रासह परराज्यांमधूनही व्यापारी व पशुपालक मोठ्या संख्येने मेंढ्या व कोकरे खरेदी करण्यासाठी येतात. अवघ्या पाच महिन्यांच्या कोकराला मिळालेला हा विक्रमी भाव माडग्याळ जातीच्या मेंढ्यांना असलेली वाढती मागणी अधोरेखित करणारा ठरला आहे.
शेड्याळसाठी अखेर पाण्याचा टँकर सुरू; उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश; वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांना दिलासा
जत तालुक्यातील मौजे शेड्याळ गावठाण, वाडी-वस्तीत पशूधनासाठी निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी अखेर टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजुरी मिळाली आहे. उपविभागीय अधिकारी जत उपविभाग जत यांनी दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी आदेश काढून खासगी टँकर क्षमता २४ हजार लिटर, याद्वारे रोज १.२५ फेपा पाणीपुरवठा करण्यास कार्योत्तर मंजुरी दिली आहे.

माजी सरपंच कन्यापा गुगवाड यांनी ग्रामपंचायत शेड्याळचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच सहकाऱ्यांना सोबत घेऊन प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रस्ताव, कागदपत्रे आणि मागणीचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून शेड्याळ गावाला टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे. या कामासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सहकार्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
२४ हजार लिटर क्षमतेच्या टँकरला मंजुरी
प्रशासनाच्या आदेशानुसार शेड्याळ गावठाण, वाडी-वस्ती आणि पशूधनासाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. संबंधित ठेकेदाराकडून टँकर उपलब्ध करून घेऊन पाणीपुरवठा सुरू करण्याची जबाबदारी गटविकास अधिकारी, पंचायत समिती जत यांच्यावर सोपविण्यात आली आहे. टँकरद्वारे पुरविले जाणारे पाणी शुद्ध व निर्जंतुक असल्याची खात्री आरोग्य विभागाकडून करून घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची राहणार आहे. तसेच पाणीपुरवठा अखंडित ठेवणे, पाणी वितरणाचे नियोजन करणे आणि आवश्यक नोंदी अद्ययावत ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
टँकरवर शासकीय पाणीपुरवठ्याचा बोर्ड
प्रशासनाने टँकरच्या फेऱ्यांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. प्रत्येक टँकरवर ‘शासकीय पाणीपुरवठा’ असा स्पष्ट बोर्ड लावणे तसेच त्यावर टँकरची क्षमता नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जीपीएस प्रणाली बंधनकारक
खासगी टँकरवर जीपीएस प्रणाली बसविणे निविदाधारकासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रणाली संबंधित ठेकेदाराने स्वखर्चाने बसवायची असून, जीपीएसमध्ये नोंद झालेल्या टँकरच्या फेऱ्याच देयकासाठी ग्राह्य आहेत. जीपीएस प्रणाली नसलेल्या टँकरच्या फेऱ्यांचा दावा केल्यास त्या फेऱ्या बनावट समजून त्यांचे देयक अदा केले जाणार नाही, अशा सूचना दिल्या आहेत.
