जत तालुक्यात जीएसटी घोटाळा, तीव्र पाणीटंचाई, सहा तलाव कोरडे, म्हैसाळच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा आणि निकृष्ट बांबू रोपांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; जाणून घ्या जतच्या ताज्या घडामोडी.
जतच्या दुग्ध व्यावसायिकाच्या नावावर २ कोटींचा जीएसटी घोटाळा; कर्जाचे आमिष दाखवून कागदपत्रांचा गैरवापर; १० कोटींची बोगस उलाढाल दाखवून फसवणूक
जत : कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून जत तालुक्यातील मायथळ येथील एका दुग्ध व्यावसायिकाकडून आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मोबाईल क्रमांकाची माहिती घेऊन त्याच्या नावावर बनावट जीएसटी नोंदणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या जीएसटी क्रमांकाच्या माध्यमातून तब्बल १० कोटी रुपयांची बोगस उलाढाल दाखवून सुमारे दोन कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) घोटाळा करण्यात आला आहे. हा आयटीसी मुंबईतील एका व्यक्तीकडे हस्तांतरित झाल्याचे समोर आले आहे.
जीएसटी आणि आयकर विवरणपत्रांची प्रणालीद्वारे पडताळणी होत असताना संबंधित व्यावसायिकाच्या नावावर १० कोटींची उलाढाल दाखविल्याचे निदर्शनास आले. चार्टर्ड अकौंटंटने ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर प्रकार उघडकीस आला.
पडताळणी केल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून ‘एस. एस. ट्रेडिंग’ नावाने जीएसटी नोंदणी केल्याचे आढळले. या संस्थेने फर्निचर व स्टेशनरीच्या व्यवहारांची बोगस नोंद केली आहे. आपण असे कोणतेही व्यवहार केले नसल्याचे संबंधित व्यावसायिकाने तक्रारीत नमूद केले आहे. त्यांनी केंद्रीय जीएसटी विभाग आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
कर्जाचे आमिष दाखवून आधार-पॅनसारखी कागदपत्रे घेऊन त्यांचा गैरवापर करण्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
दोड्डनाला तलावासाठी शेतकरी आक्रमक; म्हैसाळचे पाणी न सोडल्यास उद्या उमदीत रास्ता रोकोचा इशारा
जत : दोड्डनाला तलावातील पाणीपातळी मृत साठ्यावर पोहोचल्याने प्रशासनाने उपसाबंदी लागू केली आहे. त्यामुळे निगडी बुद्रुक, उमदी, अटगी आणि जाडरबोबलाद परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून, तलावात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी तातडीने सोडण्याची मागणी त्यांनी केली आहे. पाणी न सोडल्यास सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी उमदी येथे नगर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
दोड्डनाला तलावाच्या पाण्यावर परिसरातील हजारो एकर क्षेत्रात द्राक्ष, डाळिंब, तूर, मका यांसह विविध पिके घेतली जातात. मात्र, तलाव कोरडा पडल्याने सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
गतवर्षी म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. यंदा मात्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कृष्णा नदीत मुबलक पाणी असताना आणि अलमट्टी धरणातून पाणी सोडले जात असताना जत सीमावर्ती भागातील तलाव कोरडा का, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी व सिंचन विभागाला निवेदन देण्यात आले असून, तातडीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जत तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद; सहा तलाव कोरडे; १२ टँकरने ११ गावांना पाणीपुरवठा; खरीप पिके करपली
जत : पावसाने ओढ दिल्याने जत तालुक्यात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून उमराणी, खोजनवाडी, तिकोंडी क्र. १, भिंगी, दरीबडची आणि पांढरी हे सहा प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत. अनेक प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे.
पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन सध्या तालुक्यातील ११ गावांना १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. आणखी आठ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल असून, आगामी काळात टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
बिरनाळ प्रकल्पात ४६.५० टक्के, तर वाळेखिंडीमध्ये ४३.११ टक्के पाणीसाठा आहे. मात्र सिद्धनाथ लघु प्रकल्पात केवळ २.०४, सोरडी १.२८, जालिहाल २.६४ आणि अंकलगीमध्ये १.८५ टक्के पाणीसाठा आहे. कोसारी ४.९२, तिप्पेहल्ली ९.८७, शेगाव क्र. १ मध्ये ३.४९, रेवनाळ ७.९२, मिरवाड ३.९८, गुळवड ५.३४, सनमडी ९.८३, व्होनाळा ११.२६, प्रतापपूर १४.३६, डफळापूर २३.८, बिळूर (के) ४.७८ आणि बेळूंखीमध्ये १.६६ टक्के पाणीसाठा आहे. शेगाव क्र. २ मध्ये ७.१० टक्के, तर मध्यम प्रकल्प समूहात २३.७८ टक्के पाणीसाठा आहे.
खरीप पिके करपली
पावसाअभावी खरीप पिकांना मोठा पाण्याचा ताण बसला असून माडग्याळसह अनेक भागांत बाजरी व अन्य पिके करपू लागली आहेत. उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. प्रशासनाने तातडीने पिकांची पाहणी करून मदत करावी, अशी मागणी होत आहे.
‘म्हैसाळ’च्या पाण्याची आशा
तालुक्यातील पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपाय म्हणून शेतकऱ्यांचे लक्ष म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्याकडे लागले आहे. ‘म्हैसाळ’चे पाणी वेळेत उपलब्ध झाल्यास शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, चारा-पाण्याअभावी पशुधनाचा प्रश्नही गंभीर झाला आहे. विकतचा चारा घेणे परवडत नसल्याने काही शेतकरी जनावरे विकत आहेत, तर काहींनी ती पाहुण्यांकडे पाठवण्यास सुरुवात केली आहे. शासनाने चारा छावण्या सुरू करून जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी, तसेच टँकरच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन ‘म्हैसाळ’चे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांतून होत आहे.
नंदादीप बांबू लागवड प्रकल्पाच्या पहिल्याच घासाला खडा; निकृष्ट रोपांमुळे जतच्या शेतकऱ्यांचे नुकसान; हेक्टरी सात लाखांचे अनुदानही धोक्यात
जत : दुष्काळी जतच्या कोरडवाहू जमिनीला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या रोहयोच्या ‘नंदादीप’ बांबू लागवड पायलट प्रकल्पाला पहिल्याच टप्प्यात धक्का बसला आहे. शासनमान्य एजन्सीकडून मिळालेली अवघी तीन ते चार इंचांची रोपे जतच्या कडक उन्हात करपून जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
गतवर्षी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई आणि मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचा शुभारंभ झाला होता. बांबू लागवडीतून कोरडवाहू शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार आसंगी येथील सहा शेतकऱ्यांनी रोहयोअंतर्गत अर्ज करून दहा एकर क्षेत्रावर बांबूची लागवड केली. मात्र, निकृष्ट व अत्यल्प उंचीची रोपे मिळाल्याने लागवडीनंतर अनेक रोपे जगली नाहीत.
बांबू लागवडीनंतर तीन वर्षांच्या देखभालीसाठी मनरेगातून हेक्टरी सात लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते. मात्र, रोपेच जळाल्याने या लाभावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाने नुकसानभरपाई देऊन सक्षम रोपे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आठ फुटांची रोपे देण्याची मागणी
जतच्या हवामानात तीन-चार इंचांची रोपे जगणे कठीण असल्याने किमान पाच ते आठ फूट उंचीची रोपे देण्यास तातडीने परवानगी द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आता शासनाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
