जत तालुक्यातील ताज्या घडामोडी जाणून घ्या. हिवरे येथे वृद्ध महिलेचे सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने चोरीस, दरीबडचीच्या डॉ. प्रशांत सनदींना रसायनशास्त्रात पीएच.डी., जत त्रिभाजनाची मागणी आणि अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त कार्यक्रम.
हिवरे येथे वृद्ध महिलेची दागिन्यांची पिशवी पळवली; भरदिवसा सव्वा लाखांचे सोने लंपास; अनोळखी दुचाकीस्वाराचा शोध सुरू
जत : हिवरे गावानजीक वनविभागाच्या परिसरात एका ६५ वर्षीय महिलेची सोन्याचे दागिने असलेली पिशवी अनोळखी दुचाकीस्वाराने हिसकावून नेल्याची घटना रविवारी (ता. १६) दुपारी घडली. चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे १ लाख २५ हजार रुपये आहे.
सुमाबाई तुकाराम शेजुळ (रा. हिवरे) या डोर्ली येथील थांब्यावर एसटी बसची वाट पाहत असताना एका अनोळखी दुचाकीस्वाराने त्यांना वाहनावर बसवून डोर्ली येथे आणले. त्यानंतर ‘तुमच्या आजोबांना बरे नाही, त्यांना बरे करतो,’ असे सांगत तसेच बाळूमामाच्या पालखीतील भंडारा, लिंबू व मेंढीची शेंग देण्याचे आमिष दाखवून त्यांना हिवरे माळ येथील वनविभागाच्या परिसरात नेले.
तेथे संशयिताने सुमाबाई यांना गळ्यातील दागिने पिशवीत ठेवण्यास सांगितले. त्यांनी दागिने पिशवीत ठेवताच संशयिताने पिशवी हिसकावून घेत दुचाकीवरून पलायन केले. पिशवीत ५० हजार रुपये किमतीची एक तोळे वजनाची सोन्याची बोरमाळ आणि ७५ हजार रुपये किमतीचे मणी-मंगळसूत्र असलेले गंठण होते.
या प्रकरणी सुमाबाई शेजुळ यांच्या फिर्यादीवरून जत पोलिस ठाण्यात अनोळखी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू आहे.
दरीबडचीच्या डॉ. प्रशांत सनदी यांना रसायनशास्त्रात पीएच.डी.; हायड्रोजन निर्मिती आणि पर्यावरणीय वापरासाठी नॅनोमटेरियलवर संशोधन
जत : तालुक्यातील दरीबडची येथील डॉ. प्रशांत सनदी यांना रसायनशास्त्र विषयातील संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ. सनदी यांनी ‘Design and Preparation of Semiconducting Catalytic Nanomaterial for Hydrogen Production and Environmental Applications’ या विषयावर संशोधन केले. हे संशोधन डॉ. जी. एस. कांबळे आणि प्रा. डॉ. एस. एस. कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.
शाश्वत हायड्रोजन निर्मिती तसेच पर्यावरणीय उपयोगासाठी सेमीकंडक्टिंग उत्प्रेरक नॅनोमटेरियलची निर्मिती हा त्यांच्या संशोधनाचा प्रमुख केंद्रबिंदू होता. पीएच.डी.च्या कालावधीत त्यांनी आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये १० संशोधन निबंध प्रकाशित केले असून, त्यांच्या सात पेटंट्सना ग्रँट मिळाली आहे.
हेदेखील वाचा: जतला नावाची नव्हे, विकासाची ओळख हवी! | देवभूमी जत की विकसित जत?
‘त्रिभाजन करा अन् देवभूमी जत नाव द्या’; नामांतराऐवजी तालुक्याच्या विभाजनाची मागणी; विक्रम ढोणे यांचे आवाहन
ज-त : ज-तच्या नामांतरासाठी ताकद लावण्याऐवजी तालुक्याचे त्रिभाजन करून नव्याने निर्माण होणाऱ्या भागाला ‘देवभूमी जत’ असे नाव द्यावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केले आहे.
पत्रकाद्वारे ढोणे यांनी म्हटले आहे की, जतचे नामांतर करून ‘देवभूमी ज-त’ करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर प्रयत्नशील आहेत. मात्र, ज-तकरांना नामांतरापेक्षा तालुक्याचे विभाजन आवश्यक आहे. त्यामुळे आमदार पडळकरांनी नामांतरासाठी प्रतिष्ठा पणाला लावण्याऐवजी तालुक्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करावेत.
ज-त हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने मोठा तालुका असून, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केवळ नाव बदलण्यापेक्षा शाश्वत धोरणात्मक निर्णय घेऊन तालुक्याचे विभाजन करण्याची गरज असल्याचे ढोणे यांनी म्हटले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सुरेश खाडे, प्रकाश शेंडगे आणि विलासराव जगताप हे भाजपकडून निवडून आले. त्यांनी कधी जतचे नाव बदलण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर नामांतराचा प्रयत्न करीत असल्याबद्दल ढोणे यांनी नाराजी व्यक्त केली.
जत येथे अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम; व्याख्यान, पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
जत : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ज-त येथील शोभा मंगल कार्यालयात शनिवारी सायंकाळी पाच वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी व्याख्यान आणि पुरस्कार वितरण सोहळाही होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार जयंत पाटील राहणार असून, लेखक संजय आवटे यांचे व्याख्यान होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महादेव जानकर, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, अनिल जाहीरा, विलासराव जगताप, विक्रमसिंह सावंत, प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब, नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच सुरेश शिंदे, सुजय शिंदे, विद्याताई मोटे, तम्मनगौडा रवि पाटील, अमोल डफळे, महादेव पाटील, विवेक कोकरे, अजयकुमार नष्टे, प्रवीण धानोरकर, सचिन थोरबोले आणि विजय घेरडे आदींची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रतापराव शिंदे आहेत.
कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष सुकुमार कांबळे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष अविनाश वाघमारे, विशाल कांबळे, संजय कांबळे, युवराज निकम, अतुल कांबळे, भूपेंद्र कांबळे, बाजी केंगारे, प्रकाश देवकुळे, दीपक शिंदे, आकाश बनसोडे, प्रशांत ऐदाळे, विजयराजे चव्हाण आणि राहुल वाघमारे यांनी केले आहे.
