चिपळूणजवळ वांगीच्या ३५ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून, दिघंची येथे पंढरपूरच्या दिंडीत ट्रक घुसून महिला वारकरी ठार व चार जखमी, तर ईश्वरपुरात डंपरच्या धडकेत ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू.
सांगली : सांगली जिल्हा आणि परिसरात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये खुनासह दोन भीषण अपघात झाले आहेत. चिपळूणजवळ सांगली जिल्ह्यातील तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. दिघंची येथे पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत ट्रक घुसल्याने महिला वारकरी ठार झाली, तर चार जण गंभीर जखमी झाले. ईश्वरपूर येथे डंपरच्या धडकेत ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चिपळूणजवळ वांगीच्या तरुणाचा दगडाने ठेचून खून
खासगी कंपनीत होता नोकरीला; खुनाच्या कारणाचा शोध सुरू
सांगली : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणजवळ वालोपे येथे सांगली जिल्ह्यातील एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी (ता. १७) पहाटे उघडकीस आली. नवनाथ बबन कांबळे (वय ३५, मूळ रा. वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो वालोपे येथे बहिणीकडे राहत होता आणि लोटे औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ कांबळे सोमवारी (ता. १६) रात्री नऊच्या सुमारास कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र, मंगळवारी पहाटे वालोपे रेल्वेस्थानक नाका परिसरातील टपरीच्या मागे त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या. डोक्यात जांभा दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, खुनामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलिस अधिक तपास करत आहेत.
हेदेखील वाचा : सांगलीत अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र 2029 अभियान; 162 गुन्हे दाखल
दिघंचीत वारकऱ्यांच्या दिंडीत ट्रक घुसला; महिला ठार, चार जखमी
पहाटे पावणेसहाची घटना; पंढरपूरच्या वारीतील आनंदावर विरजण
आटपाडी : विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव ट्रक घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात महिला वारकरी जागीच ठार झाली, तर चार जण गंभीर जखमी झाले. नागिनी संजय कोळी (रा. बहादूरवाडी, ता. वाळवा) असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी (ता. १७) पहाटे ५.४५ वाजण्याच्या सुमारास दिघंची (ता. आटपाडी) येथील माने वस्ती परिसरात हा अपघात घडला.
पलूस येथून निघालेली वारकऱ्यांची दिंडी झरे-दिघंची मार्गे पंढरपूरच्या दिशेने जात होती. दिवसा उन्हाचा त्रास टाळण्यासाठी वारकरी पहाटेच पायी प्रवास करत होते. टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठलनामाचा जयघोष सुरू असतानाच पंढरपूरहून झरेकडे जाणारा भरधाव ट्रक (एमएच ११ एएल ४९६२) चालकाचा ताबा सुटल्याने थेट दिंडीत घुसला.
या धडकेत नागिनी कोळी यांचा मृत्यू झाला. शिवाजी रामचंद्र माळी, शोभा भगवान भिशी, सुवर्णा मोहन साळुंखे आणि लीलावती शिवाजी माळी हे चार वारकरी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य केले. याप्रकरणी पुणदी (ता. पलूस) येथील भगवान कृष्णा पाटील (वय ७९) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ट्रकचालक विजय हणमंत जरग (रा. धनगरवाडी, ता. सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पलूस व परिसरातील सुमारे ४० वारकरी या दिंडीत सहभागी झाले होते. सोमवारी पळसखेड येथे मुक्काम करून त्यांनी मंगळवारी पहाटे पुढील प्रवास सुरू केला होता. वारीच्या आनंदात निघालेल्या वारकऱ्यांवर अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे दिंडीतील भाविकांमध्ये शोककळा पसरली.

ईश्वरपुरात डंपरच्या धडकेत ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
बसस्थानकासमोर दुचाकीला धडक; डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
ईश्वरपूर : येथील बसस्थानकासमोर मुरुमाने भरलेल्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. दिलीप मारुती माने (रा. कोळी मळा, टकलाई नगर, ईश्वरपूर) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी (ता. १७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप माने हे ईश्वरपूर-पेठ रस्त्यावरून दुचाकीने (एमएच १० डीए ८०४५) जात होते. यावेळी बसस्थानक परिसरात मुरुमाने भरलेला डंपर (एमएच १० ईक्यू ४५३०) भरधाव वेगाने जात असताना त्याने माने यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात डंपरचे पुढील चाक माने यांच्या अंगावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी अथर्व सचिन माने (वय २०, ईश्वरपूर) यांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डंपरचालक समीर संजय गुजर (वय ३४, रा. नेर्ले-माळवाडी, ता. वाळवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईश्वरपूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
