सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी संतोष काटे यांची निवड झाली. यानिमित्त जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने भारत क्षिरसागर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
जत : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी माडग्याळचे सुपुत्र तथा मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे यांची निवड झाल्याबद्दल जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षिरसागर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष भारत क्षिरसागर म्हणाले की, संतोष काटे यांनी मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी नेहमीच संघर्षाची भूमिका घेतली असून, संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

शिक्षक बँकेच्या निवडणुकीदरम्यान मागासवर्गीय शिक्षक संघटनेने स्वाभिमानी शिक्षक मंडळाला भक्कम पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यामुळे बँकेत सत्तापरिवर्तन घडून आले. स्वाभिमानी शिक्षक मंडळाचे नेते अविनाश तात्या गुरव यांच्या नेतृत्वाखाली संतोष काटे यांची स्वीकृत संचालकपदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे शिक्षक चळवळीत सक्रियपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला बँकेच्या कामकाजात योगदान देण्याची संधी मिळाली आहे.
या पदाच्या माध्यमातून संतोष काटे यांनी शिक्षक सभासदांच्या हिताला प्राधान्य द्यावे. तसेच बँकेच्या प्रगतीसाठी आणि सभासदांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रभावीपणे काम करावे, अशी अपेक्षाही क्षिरसागर यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त स्वीकृत संचालक संतोष का-टे यांनी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे आभार मानले.
यावेळी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे ज्येष्ठ नेते भालचंद्र गडदे, हणमंत गोरे, कोंडीबा घुटुकडे, देशमुख रोडे, राजगे सर, सखाराम घुटुकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
