बेळगावमध्ये आईनेच रचला आपल्या 24 वर्षीय मुलाच्या खुनाचा कट

अनैतिक संबंधातून २४ वर्षीय मुलाच्या हत्येचा आईने प्रियकराच्या मदतीने कट रचल्याचा बेळगाव पोलिसांचा खुलासा. झोपेच्या गोळ्या देऊन गळा आवळला; सहा जणांना अटक, अल्पवयीन ताब्यात.

बेळगाव : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने आईनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या २४ वर्षीय मुलाच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक घटना बेळगावमध्ये उघडकीस आली आहे. झोपेच्या गोळ्या मिसळलेले पेय पाजून मुलाला बेशुद्ध केल्यानंतर मोटारीतच गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह बेळगाव-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत केएलई छत्रीजवळील गटारात फेकून देण्यात आला. या प्रकरणाचा माळमारूती पोलिसांनी छडा लावला असून, मृताच्या आईसह सहा जणांना अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

मीना नारायण (वय ४४, रा. आर.टी.नगर, बंगसूर), राकेश परशुराम जामुनी (४४), सचिन मल्लाप्पा कांबळे (३४), मनोज दुंडाप्पा कांबळे (१९), तिम्माण्णा रवींद्र कांबळे (२१) आणि एकनाथ उमाप्पा कांबळे (३२, सर्व रा. भीमनगर, तेरणी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी केएलई छत्रीजवळ महामार्गालगत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर माळमारूती पोलिसांनी तपास सुरू केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ नोव्हेंबरला बंगसूर येथील आर.टी.नगर परिसरातील मीना हिने मृतदेह आपला मुलगा विजय नारायण (वय २४) याचा असल्याचे ओळखले. २८ ऑक्टोबर रोजी राकेश याने विजयला मोटारीतून बंगसूर येथून बेळगावला आणल्याची माहितीही तिने दिली.

हेदेखील वाचा : दिवाळीत बैलांच्या मागे धावतात तरुण! 400 वर्षांची अनोखी परंपरा; शिंगांना बांधले जातात नारळ आणि पैसे

तपासादरम्यान विजयच्या हत्येमागे त्याची आई मीना हिचाच सहभाग असल्याचे समोर आले. मीनाचे राकेश याच्याशी अनैतिक संबंध होते. या संबंधात मुलगा अडथळा ठरत असल्याने तिने राकेशला मुलाच्या हत्येचा कट रचण्यास सांगितल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

त्यानुसार राकेशने आपल्या साथीदारांच्या मदतीने हत्येचा कट आखला. विजयला झोपेच्या गोळ्या मिसळलेले पेय पाजून बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर मोटारीतच गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. पुरावा लपविण्याच्या उद्देशाने मृतदेह महामार्गालगत गटारात फेकून देण्यात आला.

या प्रकरणी माळमारूती पोलिसांनी मीना आणि राकेशसह सहा जणांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अशा प्रकारे एकूण सात जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी एका संशयिताचा शोध सुरू आहे.

माळमारूती पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी. आर. गडेकर, उपनिरीक्षक आनंद आदगोंड, एएसआय बी. एफ. बस्तवाडसे तसेच सी. आय. चिगरी, अरुण कांबळे, एम. जी. कुरेर, के. बी. गौराणी, मल्लिकार्जुन गाडवी, गोपाळ लट्टी, महेश ओडियार, महेश मळगाली, दीपक जचगट्टी, द्यामाप्पा मुर्गोड आणि एम. एस. सागनूर यांनी तपासात सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *