हुलजंतीत गुरु-शिष्य पालखी भेट सोहळा

हुलजंती येथे महालिंगराय-बिरोबा गुरु-शिष्य पालखी भेट सोहळा तीन लाख भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. ३०० हून अधिक ढोलपथके, ४० टन भंडाऱ्याची विक्री आणि पारंपरिक भाकणुकीने यात्रेला रंगत आली.

मंगळवेढा : ‘महालिंगारायाच्या नावाने चांगभलं… बिरोबाच्या नावाने चांगभलं…’ अशा जयघोषाने आणि ढोल-नगाऱ्यांच्या गजराने हुलजंती येथे गुरु-शिष्य पालखी भेटीचा पारंपरिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून आलेल्या सुमारे तीन लाख भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात भंडारा, खोबरे आणि लोकर यांची मुक्तपणे उधळण करण्यात आली. पालख्यांच्या भेटीचा क्षण अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भेट होताच टाळ्यांचा कडकडाट आणि ‘चांगभलं’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

सोमवारी दुपारी दोन वाजल्यापासून विविध गावांतील मानाच्या पालख्यांचे हुलजंतीत आगमन सुरू झाले. हुन्नूरचा बिरोबा, शिरढोणचा शीलवंती व बिरोबा, जिराअंकलगीचा बिरोबा सोन्याळ, विठोराय्या आदी देवतांच्या पालख्या ढोल-नगारे आणि सजवलेल्या बैलांसह गावात दाखल झाल्या. प्रत्येक पालखीने गावातील मंदिरांना भेटी दिल्यानंतर महालिंगरायाच्या ओढ्याकडे प्रस्थान केले. तेथे एकापाठोपाठ एक पालख्यांची महालिंगरायाच्या पालखीशी भेट झाली. त्यानंतर सर्व पालख्यांनी महालिंगराय मंदिराला प्रदक्षिणा घातली.

हेदेखील वाचा : गोकुळ दूध संघाचा सत्तासंघर्ष तीव्र; शासननियुक्त संचालकांचा अध्यादेश जारी; समविचारी आघाडीचा सोमवारी 9 रोजी संघर्ष मोर्चा

या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भाविकांकडून होणारी भंडाऱ्याची मुक्त उधळण. यंदाच्या यात्रेत ४० टनांहून अधिक भंडाऱ्याची विक्री झाली. तसेच पालखी भेट सोहळ्यात ३०० हून अधिक ढोलपथकांनी सहभाग घेतला. ढोल-ताशांचा निनाद, भंडाऱ्याने पिवळे झालेले वातावरण आणि भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हुलजंती परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

यावेळी आमदार समाधान आवताडे, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, उद्योजक हनुमंत दुधाळ, विद्याताई मोटे, डॉ. स्नेहा सोनकाटे, प्रा. शिवाजीराव काळुंगे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, ॲड. रविकरण कोळेकर, दत्तात्रय मल्हाळे, गुलाराव थोरबोले, उपनगराध्यक्ष प्रा. येताळा भगत, एन. डी. जाधव आदी उपस्थित होते.

सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरे, सहायक पोलिस निरीक्षक अंकुश वाघमोडे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

भाकणुकीत पंधरा दिवसांत पावसाचा अंदाज; महागाईचेही संकेत

पालखी भेटीचा सोहळा पार पडल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकातून आलेल्या पुजाऱ्यांनी पारंपरिक भाकणूक केली. राज्यातील सहा ठिकाणी पंधरा दिवसांच्या आत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करतानाच दुष्काळाचे संकट कायम राहण्याचे संकेत देण्यात आले. पुढील वर्षी चांगला पाऊस पडेल, तसेच अन्नधान्य महागण्याची शक्यताही भाकणुकीत व्यक्त करण्यात आली.

शेळ्या-मेंढ्या पालखीत बसतील, न्यायाने वागणाऱ्या व्यक्तीला देव पावन होईल, असे सांगतानाच जनावरांपासून माणसांनी सावध राहावे, असा इशाराही देण्यात आला. ही पारंपरिक भाकणूक ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भाकणुकीनंतर रात्रभर ओव्यांचा कार्यक्रम रंगला आणि हुलजंतीतील यात्रेचा भक्तिमय उत्साह कायम राहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *