जत तालुक्यातील बालगाव येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी फराळ केला. नुकसानभरपाई, पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा आणि म्हैसाळ योजनेच्या पाण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली.

जत : दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. राज्य शासन त्यांच्या सुख-दुःखात सहभागी असून, या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. एकमेकांच्या हातात हात घालून आपण दुष्काळावर मात करूया, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जत तालुक्यातील बालगाव येथे व्यक्त केला.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी बालगाव येथील गुरुदेव योगाश्रमात शेतकऱ्यांसोबत दिवाळी फराळ केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शासनाकडून मदतीचे आश्वासन दिले.

अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात पावसाने ओढ दिली असून, राज्यातील ३०५ तालुके दुष्काळी घोषित करण्यात आले आहेत. त्यात सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, पीकपंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल. तोपर्यंत दिवाळी सण साजरा करता यावा, यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यास शासन प्राधान्य देईल.

जतच्या बालगावात पालकमंत्री चंद्रकांत पाटील

जत तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार आणि जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र बैठका घेऊन कार्यवाही करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत उपलब्ध पाण्याचे नियोजन करायचे असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि त्याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

म्हैसाळचे पाणी जतपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न

आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती देताना म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी पूर्ण क्षमतेने जतपर्यंत पोहोचविण्यासाठी पंपांची क्षमता वाढविण्यास मंजुरी मिळाल्याचे सांगितले. नाबार्डच्या माध्यमातून उपनलिका उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जत तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे हाती घेण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेदेखील वाचा: जत तालुक्यात गुन्हेगारीच्या तीन घटना; पाच्छापूरच्या तरुणाला 56 लाखांचा सायबर गंडा

टँकर, तलाव भरणे आणि जलसंधारणावर भर

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी प्रशासनाच्या उपाययोजनांची माहिती दिली. अल निनोचा प्रभाव पुढील वर्षीही राहण्याची शक्यता असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन ऑगस्टपर्यंत करावे लागणार आहे. जिल्ह्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून, जत तालुक्यात रिचार्ज शाफ्टची ९० टक्के कामे आणि जलजीवन मिशनची २५ टक्के कामे आहेत.

मागणी करणाऱ्यांना टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे १५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या आवर्तनात जत तालुक्यातील तलाव प्राधान्याने भरून घेण्यात येतील. तसेच शासकीय जमिनीवर चारा लागवडीसाठी बचत गटांना प्रोत्साहन दिले जात आहे. विकसित भारत जी राम जी योजनेच्या माध्यमातून रोजगार हमीची कामे सुरू करण्याची कार्यवाहीही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

जतच्या बालगावात पालकमंत्री चंद्रकांत पाटील

शेतकऱ्यांच्या घरी जाऊन फराळाचे वाटप

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट जमिनीवर बसून शेतकऱ्यांसोबत दिवाळी फराळ केला. प्रातिनिधिक स्वरूपात एका शेतकऱ्याला लाडू भरवून त्यांनी आपुलकी व्यक्त केली. उपस्थित शेतकऱ्यानेही पालकमंत्र्यांना फराळ भरवून कृतज्ञता व्यक्त केली.

पालकमंत्र्यांनी स्वतःसोबत आणलेला फराळ शेतकऱ्यांना आणि मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करणाऱ्या मुलांना भेटवस्तूंसह दिला. तसेच दोन ग्रामस्थांच्या घरी जाऊन फराळाचे वाटप केले आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. बालगाव आश्रमाच्या सहकार्याने गावातील सर्व घरांमध्ये फराळ किटचे वितरण करण्यात आले.

यावेळी आमदार धैर्यशील कदम, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जतचे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, बालगाव योगाश्रमाचे अमृतानंद स्वामीजी महाराज यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थ्यांनी मल्लखांबाची थरारक प्रात्यक्षिके सादर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *