जत तालुक्यातील कोसारी येथे शेतजमिनीतून जाणाऱ्या उच्चदाब वीजवाहिनीला विरोध करत दोन शेतकऱ्यांनी पारेषण टॉवरवर चढून आंदोलन केले. योग्य मोबदल्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित.
जत : शेतजमिनीतून जाणाऱ्या उच्चदाब वीजवाहिनीला विरोध करत कोसारी (ता. जत) येथील दोन शेतकऱ्यांनी थेट पारेषण टॉवरवर चढून आंदोलन केले. सागर हाक्के आणि काशिलिंग पुजारी अशी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत. जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याने तसेच भविष्यात शेतीच्या वापरावर मर्यादा येण्याची शक्यता असल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चर्चा केली. योग्य मोबदल्याबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.
रेवणाळ येथील शेतकरी काशिलिंग पुजारी यांच्या मालकीची कोसारी येथील गट क्रमांक २५४ मध्ये १६ एकर जमीन आहे. या जमिनीतून WRSR Power Transmission Limited या कंपनीकडून उच्चदाब वीजवाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. या प्रकल्पांतर्गत मोठे टॉवर उभारले जाणार नसले, तरी वीजवाहिनीच्या तारा जमिनीवरून जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात शेतीच्या वापरावर बंधने येण्याबरोबरच सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यातही अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अथवा अधिकृत नोटीस न बजावता कंपनीकडून काम सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जमिनीचा योग्य मोबदला निश्चित न करताच काम पुढे रेटले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांचा आधार घेत दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या सागर हाक्के आणि काशिलिंग पुजारी यांनी थेट पारेषण टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले.
हेदेखील वाचा : इंदिरा गांधी यांनी महिला नेतृत्वाची नवी दालने खुली केली : विक्रम ढोणे
या प्रकाराची माहिती मिळताच कुंभारीचे मंडळ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करून संपूर्ण परिस्थिती प्रांताधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार यांनीही कंपनीच्या कामकाजावर आक्षेप घेत शेतकऱ्यांची बाजू घेतली. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाल्याशिवाय कंपनीने काम सुरू करू नये, अशी मागणी त्यांनी केली. याप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी कोसारीचे स्थानिक नेते किसान टेंगले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत संबंधित काम थांबवावे, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता प्रशासन आणि संबंधित कंपनी यावर काय निर्णय घेते, याकडे कोसारी परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
