ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेती, उद्योग, सर्वेक्षण, छायाचित्रण आणि बांधकाम क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. ड्रोन पायलट, अभियंता, डेटा विश्लेषक बनण्यासाठी आवश्यक शिक्षण, प्रशिक्षण, पात्रता, वेतन आणि स्वयंरोजगाराच्या संधी जाणून घ्या.
एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या जोडीला ड्रोन तंत्रज्ञानानेही विविध क्षेत्रांत आपले महत्त्व सिद्ध केले आहे. एकेकाळी छायाचित्रण आणि मनोरंजनापुरता मर्यादित असलेला ड्रोन आज शेती, बांधकाम, उद्योग, आरोग्यसेवा, सर्वेक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रांत उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे ड्रोन तंत्रज्ञान हे तरुणांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराचे नवे दालन बनत आहे.
ड्रोन हे मानवरहित हवाई उपकरण असून ते रिमोट कंट्रोल किंवा स्वयंचलित प्रणालीद्वारे चालवले जाते. त्यामध्ये कॅमेरा, जीपीएस आणि विविध प्रकारचे सेन्सर असतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ड्रोनची कार्यक्षमता वाढली असून अनेक धोकादायक आणि वेळखाऊ कामे अधिक वेगाने व अचूकपणे करणे शक्य झाले आहे. शेतीमध्ये औषध फवारणी, पिकांचे निरीक्षण, जमिनीचे सर्वेक्षण, तर बांधकाम क्षेत्रात प्रकल्पांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. औद्योगिक क्षेत्रात वीजवाहिन्या, पूल आणि उंच इमारतींची तपासणी करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.
भारत सरकारच्या डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया यांसारख्या उपक्रमांमुळे ड्रोन उद्योगाच्या विस्ताराला चालना मिळत आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रत्येक वेळी अभियांत्रिकीची पदवी आवश्यक नसते. योग्य प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्य आणि अनुभव यांच्या जोरावर दहावी-बारावी उत्तीर्ण तरुणांनाही काही व्यवसायांत प्रवेश करता येतो.

रोजगाराच्या विविध संधी
१. ड्रोन पायलट : ड्रोनचे सुरक्षित आणि नियमबद्ध संचालन करणे हे ड्रोन पायलटचे प्रमुख काम आहे. कृषी फवारणी, जमीन मोजणी, नकाशे तयार करणे, छायाचित्रण आणि औद्योगिक निरीक्षणासाठी प्रशिक्षित ड्रोन पायलटची गरज वाढत आहे. आवश्यक प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र मिळवून स्वतंत्रपणेही या क्षेत्रात काम करता येते.
२. ड्रोन अभियंता : ड्रोनची निर्मिती, रचना, चाचणी आणि तांत्रिक सुधारणा करण्याची जबाबदारी ड्रोन अभियंत्यांवर असते. इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, एरोस्पेस आणि रोबोटिक्सचे शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी हे क्षेत्र उपयुक्त आहे.
३. ड्रोन डेटा विश्लेषक : ड्रोनमधून मिळणारी छायाचित्रे, व्हिडिओ आणि भौगोलिक माहितीचे विश्लेषण करून उपयुक्त निष्कर्ष काढण्याचे काम डेटा विश्लेषक करतात. शेती, बांधकाम आणि जमीन सर्वेक्षण क्षेत्रात या कौशल्याला महत्त्व आहे.
४. छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी : चित्रपट, जाहिरात, पर्यटन, विवाह समारंभ आणि वृत्तांकनासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर वाढत आहे. छायाचित्रणाची आवड असलेल्या तरुणांना या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय उभारता येऊ शकतो.
५. देखभाल आणि दुरुस्ती तंत्रज्ञ : ड्रोनमधील मोटार, बॅटरी, सेन्सर, इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि सॉफ्टवेअरची तपासणी व दुरुस्ती करण्यासाठी प्रशिक्षित तंत्रज्ञांची आवश्यकता असते. या कौशल्याच्या आधारे नोकरीबरोबरच स्वतःचे दुरुस्ती केंद्रही सुरू करता येते.
हेदेखील वाचा : करिअरच्या नव्या संधी शोधा; आवड, कौशल्य आणि शिक्षणातून घडवा उज्ज्वल भविष्य
शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज
व्यावसायिक ड्रोन पायलट होण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) मान्यताप्राप्त रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशनकडून (आरपीटीओ) प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. त्यामध्ये ड्रोनचे संचालन, हवाई सुरक्षा, तांत्रिक माहिती आणि प्रत्यक्ष उड्डाणाचा सराव शिकवला जातो. ड्रोन अभियांत्रिकीसाठी इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल किंवा एरोस्पेस शाखेतील शिक्षण उपयुक्त ठरते. तर डेटा विश्लेषणासाठी संगणकशास्त्र, जीआयएस आणि जिओ-इन्फॉर्मेटिक्सचे ज्ञान आवश्यक आहे.
नोकरीबरोबर स्वयंरोजगाराची संधी
ड्रोन क्षेत्रातील वेतन हे शिक्षण, अनुभव, कौशल्य आणि कामाच्या स्वरूपावर अवलंबून असते. काही सुरुवातीच्या पदांवर साधारण २५ ते ४० हजार रुपये प्रतिमहिना वेतन मिळू शकते. अनुभव आणि विशेष कौशल्ये वाढल्यानंतर उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता असते. मात्र, ही वेतनश्रेणी निश्चित नाही.
नोकरीच्या संधींबरोबरच कृषी फवारणी सेवा, जमीन सर्वेक्षण, ड्रोन छायाचित्रण, व्हिडिओग्राफी आणि दुरुस्ती केंद्र अशा व्यवसायांतून स्वयंरोजगार करता येतो. विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांसाठी शेतीशी संबंधित ड्रोन सेवांचा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो. मात्र, त्यासाठी आवश्यक उपकरणे, प्रशिक्षण, परवाने आणि स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास महत्त्वाचा आहे.
कौशल्याच्या बळावर भविष्य घडवा!
ड्रोन तंत्रज्ञान म्हणजे केवळ एक आधुनिक उपकरण चालविण्याचे कौशल्य नव्हे, तर विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि उद्योजकतेचा संगम आहे. बदलत्या काळात पारंपरिक शिक्षणाबरोबरच नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक बनले आहे. योग्य प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांच्या जोरावर तरुणांना या क्षेत्रात नोकरी मिळवण्याबरोबरच स्वतःचा व्यवसायही उभारता येऊ शकतो. आकाशात भरारी घेणाऱ्या ड्रोनच्या माध्यमातून तरुणांसाठी करिअरचे एक नवे आकाश खुले होत आहे.
