मिरज ग्रामीण पोलिसांनी शेळी-बोकड चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला. पाच गुन्हे उघड, दोन आरोपी अटकेत आणि २ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त.

मिरज : दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेळी-बोकडांची चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मिरज ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हे प्रकटीकरण पथकाने धडक कारवाई करत पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून, दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या शेळ्या-बोकडांच्या विक्रीतून मिळालेली १ लाख ५ हजार रुपयांची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारींची गंभीर दखल

सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेळी-बोकड पालन हा अनेक शेतकरी आणि कुटुंबांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा आधार आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना शेळ्या-बोकड चोरीच्या घटनांमुळे त्यांच्या आर्थिक संकटात आणखी भर पडत होती. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते.

मिरज तालुक्यात

गोपनीय माहितीच्या आधारे सापळा

मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासाला गती दिली. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ६३३/२०२६ च्या तपासादरम्यान साक्षीदार आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला.

सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत संकपाळ यांच्यासह पथकाने २६ नोव्हेंबर २०२६ रोजी दोन संशयितांना त्यांच्याकडील होंडा युनिकॉर्न मोटारसायकलसह ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुंडेंवाडी, व्यकोचीवाडी, सांबरवाडी, बेडग आणि आरग परिसरातून शेळ्या-बोकड चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेदेखील वाचा: सांगली जिल्ह्यातील दोन गुन्हेगारी टोळ्या हद्दपार; 7 जणांवर जिल्हाबंदी

कर्नाटकातील दोन आरोपी अटकेत

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

  • शिवानंद नागाप्पा सनदी (वय २३), रा. कंचकरवाडी, ता. रायबाग, जि. बेळगाव, कर्नाटक.
  • राजू चिक्क्या सनदी (वय ३२), रा. कंचकरवाडी, ता. रायबाग, जि. बेळगाव, कर्नाटक.

पाच गुन्ह्यांतील चोरीचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी तपासादरम्यान मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील पाच गुन्ह्यांतील मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामध्ये शेळ्या-बोकडांच्या विक्रीतून मिळालेली शिल्लक रक्कम आणि चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल यांचा समावेश आहे.

उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमध्ये गुन्हा क्रमांक १८७/२०२६, २८७/२०२६, ५२६/२०२६, ६१०/२०२६ आणि ६३३/२०२६ यांचा समावेश आहे. या गुन्ह्यांतील विक्रीच्या रकमेतून एकूण १ लाख ५ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच १ लाख २० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (क्रमांक एमएच २३ एचडी १४७५) जप्त करण्यात आली आहे.

आरग येथील चोरीच्या तपासातून टोळीचा माग

आरग येथील नरवाड रोड परिसरात राहणारे विकी तुकाराम पाटील (वय ३०) यांच्या शेळ्यांच्या उघड्या शेडमधून २२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास बिटल क्रॉस जातीचा बोकड चोरीला गेला होता. या गुन्ह्याच्या तपासातून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्यानंतर अन्य चार गुन्ह्यांचीही उकल झाली.

पुढील तपास सुरू

दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी अटक करण्यात आली असून, या टोळीने आणखी काही चोरीचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत.

शेतकऱ्यांच्या पशुधनाची चोरी रोखण्यासाठी मिरज ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील पशुपालकांना दिलासा मिळाला आहे.

आयर्विन टाइम्स वृत्तसेवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *