‘किरणांच्या वाटेवर’ : कवयित्री नंदिनी साळुंखे

कवयित्री नंदिनी साळुंखे यांच्या ‘किरणांच्या वाटेवर’ या काव्यसंग्रहातून स्त्रीजीवनातील संघर्ष, कष्टकरी महिलांच्या वेदना, शेतकरी जीवन, निसर्गप्रेम आणि मायमराठीचा गौरव प्रभावीपणे व्यक्त झाला आहे. जाणून घ्या या काव्यसंग्रहाचे साहित्यिक वैशिष्ट्य.

कवयित्री ‘नंदिनी साळुंखे’ या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे वास्तव करत असून. त्यांचा ‘किरणांच्या वाटेवर’ हा पहिलाच काव्यसंग्रह आहे. त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी लिहिलेला असूनही हा महत्त्वपुर्ण काव्यसंग्रह नुकताच आता माझ्या वाचनात आला. मानवी मुल्यांची संस्कारी रुजवण करणाऱ्या या काव्यसंग्रहाची ‘केशव मेश्राम’ यांनी पाठराखण केली आहे. तर ‘फ. मु. शिंदेनी’ ब्लर दिले आहे. तसेच गझलकार ‘सुरेश भट्टांनीही’ कवयित्रीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. कवयित्रीचा लेखन प्रवास वयाच्या बाराव्या वर्षापासून सुरू झाला. तिच्या कविता केसरी, पुढारी, सकाळ, लोकमत,लोकसत्ता,तरुण भारत, गोमंत पुरवण्यातून तसेच विविध दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाल्या आहेत. मेनका, कापला या प्रातिनिधीक काव्यसंग्रहात व गझलांच्या संग्रहात महाराष्ट्र साहित्य पत्रिकेमध्येही गझल प्रसिद्ध झाली आहे. अंधांसाठी प्रसिद्ध झालेल्या ब्रेल लिपीतील जागतिक पातळीवर गझलसंग्रहात गझल समाविष्ट झाली आहे.

सांगली आकाशवाणीवरील कार्यक्रमांमध्ये कवयित्रीने वेळोवेळी सहभाग नोंदवला आहे. अखिल भारतीय मराठी गझल संमेलनात निमंत्रित सहभाग नोंदवून, राज्यभरातील विविध काव्य लेखन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवली आहेत. बेळगाव येथील शब्दगंध कवी मंडळाच्याही कवयित्री सचिव आहेत. कवयित्रीचे तन मन मातीशी एकरूप झाले आहे. म्हणून ती उगवत्या शैलीत पाऊल सारखी उत्स्फूर्त गझल लिहिते.
‘सये’ कवितेत स्त्रीच्या जगण्याचा संघर्ष, तिच्या कष्टाची वेदना मांडत स्वप्नपूर्तीचा आशावाद पेरताना कवयित्री लिहिते. भिजताना हरपले समद्या पाखरांचं भान, तुझ्या डोळ्यांमध्ये सये त्यांच्या ओळखीचं रान, चालताना उमगेना कुठं रुतला गं काटा, वेदनांनी विखुरल्या समद्या काळजात वाटा, जरी पसरली आज तुझ्या अंगणात रात, उद्या येईल भरात तुझ्या स्वप्नांची पहाट

‘धार’ कविता ही स्त्रीच्या कष्टाचा आलेख उंचावते बाईचं आयुष्य कष्टाने भरले आहे. उन्हाताना राबताना तिची सतत ओढाताण सुरू असते. याची कुणालाच दखल नसते. या कष्टप्रद जगण्यातून तिच्या अंतर्गत जगण्याला तलवारीची धार येते. म्हणजे बाईचं कष्टमय जगणं कसाला लागून करारी होते. यावेळी स्त्रीच्या अंतरंगाला स्पर्श करत कवयित्री लिहिते. काम करायासाठीच तुझा उगवे दिवस, भर उन्हाचा विस्तव तुझा लागतो गं कस, तुझा कस कसदार भिजे घामात पदर, मातीमध्ये शिंपडशी देहातलं सरोवर स्त्रीच्या घामाला सरोवर म्हणून कवयित्री तिच्या कष्टाच्या
तीव्रतेचा उद्धधोष करते. शेवटी म्हणते
जीवनात दाटलाय सारा युद्धाचा अंधार
जगण्याला तुझ्या आली आता तलवारीची धार

‘किरणांच्या वाटेवर’ : कवयित्री नंदिनी साळुंखे

‘कुपीत’ ही कविता आईच्या घामाचे मोल अधोरेखित करते. आईसाठी कवयित्री झाडाची प्रतिमा वापरून आईचा त्याग स्पष्ट करते. त्यावेळी म्हणते
‌ देई सावली सगळ्या, उभं एकटंच झाड
तशी माय एकलीच, तिला कष्ट जीवापाड
यासारख्या ओळीने एक आई, एक शेतकरी बाई गंध कष्टाच्या मातीचा काळजाच्या कुपीत ठेवून राबत राहते. म्हणजे ही कविता समस्त कष्टकरी स्त्री वर्गाचे प्रतिनिधित्व करते.

‘झोळी’ कविता बाईचे दुःख व्यक्त करते. बाईला थोरपण घेताना जीवनाची होळी पेटवावी लागते. आयुष्याचे समर्पन करावे लागते. तिचे दुःख रिझवण्यासाठी पृथ्वीची झोळी सुद्धा अपुरी पडते. अशा भावना व्यक्त करताना कवियत्री लिहिते
संसार जमविला तेव्हा धूसर छटा ना काळी
तापल्या तव्यावर भाजली तिच्या भावनांची पोळी
व शेवटी

डोळ्यांत दाटूनी झरल्या हळूवार गीतांच्या ओळी
रिझविण्या अपुरी होती पृथ्वीची फाटकी झोळी
अशा शब्दात स्त्रीत्वाच्या अमाप दुःखाची वेदनादायी संवेदनशील भावना व्यक्त करते.
‘इमान’ कविताही नात्यांचे अपुरेपण अधोरेखित करते.
‘मशाल’ मध्ये अंधारमय जीवनाला उजळणारी रात्र आहे.

‘सोस’ कवितेत जीवनातील दुःखाचा उजागर न करता, गंगास्नानाचा आनंद गाणी गात घेऊन क्षण जगण्याचा संदेश दिला आहे.
‘शोध’ मध्ये चांदण्या, वादळ, पावसाची धार, याच्यांशी एकरूप होऊन. दानवांचे देव झालेल्या पत्थरापुढे नतमस्तक होत. दूर असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाचा शोध आहे.
‘जाग’ कविता स्त्रीच्या कौटुंबिक समर्पनासाठी पुरुषप्रधान व्यवस्थेला तिच्या सन्मानासाठी जाग यावी हे सुचित करते.
वेचूनिया वेचूनिया जीव तिचा दमतो
डोकावून उंबऱ्याच्या बाहेर ना पडतो
आवळून बांधली ही बेडी तिच्या हाताची
तरी ओढते ती कशी दोरी रेशमाची
चालताना भीती दाटे मनी वाट चोरांची

पुरुषार्थांनो येवो तिच्या जाग सन्मानाची
मर्यादित राहून वैवाहिक आयुष्य जगणाऱ्या स्त्रीची भेदक व्यथा मांडताना, परंपरेच्या नावाखाली बांधलेल्या बेडीलाही रेशीम दोरीचा आविष्कार प्रदान करत कवयित्री स्त्रीच्या जीवनात सकारात्मकता पेरते. परंतु त्याच वेळी पुरुषप्रधान व्यवस्थेला तिच्या सन्मानासाठी जाग यावी अशी अपेक्षा व्यक्त करते. कारण आयुष्याची खडतर वाटचाल करत असताना तिला स्त्रीच्या सुरक्षिततेबाबतही भय आहे.
‘गीत’ कवितेत कवयित्री स्त्रीचे मातीत पाय खोलवर गेले तरी, अंबराचे गीत गाण्याची अभिलाषा व्यक्त करुन तिच्या अस्तित्वाचे विपुल प्रकटीकरण करते.
‘सावली’ कविता स्त्रीच्या अन्यायावर परखड प्रकाश टाकते
जात्यावरी गं ओवी, जात्यामध्ये भरडली
तिच्या पोटात वेदना तिची तिनंच दळली.

‘किरणांच्या वाटेवर’ : कवयित्री नंदिनी साळुंखे

असा स्त्रीच्या कष्टप्रद जगण्याचा संघर्षमय प्रवास मांडत
शेवटी म्हणते..
दुःख टाकून पाठीवर वाट अवघड चालली
तरी तिच्या पदराची साऱ्या जगावर सावली
म्हणजे कितीही दुःख असले तरी ते दुर्लक्षित करून जगावर सावलीचा पदर धरणारी स्त्री आपल्या मातृत्वाचे, दातृत्वाचे प्रकटीकरण करून बाईच्या पुर्णत्वाची साक्ष देते.

‘कहाणी’ कविताही काळजातील दुःखाचे कड दाबत ब्रम्हांड भेदून उरणार्‍या घराघरातील स्त्रीच्या ममतेचे प्रतिनिधित्व करते.
‘गाव हिंदोळला’ ही कविता स्त्रीची माहेरवरुन सासरी पाठवणी करताना माहेरवाशियांच्या मनातील हळवेपण जपते.
निघताना उंबरठ्याशी तिचा अडखळे पाय
तोल सावरुन राहे उभी दाराशी माय
सासरच्या अंगणात दिसे पिरतीचा मळा
ओला पदर मायेचा पाठीवर भिजलेला
हात हेलावत सया निरोपाला झाल्या गोळा
वेशीपाशी डोळ्यांमध्ये सारा गाव हिंदोळला

माहेरच्या नात्यातील ओसंडून वाहणारा विस्तृत जिव्हाळा व सासुरवाशीण लेकीविषयी ओतप्रेत भरलेली आपुलकीची भावना, ओथंबलेले हळवेपण जपते.
‘मातीत रुजल्या’ ही कविता यौवनाच्या उंबरठ्यावर आलेल्या पोरी ऐनवेळीच्या पावसात भिजलेल्याने त्यांच्यात निर्माण झालेली लाजरी स्त्री सुलभ भावना व्यक्त करते.
‘भूल’ या कवितेत कितीही दुःखाचे प्रसंग आले तरी जीवनाविषयी स्त्रीच्या मनात अत्यंत दुर्दम्य आशावाद पेरताना कवयित्री लिहिते,
मला नको देखावे वाटेवरल्या दिव्यांचे
अंतरीच्या गाभ्यातून उजळले मी
कसली भूल पाडलीस मला
जीवना तुझ्यावर एवढी भाळले मी

हेदेखील वाचा : दि. बा. पाटील यांची ‘पालट’ कादंबरी : ग्रामीण जीवन, संघर्ष आणि परिवर्तनाचा वेध

‘मानवतेचा अकुंर’ पेरणारी कविता स्त्रीच्या अन्यायावर परखड प्रकाश टाकते.
‘झरोखा’ पिलासाठी घरट्याबाहेर झेपावणाऱ्या चिमणीचे प्रतिबिंब स्त्रीच्या अस्तित्वाशी जोडून स्त्रीचे आत्मभान जागृत केले आहे.
‘नव्या उमेदीनं’ ही कविता स्त्रीच्या मनाची आंतरीक घालमेल व सोशीकता स्पष्ट करते. त्यावेळी कवयित्री लिहते.
आजवर उघड्या जगाला पांघरून घातलं
तळपत्या उन्हाला पोटात घेतलं चटक्यावर चटके सहन केले,आता मात्र सोलून निघालंच शरीराबरोबर मनही केव्हाच्या शोधत फिरताहेत गारवा. पण छे…
सारी ओसाड राने ज्यांना कधी अंकुरच फुटला नाही असं म्हणत त्या उदास सावल्या कोंदट भिंतीच्या आड हुंदके देत देतच विरघळून गेल्या….

‘जन्मदात्री’ स्त्रीची परंपरागत चालत आलेली मर्यादेची बंधन झुगारून मोकळेपणाने जीवन सृष्टी फुलवण्यासाठी आत्मनिर्भरता जोपासण्याची प्रेरणा देते.
दुःखावर मात करताना कवयित्री म्हणते.
व्यथांचा काळोख सावरताना मन होऊ लागलं आकाश..
बिंबमध्ये स्त्रीच्या व्यथांना सकारात्मकपणे बघण्याची कवयित्रीची दृष्टी आहे.
‘उत्तर’, ‘भीष्म’, स्त्री सुलभ भावना व्यक्त केली आहे.
‘आधार’ कविता स्त्रीला अमानुष कुंपण उखडून टाकले, तरी संघर्षाचा वणवा न पेटविता नात्यातील ओलावा टिकून ठेवण्यासाठी वैचारिक सुजाणत्व देते.
‘नव्याने जन्म’ कवितेत कवयित्री स्त्री जीवनाचा संघर्ष रेखाटताना तिला देवत्वा ऐवजी माणूसपण बहाल करावे म्हणून लिहिते.
मज नका गौरवू माता, मज नका बनवू देवता
घेईन जन्म नव्याने माणूस म्हणूनी आता.

‘प्रतिष्ठा’ कवितेत स्वतः अंधारातवर उभ राहून जगाला दिपवून टाकते. पण त्यासाठी स्वतः अंधारात उभारण्याची तयारी असावी लागते. हा संदेश कवयित्री देते.
‘समजूत’ कविता शेतकरी कुटुंबाची शेतीवर गुजराण करताना सावकारी पाशातून मुक्त होण्याचा आशावाद व्यक्त करुन, दिवाळीच्या सणाला मुलाला कपडे घेण्याचे आश्वासन देते. यामध्ये शेतकऱ्याच्या अभावग्रस्त जीवनाचे चित्रण स्पष्ट होते.
येई लाज व्हटावर रान उघडं दिसत,
पावसाच्या सपनांनी मन रिमझिम झिमत
‌चिंब हिरवंगार पीक दिसंल उमदं
दार धरी सावकार रिन फिटलं समदं
रऽडू ऽ नगं रं शिरप्या पैसा बक्कळ येईल
दिवाळीच्या सणासरी तुला कापडंऽऽघेईन
‘पल्याड’ कवितेत शेतकऱ्यांचे संघर्षमय जीवन रेखाटले आहे.

पोटामध्ये पडलेला अगडोंब विझवीत
उन्हं काटतोस कशी सपनांना सजवीत
जीव उगता उगता त्यानं आभाळ पाहिलं
.साऱ्या दुनियेसाठी तुझं काळीज वाहिलं
अशा शब्दात शेतकऱ्या प्रतीही कवयित्री कृतज्ञभाव जपते.
”ऐक सायली’ ‘स्वप्नवेडी’ व ‘रंग स्वप्नांचा’ या कवितेत निसर्गाच्या रंगाची उधळण आहे.
‘ मी पावसाळा झाले’ ही कविता जीवन सृष्टी फुलवण्यासाठी कवयित्री स्वतःच पावसाळा झाल्याची खूण आहे. ‘वळचण’ कविता पावसाच्या आगमनाने पाऊसमय झालेल्या मनाची साक्ष देते. थेंबानो गळून तापली धरणी होरपळू नका . पावसाच्या आगमना आधीच कवयित्री थेबांना धरतीवर न येण्यासाठी धोक्याची सूचना करत आहे.

‘कसा आवरु पाऊस’ ही कविता पावसाचे आनंददायी वर्णन करते.तर ‘नभा’ कवितेत पाऊसाची प्रतिक्षा आहे.
येशील येशील खाली
म्हणून
पहात नभा तुझ्याकडे
विव्हल झाली सारी धरणी
आधार तुझा देशील गडे
येशील..
अशी पावसाची आस धरली आहे.
‘पाश’ कविता ही पाऊसाची आबादाणी झाल्यावर
सजलेल्या श्रावणाचे वर्णन कवयित्रीने अतिशय सुंदर केले आहे.
न्हाऊ माखू घातलेल्या, चाले मातीची मिजास
सत्यामध्ये उतरले तिच्या स्वप्नातले भास
मातीचं हे रुपरंग दृष्टी लागेल श्रावणा
हिरवळीची नजाकत तिचा सजला रे मेणा
शेवटी मांडते

माय गाय सारख्याच त्यांचा पान्हा कासावीस
जीभ लेकरांची कडू तरी तुडंबते कास
मातीमध्ये गुंतलेले साऱ्या दुनियेचे पाश
जाग दुधाला आईच्या तिची ऊजव रे कूस

अतिशय सुंदर रुपके वापरून कवयित्रीने श्रावणातील हिरवळीने सजलेल्या सृष्टीचे व आईच्या व गायीच्या वात्सल्याचे भावविश्व समृद्ध केले आहे.
‘श्रावणगान’ मध्ये श्रावणातील हिरवळीने सजलेल्या सृष्टीचे वर्णन केले आहे.
‘चांदणं’ कवितेत कवयित्री अप्रतिम उपमा व प्रतिके वापरून कवितेचे सौंदर्य खुलवताना दिसते.
कसं चांदण चांदण,असू चांदण चांदण
हृदयाला भूलावण, जसं आभाळाच्या खाली
गोदंलया गोंदण

‘मायमराठी’ या कवितेत अतिशय मार्मिक शब्दात मराठी भाषेचा गौरव केला आहे
दिव्य तुझ्या स्पर्शाची ओढ मना लावशी
सारखी का अशी मला प्रिय सखी तू मोहविशी
आस मनी लागून राहे भव्य तुझ्या प्रासादाची
गंध स्पर्श पदरातला मायमराठी तू दरवळशी
स्वराज्याचे तोरण बांधल्या शिवरायाला घडविलेस तू महाराष्ट्राच्या भाळावरती मुकुट मानाचे चढविलेस तू
ज्ञानेशाची सुंदर ओवी अभंग गाथा तुकोरायाची
संत जनाई चोखामेळा हसत उभा गं विठू सावळा
सरस्वती ही गीत गाते अखंड तुझीया चरणावरती
झंकार तिच्या विणेमधले आमरण झाली तुझीच गीते

या संग्रहातील अनेक कविता स्त्रीच्या अन्यायावर परखड प्रकाश टाकतात. स्त्रीच्या जीवनातील मानसिक कुचंबणेचे अनेक कवितेत प्रकटीकरण दिसून येते.
या कविता स्त्रीच्या वैवाहिक जीवनावरील भेदक भाष्य करताना दिसतात. तिच्या कष्टाचा उजागर करताना स्त्रीच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावरही सुक्ष्म मोहर उमटवते. स्त्रीला देवत्व बहाल करण्याच्या प्रवृत्तीवर प्रहार करत, तिचे माणूसपण जपण्याचे सुचित करते. तिच्यातील अंतरीक ऊर्जेला चेतावीत विधायक शक्तीला आवाहन करते. शोषकांचा अनादी‌ काळापासूनचा अमानुष अजेंडा उजेडात आणते. ही कविता समस्त कष्टकरी शेतकरी स्त्री वर्गाचे प्रतिनिधित्व करते.

कवयित्रीची नाळ शेती मातीशी जोडली आहे. यातील कविता मोजक्या शब्दात आशय समृद्ध करत लयबद्ध शैली जपतात. कवयित्रीची निसर्गाशी जवळीक व विलक्षण कल्पना विलास दिसून येतो. ग्रामीण बोलीचे उठावदार समृद्धपण या कवितेत आहे. शेतकऱ्याच्या अभावग्रस्त जीवनाचे प्रतिबिंब यामध्ये चित्रीत केले आहे. माय मराठीचे महत्त्व विशद करणारी कविताही या काव्यसंग्रहात समाविष्ट आहे. ग्रामीण स्त्रीच्या आयुष्यातील व्यथांवर भाष्य करताना कवयित्री निसर्गाशीही साधर्म्य राखते. श्रावण, पाऊस, चिमणी या विषयांना स्पर्श करताना शेतकरी जीवनातील उणीवांवर प्रकाश टाकते. एकंदरीत स्त्रीची आत्मजाणीव अधोरेखित करणारा कवयित्री नंदिनी साळुंखे यांचा ‘किरणांच्या वाटेवर’ हा काव्यसंग्रह स्त्रीच्या अंतरंगातील घालमेल सिद्ध करतो.

-सौ.मेघा पाटील

काव्यसंग्रह – किरणांच्या वाटेवर
कवयित्री – नंदिनी साळुंखे
प्रकाशन – ‘रानगंध’, हेमंतनगर/ अजिंक्यनगर, इस्लामपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *