सांगली पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची धडक कारवाई. भिलवडीतील प्रमोद थोरात टोळीला तीन महिने, तर ईश्वरपूरमधील विजय साळुंखे टोळीला सहा महिने जिल्ह्यातून हद्दपार.
सांगली : जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सांगली पोलीस दलाने कठोर पाऊल उचलले आहे. भिलवडी आणि ईश्वरपूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारी टोळ्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले आहेत. प्रमोद सुरेश थोरात टोळीला तीन महिने, तर विजय शंकर साळुंखे टोळीला सहा महिने जिल्हाबंदी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५५ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. भिलवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रमोद सुरेश थोरात (वय ३२), राहुल किसन थोरात (वय २९), सागर बाळासाहेब कदम (वय ३०) आणि अमेय ऊर्फ अमेक्स संपतराव पाटील (वय २३) या चौघांचा टोळीत समावेश आहे. या टोळीविरुद्ध २०१८ ते २०२६ या कालावधीत खून, दरोडा, विनयभंग, खुनाचा प्रयत्न, घातक हत्यारांनी दुखापत करणे आणि पेट्रोलियम पदार्थांची चोरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे भिलवडी पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी किरण अवचर यांनी चौकशी केली. त्यानंतर सुनावणी पूर्ण करून चौघांना तीन महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले.

दुसरी कारवाई ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किल्लेमच्छिंद्रगड येथील विजय शंकर साळुंखे (वय २७), अतुल शंकर साळुंखे (वय ३०) आणि ओंकार मोहन कदम (वय २७) या तिघांच्या टोळीवर करण्यात आली आहे. या टोळीविरुद्ध २०१९ ते २०२५ या काळात घातक हत्यारांनी जबर दुखापत करणे, घरात घुसून खुनाचा प्रयत्न, जिवे मारण्याच्या धमक्या, गांजाची बेकायदेशीर साठवणूक व विक्रीचा प्रयत्न, लोकसेवकावर हल्ला करून खुनाचा प्रयत्न आणि अवैध दारूविक्री असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ईश्वरपूर पोलिसांनी सादर केलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांनी चौकशी केली. पडताळणी आणि सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या तिघांना सहा महिन्यांसाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी किरण अवचर, अरुण पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, ईश्वरपूरचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, भिलवडीचे सहायक पोलीस निरीक्षक किरण दिडवाघ यांच्यासह संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
