लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असूनही लाभ बंद झालेल्या महिलांना पुन्हा योजनेत सहभागी करून लाभ पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने जत तहसीलदारांकडे केली.
जत : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असूनही विविध कारणांमुळे योजनेतून वगळण्यात आलेल्या महिलांचा लाभ पुन्हा सुरू करावा, अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जत तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर करून शासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी केली.
राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांना आर्थिक आधार मिळत आहे. मात्र, विविध कारणांमुळे काही पात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. आर्थिकदृष्ट्या गरजू महिलांसाठी ही योजना महत्त्वाची असताना, पात्र महिलांचा लाभ बंद होणे ही गंभीर बाब असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले.
हेदेखील वाचा: जतच्या डफळे संस्थानचा ऐतिहासिक दसरा; चिणगीबाबांच्या बुरुजावर पांढरा ध्वज
योजनेतून वगळण्यात आलेल्या महिलांच्या प्रकरणांची संबंधित विभागाने सखोल तपासणी करावी. पात्र महिलांना पुन्हा योजनेत सहभागी करून त्यांचा बंद झालेला लाभ पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. कोणत्याही पात्र महिलेला तांत्रिक अडचणी किंवा अन्य कारणांमुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही संघटनेने म्हटले आहे.

हे निवेदन तहसीलदार प्रविण धानोरकर यांना सादर करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्या नर्गिस नदाफ, कॉ. हणमंत कोळी, समीर नदाफ, प्रशांत नाईक, निलेश पवार, सुरेश खुडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
“पात्र लाडक्या बहिणींना पुन्हा योजनेत सहभागी करून त्यांचा बंद झालेला लाभ पूर्ववत सुरू करा,” अशी ठाम मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. आता शासन आणि संबंधित प्रशासन या मागणीवर कोणती कार्यवाही करते, याकडे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांचे लक्ष लागले आहे.
