प्रा. डॉ. श्याम मोहरकर यांच्या ‘लालगुंजी’ कादंबरीचा चिकित्सक आढावा. झाडीपट्टीचे जीवन, झाडीबोली, ग्रामीण संस्कृती, दुष्काळ, अंधश्रद्धा आणि दुर्गाच्या संघर्षाची कहाणी.
झाडीपट्टीच्या मातीत अनेक साहित्यिक जन्मास येत आहेत. आपल्या लेखणीच्या तलवारी परजून साहित्यिक घोडदौड करीत अनेक साहित्य प्रकार पादाक्रांत करत आहेत. कविता, गझल, कथा, प्रवासवर्णन, आत्मकथा, बालसाहित्य, ललित , वैचारीक अशा अनेक साहित्य प्रकारात आपल्या साहित्याचा ठसा उमटवत आहेत. सोबतच कादंबरी सारखा दीर्घ साहित्य प्रकार सुद्धा लीलया हाताळत आहेत. अशोक पवार यांची बिऱ्हाड , सुरेश द्वादशीवार यांची तांदळा, डॉ. अनंता सूर यांची कटेरी पायवाट, डॉ. विद्याधर बन्सोड कोरकोंडा , संजय येरने यांची यमुना ,
पवन भगत यांची ते पन्नास दिवस , सदानंद लोखंडे यांची बिल्लोरी भिंत , सुगंधा शेंडे यांची फिपुली , शाम झाडे, पांडुरंग कांबळे यांची भिमायन, सुनीता कोंडबत्तूनवर , दादा देशकर यांची न्यायदंड असे काही कादंबरीकार आणि उत्तम कलाकृतींचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. त्यात आता प्रा. डॉ. श्याम मोहरकर यांच्या नावाचा समावेश करणे अगत्याचे ठरते. श्याम मोहरकर यांनी कादंबरी या लेखन प्रकारात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वतःची मोहर उमटवली आहे. मधुश्री प्रकाशनाने त्यांची झाडीपट्टीतील कौटुंबिक ससेहोलपट चीतारणारी ” लालगुंजी” ही कादंबरी प्रकाशित केली .
श्याम मोहरकर हे चंद्रपूर सारख्या शहरात बरीच वर्षे प्राध्यापक पदावर कार्यरत होते. प्राचार्य पदावरून ते सेवानिवृत्त्त झालेत . अध्यापन कार्यासोबतच त्यांनी झाडीचा सांस्कृतिक वारसा जोपासला. झाडीपट्टी रंगभूमीवर 300हून अधिक नाटकांतील अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
” झाडीपट्टीची शतकोत्तर वाटचाल ” हा त्यांचा महत्वाचा ग्रंथ प्रकाशित आहे . काही प्रातिनिधिक कविता संग्रहाचे संपादन सुद्धा त्यांनी केले . एक परखड वक्ता आणि समीक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे.
असे असतांना , त्यांच्या स्मृतींना उजागर करण्यासाठी कादंबरी या साहित्य प्रकाराची निवड केली. उणेपुरे पाऊणशे वर्षांपूर्वीच्या घडामोडींना वाचन प्रगल्भता , कल्पकता , स्वानुभव, भाषा समृद्धी आणि लेखन सामर्थ्याच्या बळावर ” लालगुंजीला” नवा आयाम दिला .
ही त्यांची पहिलीच कादंबरी. पण वाचकाला लेखणीचा नवखेपणा जाणवणार नाही इतकी ती सकस उतरली आहे. वाचनीय आहे.
कादंबरीचे मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार श्रीकृष्ण ढोरे यांनी रेखाटलेले आहे. दुर्गाच्या लढ्याची मध्यवर्ती कल्पना लक्षात घेऊन हे चित्र हुबेहुब त्यांच्या कुंचल्यातून उतरले .
ज्येष्ठ समीक्षक दा. गो. काळे यांची प्रस्तावना या कादंबरीला लाभली आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सुप्रसिध्द कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांनी पाठराखण म्हणून शुभेच्छा संदेश दिला आहे.
कादंबरी हा मानवी जीवन, अनुभव आणि कल्पनाशक्तीवर आधारित दीर्घ, वर्णनात्मक गद्य साहित्य प्रकार आहे.
कादंबरी म्हणजे कथा, व्यक्तिचित्रण, संवाद आणि वर्णने यांचा समावेश असलेली प्रदीर्घ कथा .
कादंबरीचा मूळ अर्थ ‘आसव’ किंवा ‘मद्य’ असाही लावला जातो, जो वाचकाला मंत्रमुग्ध करतो .
भालचंद्र नेमाडे यांच्या मते, “कादंबरी म्हणजे प्रदीर्घ भाषिक अवकाश असलेली आशयसूत्राचे अनेक पदर असलेली आणि विस्तृत संरचना मांडणारी कलाकृती होय” .
कादंबरीच्या अशा अनेक अभ्यासकांच्या व्याख्या सांगता येतील. या व्याख्याचे काटेकोर पालन करुन डॉ. मोहरकरांनी कादंबरी या साहित्य प्रकाराला लालगुंजीच्या रूपाने शब्दबद्ध करून स्वतःला कादंबरीकार म्हणून सिद्ध केले आहे.
लालगुंजी
***
झाडीप्रदेश हा अतिशय समृद्ध असा प्रदेश आहे. चंद्रपूर, गडचिरोली भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यांना “झाडीपट्टी ” म्हणून ओळखल्या जाते. जंगल व्याप्त प्रदेशामुळे या भागाला ” झाडी” म्हटल्या जाते. जल , जंगल, जमीन,रानमेवा, खनिज संपत्ती या सर्व बाबींची समृद्धता या भूभागाला लाभली आहे. त्यामुळे येथील शेतकरी, शेतमजूर फारसा सधन नसला तरी सुखी आहे असे नक्कीच म्हणता येईल. अनेकांना शेत जमीनी नाहीत. त्यामुळे मोल मजुरी करुन येथील माणसांचा उदर निर्वाह चालतो.
लालगुंजी या कादंबरीत भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील जूनोना चौरास, वालनी आसपासच्या परिसरातील कथानक शब्दबद्ध केले आहे.
कादंबरीतील भाषाशास्त्र
*******
झाडीबोली शब्द
गावखेड्यात अजुनही झाडी बोलीतूनच संवाद साधला जातो. परंतु पोटापाण्यासाठी शहरात गेलेल्या माणसांना माय बोलीचा विसर पडत आहे. डॉ. मोहरकर मात्र त्याला अपवाद आहेत. शहरात राहून देखिल त्यांनी कादंबरीच्या रूपाने पुढील पिढ्यांसाठी बोलीभाषेचा दस्तावेज तयार केला आहे. या कादंबरीत
बल्की ,
दडप्या पाऊस,
शिशीचा दिवा,
पानतूना ,मयाली, बाज ,छपरी, वराण्या, उंडरणे फोकणे ,डोंगी, कान्होरी ,तनिस, फळविने, चंदी, मेरवण ,आकर, बरड ,वजर ,लहंगा, झांपर अशा अनेक शब्दांचा खजिना वाचकाला सापडतो.
निवेदन पद्धती आणि दृष्टिकोन
**********
कादंबरी कोण सांगत आहे अर्थात निवेदक कोण आहे, कोणत्या भाषेत सांगत आहे , याला भाषाशास्त्रात मोठे महत्त्व आहे.
लालगुंजी कादंबरीत
तृतीयपुरुषी निवेदन शैली वापरण्यात आलेली आहे. ज्यात निवेदक सर्वसाक्षी आहे . यातील भाषा अधिक वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक आहे . शैली म्हणजे लेखकाची पाहण्याची किंवा विचार करण्याची पद्धत असे फ्लाबेर यांनी स्पष्ट केले आहे.
पात्रांची बोली:
*****
कादंबरीतील कथानक झाडीपट्टी परिसरातील असल्यामुळे अर्थातच वेगवेगळ्या पात्रांच्या तोंडी असणारी भाषा त्यांच्या सामाजिक, प्रांतीय आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचे प्रतिनिधित्व करणारी झाडीबोली आहे .
शैलीशास्त्र आणि भाषा प्रकार
********
यात कादंबरीकाराची स्वतःची एक लेखनशैली आहे . लेखक हे स्वतः झाडी परिसरातील रहिवाशी , वाचक, अभ्यासक असल्यामुळे त्यांच्या निवेदकाच्या भूमिकेतून केलेल्या लेखनात प्रमाण भाषेबरोबरीने काही झाडी बोली म्हणी, वाक्प्रचार, लोकोक्ती आदी शब्द संचायचा वापर आपसूक झालेला दिसून येतो.
उदा. दुर्गाची कंबर लागून आली. , हातापायांना चिखल्या झाल्या., संध्याकाळी दीड पाव दटावून सुखानं झोपायचा. , त्याला बैल बुद्धीचा समजून दुर्लक्ष केलं., शेजाऱ्या पाजाऱ्यांशी टर्राऊन बोलू वागू लागली.
शब्दकाळांत लेखक ग्रामीण शब्दांची पेरणी करतो . यावरून कादंबरीचे वातावरण , तिथला परिसर खऱ्या अर्थाने उजागर होतो . समृध्द होतो.
वाक्यरचना
****
कादंबरीतील वाक्ये छोटी आणि आटोपशीर आहेत . यावरून कथेचा वेग आणि ताणतणाव नियंत्रित केला जातो. वाचकाला कथावस्तू समजण्यास सुलभता लाभते. मुख्य कथानकाला प्रवाही करणारे उपकथानक या कादंबरीतून सहजरित्या लेखकाने हाताळले आहे .
बोलीभाषा आणि प्रमाणभाषा:
**********
ग्रामीण किंवा प्रादेशिक कादंबऱ्यांमध्ये उदा. व्यंकटेश माडगूळकर , आनंद यादव यांच्या कादंबऱ्यामध्ये प्रमाणभाषेसोबतच विशिष्ट कोल्हापुरी , सातारी बोलीभाषेचा प्रभावी वापर केला आहे . तसाच अनुभव लालगुंजीच्या निमित्ताने वाचकांना येतो. त्यामुळे प्रमाण भाषेला झाडीबोलीने शब्दांची रसदच पुरवली आहे. याचा नकळत साक्षात्कार होतो.
सामाजिक स्तर
*****
पात्राचे शिक्षण, जात, वर्ग आणि लिंग यानुसार त्याची भाषा बदलते . याचा प्रत्यय यातील प्रकरणांतून आल्यावाचून राहत नाही.
तथापि, शकीना कचारीन मुस्लिम असली तरी ती मराठीतच संवाद साधतांना दिसते.
” उरमिला वहिनी ss बांगड्या नाही भरा का? ”
व्यवसायाच्या निमित्ताने का होईना शकिना हिंदी विसरून मराठीशी समरस झालेली दिसून येते. त्यामुळे जाती – धर्माची तटबंदी तकलादू ठरते. शकिना गावातील स्त्रियांना आपलीशी वाटते.
” रंगीत कंगन नाई आणलीस काये सकीने तू?”
असे विचारणाऱ्या नर्मदाला उत्तर देताना शकिना अस्खलित झाडीबोलीत संवाद साधतांना म्हणते, ” आहेत नं मावसे, हे काहोत तं वडग्यात . देऊ का भरून तुलं ?”
कादंबरीमध्ये फक्त लेखकाचा आवाज नसतो तर विविध पात्रांचे, विचारसरणींचे आणि विविध भाषांचे अनेक ‘आवाज’ एकत्र येत असतात.
पात्रांमधील संवाद हे केवळ माहिती देत नाहीत, तर त्यांच्यातील अंतर्गत संघर्ष आणि नातेसंबंध भाषिक संकेतांद्वारे व्यक्त करतात.
लाल गुंजीतील बदलता गावगाडा :-
**********
शाळा..
***
उनेपुरे पाऊणशे वर्षापूर्वीच्या परिस्थितीचे समाजभान या कादंबरीच्या माध्यमातून आपल्या समोर डॉ. मोहरकरांनी उभे केले आहे.
गावात चौथी पर्यंत शाळा होती. शिक्षक आले. इमारत झाली. नंतर पाचवीचा वर्ग सुरु केला गेला. पुढे सहावी, सातवी चे वर्ग सुरु झाले. शाळा आणि परिसराचे सुशोभीकरण झाले. खेळ, अभ्यास यातील प्रगतीचा चढता आलेख वाखाणण्याजोगा आहे.
ज्या बिलवणे गुरुजींच्या हातून दुर्गा शिकली त्याच गुरूजींनी पुढे दुर्गाचा मुलगा कृष्णाला शिकवल्याचे दिसून येते.
शाळा बुडवून उनाडक्या करत फिरणारी गणेश, रवी , मनसाराम सारखी पोरं या गावातही सापडतात. पण त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असणारी आजी आहे. आपण शिकलो नाही पण आपल्या येणाऱ्या पिढ्यांनी शिकावं असं तिला वाटतं. त्यामुळे ती मुलांना मारत शाळेपर्यंत पोहोचवते.
संस्काराची शिदोरी पुरवणारे बिलवणे गुरुजी आहेत. बापाने हात टेकले तरी
” बापू ss, एक वेळ पंगत चुकली तरी चालल, पर संगत चुकू देऊ नको बरं ss!” असं काळजीपोटी सांगणारी माय पार्वती आहे .
गावगाड्यात शेतीला जोड धंदा म्हणून दूध दुभती जनावरे आहेत. दुधाचा व्यवसाय आहे. वळू , रेडा यांचे प्रजननासाठी व्यवसाय आहेत. शेळ्या , कोंबड्या , मासेमारी, बांगड्या विकणे, किराणा, चहाभजे, कॅटर असे छोटे मोठे व्यवसाय दिसून येतात.
व्यसनाधीनता आणि अंधश्रद्धा
************
कादंबरीत
सतत दारुच्या आहारी जाऊन लिव्हर खराब होऊन मृत्यूला कवटाळणारा भीवा भेटतो .
विठोबा तर महाबिलंदर माणूस. दारूच्या आहारी जाऊन स्वतःची सहा एकर शेती गमावतो. मरतुकडी म्हैस विकत घेतो. तिलाही विकतो. आणि साडे तीनशे रुपयांसाठी नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतो.
पोळ्याच्या रात्री रात्रभर पट्टे कुटणारे गावकरी आहेत.
गावात लहान सहान गोष्टींसाठी लोकं मतीराम भगताकडे जात. त्यात विशेषतः बायकांचा ओढा जास्त आहे. ‘बुवा तिथे बाया’ म्हणतात ते काही उगीच नाही. त्यात दुर्गा, भागा अश्या अनेक बायका आहेत. पण काही दिवसातच मतीरामची सिध्दी लयाला जाते. त्याची भांडाफोड होते आणि तो शेतीत निंदन खुरपण करायला जातो.
वीटभट्टीच्या व्यवसायात सारखे नुकसान सोसावे लागते . त्यामुळे टोकाचा निर्णय घेणारा ठेकेदार अंधश्रद्धेच्या आहारी जातो. मांत्रिकाला हाताशी धरून अघोरी उपाय योजना करतो. पारबाताच्या पायाळू निलीचा नरबळी देण्याचा अमानुष डाव आखतो.
दुर्गाच्या सतर्कतेमुळे हा डाव हाणून पाडला जातो.
स्कायलाब, आणीबाणी, दुष्काळ, इंदिरा गांधी हत्या या घटनांचे संदर्भ यात सापडतात.
गावातील सांस्कृतिक परंपरा
**
गावात शेती मातीच्या व्यवसायांसोबत सण, उत्सव, परंपरा यांचा सांस्कृतिक वारसा जोपासला आहे. पोळा हा सण उत्साहात साजरा केला जातो. बैलांना सजवले जाते. गोडधोड पदार्थ बनवले जातात. पोळ्याच्या झळत्या बोलल्या जातात. लहान थोरांना लोकांना अक्षता लावून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात. पोळ्याचे निमित्ताने नाते संबंध जोपासले जातात.
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दही हांडी, गोपाळकाला, भजन अशा कार्यक्रमांची रेलचेल दिसून येते.
पवनी शहरातील दसरा या सणाचा अस्कारा पंचक्रोशीत असल्यामुळे लोक त्या निमित्ताने बघायला जातात.
लग्न समारंभात बोलली जाणारी लग्नाची वेग वेगळी गाणी आहेत. ती आजही लग्न प्रसंगी ऐकावयास मिळतात. या कादंबरीतून लोक गीतांचा पारंपरिक दस्तावेज पिढ्या दर पिढ्या जोपासला जाणार आहे. रोजगार हमी योजना चालू झाली असताना शाहिराने रचलेले काव्य आहे.
शेतात धानाची रोवणी करतांना गुत्त्यातील बायकांनी म्हणावयाची,” रोवण्याची लोकगीते” कादंबरीतून अनुभवायला मिळतात.
पार्श्वभूमी
या कादंबरीला 1971 च्या युद्धाची पार्श्वभूमी आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना आलेली आणीबाणी, दुष्काळ, त्यात वाटप झालेला लालगुंजी , मिलो, रोजगार हमी, इंदिरा गांधी यांची हत्या अश्या अनेक घडामोडी आणि तत्कालीन समाज मनावर झालेले परिणाम कादंबरीतून वाचायला मिळतात. या सगळ्या बातम्या रेडियोच्या माध्यमातून लोकांना ऐकावयास मिळतात.
लोकांच्या हातात काम मिळत नाही. खायला मिळत नाही. अशा विदारक परिस्थितीला सामोरे जावे लागते. 1972च्या दुष्काळजन्य परिस्थितीत पुरवण्यात आलेली अमेरिकन मीलो लाल गुंजी खाल्ल्यामुळे लोकांना पोटाच्या विकारांना सामोरे जावे लागते.
1987 चा भारत श्रीलंका शांति करार , बोफोर्स तोफा खरेदी, बाबरी मस्जिद तोडफोड , राम मंदिर उभारण्यासाठी रथयात्रा अशा अनेक राजकीय घटनांचा आढावा सदर कादंबरीत घेतलेला आहे.
गावाचा परिसराचा विकास सुद्धा यातून अनुभवास येतो. गावात शाळा झाली. पाचवी नंतर सातवीचे वर्ग सुरु झाले.
पवनी येथे नदीवर भव्य पुलाची निर्मिती झाली. त्यामुळे यातायात सुविधा निर्माण झाली.
पवनी गोसे गावाजवळ इंदिरा सागर धरणाचे भूमी पूजन राजीव गांधी यांचे हस्ते विलास मुत्तेमवार यांचे माध्यमातून अशी विकास कामे झाली. लोकांनां रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.
दुर्गाच्या संघर्षाची कहाणी
********
दुर्गा ही लालगुंजी कादंबरीची नायिका . लहानपणापासूनच ती धाडसी आहे . जिद्दी आहे . अभ्यासू आहे. कष्टाळू आहे.
तिच्या जन्मापूर्वीपासून तर मृत्यूपर्यंतचा काटेरी प्रवास डॉ. मोहरकरांनी या कादंबरीतून उभा केला आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील जुनोना चौरास हे तिचे जन्मगाव.
शेतकरी कुटुंबात जन्म झाला असल्यामुळे लहानपणापासूनच तिचा शेती विषयक कामांशी परिचय झाला.
गुणवत्ता खोंडाच्या वेसणीला धरून त्याला वठणीवर आणणारी दुर्गा धाडशी आहे. गावाशेजारी लागून असलेली नदी वारंवार पार करावी लागत असल्यामुळे ती पट्टीची पोहणारी आहे. शालेय खेळात सुद्धा ती अव्वल आहे शिष्यवृत्ती पटकवणारी गावातील मुलगी आहे . असे असताना तिच्या वडिलांनी तिला लग्नाच्या बंधनात बांधलं आणि तिच्या आयुष्याच्या पडझडीला सुरुवात झाली.
अल्पावधीतच तिच्यावर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली .
तिला संघर्षाला सामोरे जावे लागते. त्यातूनही ते मार्ग काढत आयुष्याची लढा देत तिच्या मुलाच्या शिक्षणासाठी रक्ताचं पाणी करते . या कादंबरीचा शोकांत काळजाला ठसका लावून जातो. ती आत्महत्या का करते ? याचे उत्तर शोधण्यासाठी वाचकांनी ही कादंबरी आवर्जून वाचली पाहिजे . दुर्गाच्या काटेरी प्रवासाचा दुर्दैवी अभिलेख,
झाडीपट्टीचा हा दस्तावेज संग्रही ठेवला पाहिजे. असे मला वाटते.
डॉ. मोहरकर यांना त्यांच्या लेखनासाठी भरभरून शुभेच्छा. त्यांच्या हातून याहून सरस कलाकृतींचा जन्म व्हावा .
निष्कर्ष
1) झाडीचा निसर्ग , शेती , तिथली बोली भाषा, माणसांचं जगणं , तिथला भवताल या कादंबरीतून उजागर करण्यात आला आहे .
2) या कादंबरीची लांबी थोडी कमी करता आली असती .
3) जन्मापासून तर मृत्युपर्यंतचा जीवघेणा प्रवास एकल स्त्रियांसाठी प्रेरणादायी आहे.
5) आयुष्यभर संघर्ष करणारी दुर्गा मृत्यूला कवटाळते . हा शेवट वाचकाला हुरहुर लावणार आहे .
6) आयुष्याकडे सकारात्मक पाहणारी दुर्गा शेवटी नकारात्मक संदेश देऊन जाते.
कादंबरी… लालगुंजी
प्रकाशक …मधुश्री प्रकाशन , पुणे
मुखपृष्ठ ..श्रीकृष्ण ढोरे
एकूण पृष्ठ संख्या..265
मूल्य…530/-
*************
रोशनकुमार शामजी पिलेवान
लेक व्ह्यू रेसिडेन्सी , गोडोली नाका , सातारा
पिन 415001
मो. 7798509816
