जत तालुक्यातील डफळापूर येथे अनैतिक संबंधातून पतीच्या खुनाचा कथित कट दीड महिन्यानंतर उघडकीस आला. हृदयविकाराचा बनाव करून अंत्यसंस्कार केल्याचा आरोप; पाच जणांवर गुन्हा दाखल.
जत : डफळापूर (ता. जत) येथे अनैतिक संबंधातून पतीच्या खुनाचा कथित कट रचल्याची धक्कादायक घटना तब्बल दीड महिन्यानंतर उघडकीस आली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पत्नी, मुलगी आणि अन्य तिघांविरुद्ध खून व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा जत पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
आप्पासाहेब लक्ष्मण चव्हाण (वय ५२, रा. परोळेकर मळा, डफळापूर) असे मृताचे नाव आहे. २२ ऑगस्टच्या रात्री ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मृताचे भाचे राजू उर्फ मनोजकुमार तानाजी जाधव यांनी याबाबत फिर्याद दिली.
या प्रकरणी मृताची पत्नी सुनिता आप्पासाहेब चव्हाण, गंगाधर रामू तेली (रा. तेली वस्ती, डफळापूर), विक्रांत सर्जेराव चव्हाण (रा. चव्हाण वस्ती, कोकळे, ता. कवठेमहांकाळ), प्रतीक लक्ष्मण मोकाशी (रा. चव्हाण वस्ती, कोकळे) आणि मृताची मुलगी सोनू उर्फ ऐश्वर्या आप्पासाहेब चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
१८ वर्षांच्या संबंधातून वाद
पोलिसांच्या माहितीनुसार, सुनिता चव्हाण आणि गंगाधर तेली यांच्यात गेल्या १८ वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा आरोप आहे. याची माहिती आप्पासाहेब यांना झाल्यानंतर पत्नीवरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. याच कारणातून सुनिता आणि गंगाधर यांनी आप्पासाहेब यांच्या खुनाचा कथित कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.
गंगाधरने मित्र विक्रांत चव्हाण याला एक लाख रुपये देण्याचे ठरवून प्रतीक मोकाशी यालाही या कटात सहभागी करून घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

जेवणातून गुंगीचे औषध दिल्याचा आरोप
२२ ऑगस्टच्या रात्री सुनिताने आप्पासाहेब यांच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळल्याचा आरोप आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास घराचा दरवाजा उघडून गंगाधर, विक्रांत आणि प्रतीक यांना घरात प्रवेश देण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, विक्रांतने आप्पासाहेब यांचे हात पकडले, तर प्रतीकने पाय पकडले. त्यानंतर गंगाधरने उशीने तोंड दाबून आणि हाताने गळा आवळून त्यांचा खून केल्याचा आरोप आहे. यावेळी ऐश्वर्याने घराबाहेरील कुत्र्याला पकडून ठेवले असल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेदेखील वाचा: जत: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस चार वर्षे सक्तमजुरी; 50 हजारांचा दंड
हृदयविकाराचा बनाव; अंत्यसंस्कारही उरकले
खून केल्यानंतर आप्पासाहेब यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. सुनिता आणि ऐश्वर्या यांनी नातेवाईकांना याची माहिती दिली. रुग्णालयात डॉक्टरांनी आप्पासाहेब यांना मृत घोषित केल्यानंतर शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, कपडे, अंथरूण आणि उशी जाळून कथित पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
दीड महिन्यानंतर गूढ उकलले
१ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडून संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुनिताने फिर्यादीसमोर कथित गुन्ह्याची कबुली दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर जाधव यांनी चौकशी करून खात्री केल्यानंतर जत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिस निरीक्षक विजय घेरडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या प्रकरणातील आरोपींची भूमिका, खुनामागील नेमका घटनाक्रम आणि पुरावे याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
