जतच्या राजे रामराव महाविद्यालयात शाश्वत ऊर्जा विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा; आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर तम्मनगौडा रविपाटील यांचे आरोप. जत येथे ‘लोकनेते शरद जोशी कृषी महाविद्यालय’ सुरू करण्याची पडळकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
जत येथील राजे रामराव महाविद्यालयात सायन्स विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन; शाश्वत ऊर्जा उपायांसाठी कार्यक्षम पदार्थांच्या प्रगत संश्लेषण पद्धती या विषयावर कार्यशाळा
आयर्विन टाइम्स
जत, (प्रतिनिधी): श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित राजे रामराव महाविद्यालय, जत येथील भौतिकशास्त्र विभाग, रसायनशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शाश्वत ऊर्जा उपायांसाठी कार्यक्षम पदार्थांच्या प्रगत संश्लेषण पद्धती’ या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन मंगळवार, दि. 25 ऑगस्ट, 2026 रोजी करण्यात आले असून या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेस जास्तीत जास्त संशोधकांनी व प्राध्यापकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य कृष्णा रानगर व समन्वयक डॉ.आप्पासाहेब भोसले यांनी केले.
आजच्या काळात शाश्वत ऊर्जा निर्मिती, ऊर्जा साठवणूक आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या विकासासाठी नवीन व कार्यक्षम पदार्थांची निर्मिती अत्यंत महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत कार्यक्षम पदार्थांची निर्मिती, प्रगत संश्लेषण तंत्रज्ञान, नॅनोपदार्थ, ऊर्जा साठवणूक, सौरऊर्जा, थर्मोइलेक्ट्रिक ऊर्जा, इंधन पेशी आणि शाश्वत ऊर्जा तंत्रज्ञान यांसारख्या विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्रीमंत इंद्रजीतराजे डफळे सरकार भूषविणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रो. डॉ. एस. एस. कोळेकर हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेसाठी चीन येथील हेनान विद्यापीठातील रसायनशास्त्र व आण्विक विज्ञान महाविद्यालयाचे डॉ.आर.एस. सुतार तसेच दक्षिण कोरिया येथील डोंगगुक विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स व विद्युत अभियांत्रिकी विभागाचे डॉ.ए.एम. तेली हे आमंत्रित तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. समारोप समारंभासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य श्री. कृष्णा बिसले प्रमुख पाहुणे म्हणून, तर विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. संजय लट्ठे विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेमुळे विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांना आधुनिक संशोधन पद्धती, नवीन तंत्रज्ञान आणि शाश्वत ऊर्जा क्षेत्रातील संशोधनाच्या विविध संधींची माहिती मिळणार आहे. तसेच देश-विदेशातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची आणि संशोधनातील नवीन प्रवाह समजून घेण्याची संधी सहभागींना मिळणार आहे. तरी विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधकांनी या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.कृष्णा रानगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. आयोजन समितीचे समन्वयक म्हणून प्रो.डॉ.ए.के.भोसले, सहसमन्वयक म्हूणन डॉ.अरविंद पवार व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.शिवाजी कुलाळ यांच्याबरोबर विविध विभागांचे प्राध्यापक व समिती सदस्य कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.
पडळकर दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय लाटत आहेत; राजीनामा द्यावा : तम्मनगौडा रविपाटील
आयर्विन टाइम्स
सांगली : जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे नेतृत्व अपयशी ठरले असून, ते दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. तसेच त्यांच्या कार्यपद्धतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तम्मनगौडा रविपाटील यांनी दिला.
रविपाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आमदार पडळकर यांच्यावर विविध आरोप केले. जत तालुक्यातील माडग्याळ येथे जिल्हा परिषदेच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमिपूजन २२ ऑगस्ट रोजी आमदार जयंत पाटील आणि माजी आमदार विलासराव जगताप यांच्या उपस्थितीत नियोजित होते. मात्र, त्यापूर्वीच आमदार पडळकर यांनी घाईघाईने माडग्याळ येथे जाऊन परस्पर भूमिपूजनाचा कार्यक्रम केल्याचा आरोप रविपाटील यांनी केला.
यापूर्वीही जत तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्राचे निवडणुकीपूर्वी अशाच पद्धतीने उद्घाटन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. दुसऱ्यांच्या प्रयत्नातून आणि निधीतून होणाऱ्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न योग्य नसल्याचे सांगत पडळकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रविपाटील यांनी केली.
आमदार पडळकर यांनी जत तालुक्यात एमआयडीसी उभारणे, सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची बांबू लागवड, जलजीवन मिशनची कामे तसेच प्राणिसंग्रहालय उभारण्याची आश्वासने दिली होती. मात्र, यापैकी अनेक कामे अद्याप मार्गी लागलेली नाहीत, असा दावा रविपाटील यांनी केला. उमदी एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द केल्याचे पुणे येथील सहसंचालकांना कळविल्याचे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते, असा उल्लेखही त्यांनी केला.
माडग्याळ गटाच्या जिल्हा परिषद सदस्य व सभापती सावित्री रविपाटील यांच्या मतदारसंघात पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमिपूजन करण्यापूर्वी संबंधित प्रक्रिया पाळली गेली नसल्याचा आरोपही रविपाटील यांनी केला. या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ‘देवभूमी जत’ या संकल्पनेवरही रविपाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. जतला ‘देवभूमी’ करण्याची मागणी नेमकी कोणी केली आणि त्यातून काय साध्य होणार, याचा खुलासा आमदार पडळकर यांनी करावा, असे ते म्हणाले. पडळकर यांनी तालुक्यातील वातावरण दूषित करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
जत येथे “लोकनेते शरद जोशी कृषी महाविद्यालय’ सुरू करण्याची मागणी; आ. पडळकरांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

आयर्विन टाइम्स
जत,( प्रतिनिधी) : जत तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार कृषी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जत येथे ‘लोकनेते शरद जोशी कृषी महाविद्यालय’ सुरू करावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन साद केले.
जत तालुका हा प्रामुख्याने कृषिप्रधान असून, बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र, संपूर्ण जत विधानसभा मतदारसंघात एकही शासकीय कृषी महाविद्यालय नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणासाठी दूरच्या ठिकाणी जावे लागते. आर्थिक अडचणींमुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लोकनेते शरद जोशी यांच्या नावाने जत येथे कृषी महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली. कृषी विभागाच्या अखत्यारितील उपलब्ध शासकीय जागेचा या महाविद्यालयासाठी उपयोग करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला आहे.
महाविद्यालय सुरू झाल्यास जत तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर उच्च कृषी शिक्षणाची सुविधा उपलब्ध होईल. त्याचबरोबर कृषी संशोधन, आधुनिक शेती तंत्रज्ञान, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि कृषीपूरक व्यवसायांना चालना मिळण्यास मदत होईल, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
महाविद्यालयासाठी आवश्यक इमारत, प्रयोगशाळा, ग्रंथालय, प्रात्यक्षिक सुविधा तसेच आवश्यक पदनिर्मितीसाठी आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, अशी मागणीही आमदार पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
