जतमध्ये 43 वा श्री अंबिका नवरात्रोत्सव

जतच्या श्री अंबाई डोंगरावर ११ ते २६ ऑक्टोबरदरम्यान ४३ वा श्री अंबिका नवरात्रोत्सव व कोजागरी पौर्णिमा यात्रा महोत्सव; महाआरती, भजन, महापूजा व महाप्रसादाचे आयोजन.

जत (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा) : जत येथील श्री अंबिका सांस्कृतिक भवन आणि श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा ४३ वा श्री अंबिका नवरात्रोत्सव व कोजागरी पौर्णिमा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. ११ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत श्री अंबाई डोंगरावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, नवरात्र काळात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

महोत्सवाची सुरुवात ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता घटस्थापनेने होणार आहे. यावेळी प्रातःकाळी अभिषेक, अखंड दीपप्रज्वलन, जागरण व पूजनविधी पार पडणार आहेत. १५ ऑक्टोबर रोजी ललिता पंचमीनिमित्त विशेष पूजा व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता दुर्गा मॅरेथॉन  आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी महाष्टमीनिमित्त महालक्ष्मी पूजन, कुमारिका पूजन, आतिषबाजी,घागरी फुंकणे, दिवटी उत्सव आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८ वाजता आणि रात्री १० वाजता गोंधळ जागरण होणार आहे. नवरात्रोत्सवातील धार्मिक विधींना यामुळे विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.

२० ऑक्टोबर रोजी विजयादशमीनिमित्त सकाळी ९.३० वाजता नवरात्रोत्थापन, अभिषेक व सालंकृत पूजा होणार आहे. दसऱ्याच्या दिवशी देवीची सालंकृत पूजा-अर्चा व अभिषेक झाल्यानंतर मंदिराचा दरवाजा बंद केला जातो. त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेला मंदिराचा दरवाजा उघडला जातो आणि याच दिवशी मोठी यात्रा भरते.

कोजागरी पौर्णिमा यात्रेनिमित्त २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता अभिषेक व महापूजा तसेच देवी सहस्रनामावली पठण होणार आहे. दुपारी १२ वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

जत

दररोज महाआरती, भजनाचे आयोजन

महोत्सवाच्या काळात दररोज सकाळी आणि सायंकाळी ७.३० वाजता नित्य महाआरती, तर दुपारी ४ ते ७ या वेळेत नित्य भजन आयोजित करण्यात आले आहे. नवरात्र काळात काही भाविक नऊ दिवस डोंगरावर मुक्काम करून उत्सवात सहभागी होतात. घागरी फुंकणे, दिवटी तेवत ठेवणे, गोंधळ-जागरण तसेच विविध धार्मिक विधींना या उत्सवात पारंपरिक महत्त्व आहे.

जत संस्थानच्या डफळे घराण्याने येथील अंबाबाईच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला डोंगरावर छोटेसे मंदिर होते. कालांतराने भाविकांची संख्या वाढत गेली आणि परिसराच्या विकासाची गरज लक्षात घेऊन श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली.

भाविकांची वर्गणी आणि दानशूर व्यक्तींच्या देणगीतून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. भव्य मंदिर व सभामंडप उभारण्यात आला. नवरात्रोत्सवाच्या काळात पहाटेपासून भाविक पायी डोंगराकडे येत असत. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन जत एसटी आगाराकडून नवरात्र काळात सकाळ-संध्याकाळ बससेवा सुरू करण्यात आली. गर्दीनुसार आता जादा बसगाड्याही सोडल्या जातात.

हेदेखील वाचा : जत परिसरात चोरीच्या घटनांनी धडकी; उमदीत अपघात, तर जिल्हा बँक निवडणुकीत ‘हाय व्होल्टेज’ लढतीची चाहूल

धार्मिक स्थळासोबत पर्यटनस्थळाची ओळख

जत शहरापासून दक्षिणेला सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर, अथणी मार्गालगत डोंगरावर श्री अंबाबाईचे हे वसतीस्थान आहे. निसर्गरम्य वातावरण आणि शांत परिसरामुळे अंबाबाई डोंगराला धार्मिक स्थळासोबतच पर्यटनस्थळाची ओळखही मिळत आहे. नवरात्र काळात तसेच देवीच्या वारादिवशी भाविकांची मोठी गर्दी होते. सुट्टीच्या दिवशी कुटुंबांसह नागरिक येथे येतात, तर परिसरातील शाळांच्या वनभोजनाच्या सहलीही आयोजित केल्या जातात.

परिसरात शिस्तबद्ध नियोजन करण्यात आल्याने भाविकांना येथे येणे सोयीचे होत आहे. शासनाकडूनही हा डोंगर परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याने अंबाबाई डोंगराचे महत्त्व आगामी काळात आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

जत

मंदिर २१ ते २५ ऑक्टोबरदरम्यान दर्शनासाठी बंद

दरम्यान, २१ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत श्री अंबाबाई देवी विश्रांतीस्तव मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. भाविकांनी याची नोंद घेऊन त्यानुसार दर्शनाचे नियोजन करावे, असे आवाहन श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सव आणि कोजागरी पौर्णिमा यात्रेतील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *