सांगली जिल्हा 46 व्या युवा महोत्सवात मिरज

सांगली जिल्हास्तरीय ४६ व्या युवा महोत्सवात मिरजच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयाने वैयक्तिक स्पर्धा सर्वसाधारण फिरता चषक पटकावला. विद्यार्थ्यांनी ११ कलाप्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली.

मिरज : विद्यार्थी विकास मंडळ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि राजे रामराव महाविद्यालय, जत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०२६-२७ मधील ४६ व्या सांगली जिल्हास्तरीय युवा महोत्सवात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरजच्या विद्यार्थ्यांनी अष्टपैलू कलागुणांचे दर्शन घडवत उल्लेखनीय यश संपादन केले. महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये प्रभावी कामगिरी करत महाविद्यालयाने वैयक्तिक स्पर्धा सर्वसाधारण फिरता चषक पटकावला.

या युवा महोत्सवात सांगली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकूण १३ पैकी ११ कलाप्रकारांत सहभाग नोंदवत विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.

सांगली जिल्हा 46 व्या युवा महोत्सवात मिरज

लोकनृत्य स्पर्धेत समीक्षा पाटील, रब्बना सनदी, हर्षदा शिनगारे, श्रेया पाटील, दिक्षा माने, आरती बनसोडे, वैष्णवी नलावडे, मेहेक शेख, रेहान शेख आणि ओंकार अंकली यांच्या संघाने झारखंडमधील संथाल नृत्य सादर करत पाचवा क्रमांक मिळवला.

सामाजिक विषयावर आधारित ‘नथिंग टू से’ या एकांकिकेत ऋता डांगे आणि शिवेंद्र पाटील यांनी प्रभावी अभिनय सादर करत चतुर्थ पारितोषिक मिळवले. धारणा आवटे, अर्जुन साळुंखे, सायली पिसे, सौरभ ठोकळे, ओंकार अंकली आणि रेहान मुजावर यांच्या ‘स्टंटमन’ या मूकनाट्याला पाचवा क्रमांक मिळाला.

हेदेखील वाचा: जत येथे 46 वा युवा महोत्सव उत्साहात; 56 महाविद्यालयांतील 1289 विद्यार्थ्यांचा सहभाग

धारणा आवटे, अभिनंदन बावरे, सिद्धी कांबळे, कल्याणी माने, शिवेंद्र पाटील आणि अर्जुन साळुंखे यांनी सादर केलेल्या ‘अच्छा हूँ, मैं अंधा हूँ’ या प्रहसनाला तृतीय क्रमांक मिळाला. वादविवाद स्पर्धेत समीया बारगिर आणि तरन्नुम शेख यांनी आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर चतुर्थ क्रमांक पटकावला.

एकपात्री अभिनयात ऋता डांगे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. वक्तृत्व स्पर्धेतही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपली छाप पाडली. मराठी विभागात ऋता डांगे हिने तृतीय, हिंदी विभागात समीया बारगिर हिने द्वितीय आणि इंग्रजी विभागातही समीया बारगिर हिने द्वितीय क्रमांक मिळवला.

सांगली जिल्हा 46 व्या युवा महोत्सवात मिरज

या यशस्वी कामगिरीसाठी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. यशवंत हरताळे, डॉ. स्वाती हाके, डॉ. राजेंद्र लवटे, प्रा. सुहास वाघमोडे, डॉ. सविता राऊत, श्रीमती आशा पोतलवाड, डॉ. संजय कांबळे, प्रा. प्रशांत बेळंकी, डॉ. शिल्पा खैरमोडे आणि श्री. चिंदू अस्वले यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. अर्जुन जाधव तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विजेत्या आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना मिळालेले योग्य व्यासपीठ यामुळेच हे यश शक्य झाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, जिल्हास्तरीय युवा महोत्सवातील यशानंतर महाविद्यालयाचे हे यशस्वी विद्यार्थी ६ ऑक्टोबरपासून मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे होणाऱ्या मध्यवर्ती युवा महोत्सवात सहभागी होणार आहेत. या कामगिरीबद्दल मिरज परिसरातून विद्यार्थ्यांचे आणि महाविद्यालयाचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *