मिरज ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. तांत्रिक माहितीच्या आधारे वेगवेगळ्या राज्यांतून ४ लाख ३५ हजार रुपये किमतीचे २० गहाळ मोबाईल शोधून नागरिकांना परत केले. २०२६ मध्ये आतापर्यंत ४८ मोबाईलचा शोध.
मिरज : वेगवेगळ्या ठिकाणी गहाळ झालेले मोबाईल शोधून ते नागरिकांना परत करण्याची कामगिरी मिरज ग्रामीण पोलिसांनी केली आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तब्बल ४ लाख ३५ हजार रुपये किमतीचे २० मोबाईल शोधून काढले असून ते संबंधित नागरिकांच्या स्वाधीन केले आहेत. वेगवेगळ्या राज्यांतून आणि ठिकाणांहून हे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल शोधण्यासाठी सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांनी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी गहाळ मोबाईलचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन केले.

या पथकाने मोबाईलच्या तांत्रिक माहितीचा मागोवा घेत गहाळ मोबाईलचा शोध सुरू केला. त्यातून विविध ठिकाणी आणि राज्यांमध्ये असलेले २० मोबाईल शोधून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. या सर्व मोबाईलची एकूण किंमत सुमारे ४ लाख ३५ हजार रुपये आहे. शोधलेले मोबाईल संबंधित नागरिकांना परत करण्यात आले.
हेदेखील वाचा: ईश्वरपूर कामेरी नाका खून प्रकरण : दोघे आरोपी 24 तासांत अटक; कासेगावातून घेतले ताब्यात
विशेष म्हणजे, मिर-ज ग्रामीण पोलिसांनी सन २०२६ मध्ये आतापर्यंत एकूण ४८ गहाळ मोबाईलचा शोध घेतला आहे. यापैकी काही मोबाईल यापूर्वीच संबंधित नागरिकांना परत करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत संकपाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण यादव आणि पोलीस कॉन्स्टेबल वसंत कांबळे यांनी केली.
