जत तालुक्यातील कंठी येथे 30 वर्षीय विवाहितेचा धारदार शस्त्राने खून

कंठी येथील मोठेवाडीवर ३० वर्षीय राजाक्का खरात यांचा धारदार शस्त्राने वार करून खून. प्रेमसंबंधातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज; मुख्य संशयितासह दोघे जत पोलिसांच्या ताब्यात.

जत : तालुक्यातील कंठी गावालगतच्या मोठेवाडी येथील खरात वस्तीवर ३० वर्षीय विवाहितेचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. १५) सायंकाळी घडली. राजाक्का काशीराम खरात (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. प्रेमसंबंधातून तसेच भेटण्यास नकार दिल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपीसह त्याच्या एका साथीदाराला जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राजाक्का यांचे माहेर जत तालुक्यातील बागेवाडी येथील असून, आठ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह कंठी येथील काशीराम खरात यांच्याशी झाला होता. त्या उच्चशिक्षित होत्या. पुण्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत नोकरी करण्याबरोबरच खासगी क्लासेसही घेत होत्या. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त त्या सुमारे दहा दिवसांपूर्वी गावी आल्या होत्या.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजाक्का यांचे कंठी परिसरातील एका तरुणासोबत गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. रविवारी संबंधित तरुणाने त्यांना वारंवार फोन केले. मात्र, त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. यामुळे संतप्त झालेला तरुण आपल्या एका साथीदारासह थेट खरात वस्तीवरील त्यांच्या घरी पोहोचला. यावेळी मुख्य संशयिताने राजाक्का यांच्या पोटावर आणि शरीराच्या अन्य भागांवर धारदार सुरा व चाकूने वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजाक्का यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार त्यांच्या आईसमोर घडल्याची माहिती आहे.

हेदेखील वाचा : संतोष काटे यांची स्वीकृत संचालकपदी निवड; जत तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे सत्कार

खून करून उसाच्या फडात लपले

हत्येनंतर मुख्य संशयित आणि त्याचा साथीदार घटनास्थळावरून पसार झाले. दोघेही दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. खून केल्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या उसाच्या फडात आश्रय घेतला होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली आणि दोघांनाही ताब्यात घेतले.

या प्रकरणातील मुख्य संशयित मनोज हिम्मतराव कोळेकर (वय ३०, रा. कंठी) याच्यासह त्याच्या साथीदाराची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. राजाक्का यांनी भेटण्यास नकार दिल्याने, फोनला प्रतिसाद न दिल्याने तसेच त्या अन्य कोणाशी सलगी ठेवत असल्याच्या संशयातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले आणि जतचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास जत पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *