सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहा जागा जिंकून काँग्रेसला उभारी मिळाली. मात्र शिराळा, वाळवा, खानापूर, आटपाडी, तासगाव आणि कवठेमहांकाळमध्ये पक्षविस्ताराचे मोठे आव्हान कायम आहे.
सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेस पक्षाला सांगली जिल्ह्यात नव्याने उभारी मिळाली आहे. मात्र, या यशाचे रूपांतर जिल्हाभरातील संघटनात्मक ताकदीत करण्याचे मोठे आव्हान पक्ष नेतृत्वासमोर आहे. पलूस, कडेगाव, जत आणि मिरज या चार तालुक्यांत पक्षाला अनुकूल राजकीय परिस्थिती असली, तरी शिराळा, वाळवा, खानापूर, आटपाडी, तासगाव आणि कवठेमहांकाळ या सहा तालुक्यांत काँग्रेसची संघटनात्मक ताकद मर्यादित आहे. त्यामुळे चार तालुक्यांतील प्रभावावर समाधान न मानता उर्वरित भागात पक्षविस्तारासाठी ठोस रणनीती आखण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहा जागा जिंकत काँग्रेसने जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले. आमदार डॉ. विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने हे यश मिळवले. या निकालामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असला, तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची खरी ताकद उर्वरित सहा तालुक्यांतूनच तपासली जाणार आहे.
चार तालुक्यांत प्रभाव, सहा तालुक्यांत मर्यादित अस्तित्व
पलूस आणि कडेगाव तालुक्यांत आमदार डॉ. विश्वजित कदम यांची मजबूत राजकीय पकड आहे. जत तालुक्यात माजी आमदार विक्रम सावंत यांनी काँग्रेसचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तर मिरज तालुक्यात खासदार विशाल पाटील यांचा पूर्व आणि पश्चिम भागात प्रभाव आहे. या चार तालुक्यांत काँग्रेसला तुलनेने अनुकूल वातावरण आहे. मात्र, या प्रभावाच्या पलीकडे पक्षाची संघटनात्मक व्याप्ती वाढविण्यात नेतृत्वाला अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही.
एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या वाळवा, शिराळा, खानापूर, आटपाडी, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांत पक्षाची पीछेहाट झाली आहे. काही ठिकाणी सक्षम स्थानिक कार्यकर्ते आणि तुल्यबळ उमेदवार असले, तरी त्यांना पक्षाकडून किती पाठबळ मिळणार, याबाबत संभ्रम आहे. स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची तयारी होणार की आघाडीच्या राजकारणात या भागांकडे पुन्हा दुर्लक्ष होणार, हा प्रश्न कार्यकर्त्यांना सतावत आहे.
स्थानिक नेतृत्वाला ताकद देण्याची गरज
वाळवा तालुक्यात बोरगावचे सरपंच जितेंद्र पाटील यांच्यासारखे काही कार्यकर्ते काँग्रेसची बाजू सक्षमपणे मांडताना दिसतात. मात्र, त्यांना पक्षाकडून अपेक्षित राजकीय पाठबळ मिळत नसल्याची भावना स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आहे. स्थानिक नेतृत्वाला पुढे आणून संघटन मजबूत करण्याऐवजी अनेकांना स्वतःच्या ताकदीवर राजकीय लढाई लढावी लागत आहे.
तासगाव तालुक्यात येळावी गटात अमित पाटील यांनी काँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. मात्र, एका गटापुरते मर्यादित न राहता संपूर्ण तालुक्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी सक्षम नेतृत्व आणि संघटनात्मक पाठबळ आवश्यक आहे. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांत दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या राजकीय प्रभावामुळे काँग्रे-सला अनेकदा दुय्यम भूमिका घ्यावी लागली. राष्ट्रवादी काँग्रे-सच्या प्रभावाखाली राहिल्याने या दोन्ही तालुक्यांत काँग्रेसची स्वतंत्र राजकीय वाढ मर्यादित राहिली.
हेदेखील वाचा: मिरज ग्रामीण पोलिसांनी शोधले 4.35 लाखांचे 20 गहाळ मोबाईल; नागरिकांना परत
नेतृत्वाच्या पोकळीचा फटका
शिराळा तालुक्यात सत्यजित देशमुख यांनी काँग्रे-स सोडल्यानंतर प्रभावी नेतृत्वाची उणीव निर्माण झाली. खानापूर तालुक्यात माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी पक्ष सोडल्यानंतर संघटनात्मक पातळीवर नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. त्याचप्रमाणे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या काँग्रेस सोडण्याचाही कवठेमहांकाळ आणि तासगाव परिसरातील पक्षीय ताकदीवर परिणाम झाला.
या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात विरोधी पक्षांची एकत्रित ताकद उभी करताना काँग्रेसला स्वतःचे स्वतंत्र संघटनही मजबूत करण्याची संधी आहे. मात्र, त्यासाठी केवळ निवडणुकीच्या काळात सक्रिय होण्यापेक्षा सातत्याने कार्यकर्त्यांशी संपर्क आणि स्थानिक प्रश्नांवर संघर्ष करण्याची आवश्यकता आहे.
जिल्हा बँकेच्या यशाचे संघटनात्मक बळात रूपांतर होणार?
जिल्हा बँकेतील यशामुळे काँग्रे-ससमोर पक्षविस्ताराची नवी संधी निर्माण झाली आहे. या संधीचा उपयोग करून उर्वरित सहा तालुक्यांत स्थानिक नेतृत्वाला बळ देणे, तरुण कार्यकर्त्यांना संघटनेत पदे आणि जबाबदाऱ्या देणे, संघटनात्मक फेरबदल करणे आणि जनतेच्या प्रश्नांवर आंदोलने उभारणे आवश्यक आहे.
जिल्हा बँकेतील यश हे काँग्रे-ससाठी निश्चितच उत्साहवर्धक असले, तरी त्यावरच समाधान मानून चालणार नाही. चार तालुक्यांतील राजकीय प्रभाव टिकवतानाच उर्वरित सहा तालुक्यांत पक्षाला नव्याने उभे करण्याची जबाबदारी नेतृत्वावर आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मिळालेली ताकद प्रत्यक्ष राजकीय विस्तारात कितपत उतरते, यावरच सांगली जिल्ह्यातील काँग्रे-सचे आगामी राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे.
