सांगलीत 52 वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा

सांगलीत २५ ते २९ ऑक्टोबरदरम्यान ५२ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा २०२६ होणार. सहा पोलिस दलांतील ९०२ खेळाडू १९ क्रीडा प्रकारांत सहभागी होणार.

सांगली : सांगली जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ५२ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. सांगली पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या ‘शहीद अशोक कामटे क्रीडा नगरी’त २५ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. कोल्हापूर परिक्षेत्रातील सहा पोलिस दलांतील एकूण ९०२ अधिकारी व अंमलदार या स्पर्धेत सहभागी होणार असून, विविध क्रीडा प्रकारांत खेळाडूंचे कौशल्य पणाला लागणार आहे.

स्पर्धेमध्ये ६६६ पुरुष आणि २३६ महिला खेळाडूंचा समावेश आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण या पोलिस दलांतील खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत आपले कौशल्य दाखवणार आहेत. स्पर्धेचा शुभंकर म्हणून ‘सेनापती’ या वाघाची निवड करण्यात आली आहे.

१९ क्रीडा प्रकारांत रंगणार सामने

या स्पर्धेत अॅथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, हँडबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कबड्डी, वेटलिफ्टिंग, यू-शू, पॉवरलिफ्टिंग, बॉडी बिल्डिंग, कुस्ती, ज्युदो, तायक्वांदो, जलतरण, बॉक्सिंग आणि क्रॉस कंट्री अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. स्पर्धेतील सामने आणि संबंधित उपक्रम सांगली पोलिस मुख्यालय, सांगली क्रीडा संकुल, दिग्विजय व्यायाम संस्था तसेच इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी जलतरण तलाव येथे आयोजित करण्यात येणार आहेत.

स्पर्धांचे नियोजन आणि सामने सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील १५० उत्कृष्ट पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धा दररोज सकाळी ६.३० ते रात्री १० वाजेपर्यंत चालणार आहेत.

सांगलीत 52 वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा

उत्कृष्ट खेळाडूंना विशेष बक्षिसे

अॅथलेटिक्स प्रकारातील उत्कृष्ट पुरुष खेळाडूला होंडा कंपनीची ‘पॅशन’ मोटारसायकल, तर उत्कृष्ट महिला खेळाडूला अँथर कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. त्यामुळे विविध क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे.

हेदेखील वाचा: सांगली जिल्हा बँक निवडणूक : 15 जागा बिनविरोध; घराणेशाही आणि राजकीय समीकरणांची चर्चा

२९ ऑक्टोबरला समारोप

या क्रीडा स्पर्धेचा समारोप २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाज खेळाडू तेजस्विनी सावंत या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी विविध जिल्ह्यांतील वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पोलिस दलातील अधिकारी आणि अंमलदार यांच्या शारीरिक तंदुरुस्तीला चालना देणे, क्रीडागुणांना वाव देणे आणि विविध जिल्ह्यांतील पोलिस दलांमध्ये क्रीडाभावना व परस्पर समन्वय वाढविणे, या दृष्टीने या स्पर्धेला महत्त्व आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *