कामेरीत पाच घरफोड्या उघड

सांगली जिल्ह्यातील कामेरी येथे एकाच रात्री पाच घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. प्रविण शिंदेला अटक; १०.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांचा शोध सुरू.

सांगली : वाळवा तालुक्यातील कामेरी येथे एकाच रात्री पाच बंद घरांचे कडी-कोयंडे उचकटून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आणि ईश्वरपूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात प्रविण राजा शिंदे (वय ३५, रा. गणेशवाडी रोड, वडूज, ता. खटाव) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून दोन लोखंडी कटावण्या, रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १० लाख ६७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचे दोन साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान पाच घरफोड्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा ते पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कामेरी येथील पाच घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. संतोष खाशेराव परीट, बाबू नानाभाऊ आंधळे, विजय बाजीराव पाटील, उज्ज्वला गजानन जाधव आणि सारिका राजेंद्र सोनावले यांच्या घरांचे दरवाजे आणि कडी-कोयंडे उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी व लाकडी कपाटांमधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एकाच रात्रीत पाच घरफोड्या झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि ईश्वरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे संयुक्त पथक तयार करण्यात आले.

कामेरीत पाच घरफोड्या उघड

पाचवा मैल चौकात संशयिताला पकडले

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी ईश्वरपूर व तासगाव विभागात गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. १२ ऑक्टोबर रोजी पाचवा मैल चौक परिसरात असताना पथकाला एका संशयिताची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी प्रविण शिंदे याला ताब्यात घेतले.

त्याच्या पाठीवरील सॅकमध्ये दोन लोखंडी कटावण्या, रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने आढळले. या मुद्देमालाची एकूण किंमत १० लाख ६७ हजार ५५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीदरम्यान शिंदे याने आपल्या अन्य दोन साथीदारांसह कामेरी येथे पाच बंद घरांमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेसनोटमध्ये नमूद आहे.

हेदेखील वाचा: सांगलीत 20 कोटींचा ‘उमेद मॉल’ उभारणार; 20 हजारांहून अधिक महिला बचत गटांना मिळणार हक्काची बाजारपेठ!

१५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती

या प्रकरणातील प्रविण शिंदे याच्यासह त्याचे साथीदार सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यांच्याविरुद्ध सातारा आणि सांगली जिल्ह्यांत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि चोरीसारखे १५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या गुन्ह्यात आर्यन कान्हा काळे आणि अजय लायन्या शिंदे (दोघेही रा. फडतरवाडी, ता. खटाव, जि. सातारा) हे संशयित साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक प्रयत्नशील आहे.

१६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

अटक करण्यात आलेला आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी ईश्वरपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, पुढील तपासासाठी १६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या संयुक्त कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, ईश्वरपूर पोलीस ठाणे आणि सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *