प्रमोद वाघमोडे यांच्या ‘तळातलं गाळातलं’

तिसऱ्या ग्रामीण मराठी सांगली जिल्हा साहित्य संमेलनात प्रा. प्रमोद वाघमोडे यांच्या ‘तळातलं गाळातलं’ या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन झाले. जतचे समाजसेवक विक्रमभैया ढोणे यांच्या कार्यावरही लेखाचा समावेश.

मिरज : बिसूर (ता. मिरज) येथे आयोजित तिसऱ्या ग्रामीण मराठी सांगली जिल्हा साहित्य संमेलन २०२६ च्या साहित्यनगरीत प्रा. प्रमोद धोंडीराम वाघमोडे यांच्या ‘तळातलं गाळातलं’ या दुसऱ्या ललित लेखसंग्रहाचे उत्साहपूर्ण वातावरणात प्रकाशन करण्यात आले. साहित्यिक, लेखक, कवी आणि साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा प्रा. वाघमोडे यांच्या साहित्यिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरला.

मायाक्का बिरुदेव चॅरिटेबल ट्रस्ट, बिसूर यांच्या वतीने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रकाशन सोहळ्यास संमेलनाध्यक्ष डॉ. मुरहरी सोपानराव केळे, स्वागताध्यक्ष व्यंकट भानुदास पाटील, आयोजक आनंदा शंकर टकले, महाराणी अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचे चेअरमन आर. एस. चोपडे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. अविनाश सप्रे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

प्रा. प्रमोद वाघमोडे यांचे यापूर्वी ‘शिक्षण यात्री’ हे पहिले पुस्तक प्रकाशित झाले आहे. गुरुवर्य दिलीपराव वाघमोडे यांच्या जीवनकार्यावर आधारित या पुस्तकातून त्यांनी आपल्या गुरूंचा प्रेरणादायी जीवनप्रवास वाचकांसमोर मांडला होता. आता ‘तळातलं गाळातलं’ या ललित लेखसंग्रहातून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मानवी जीवनातील विविध पैलूंचे संवेदनशील चित्रण केले आहे.

प्रमोद वाघमोडे यांच्या ‘तळातलं गाळातलं’

या संग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जतचे सुपुत्र आणि समाजसेवक विक्रमभैया ढोणे यांच्या जीवनकार्यावर आणि सामाजिक योगदानावर आधारित लेखाचा त्यात समावेश आहे. समाजहितासाठी त्यांनी केलेले कार्य, सामाजिक बांधिलकी आणि लोकाभिमुख कार्याचा प्रवास लेखकाने शब्दबद्ध केला आहे. समाजासाठी निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची ओळख नव्या पिढीला व्हावी आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, हा या लेखामागील उद्देश आहे.

हेदेखील वाचा : मिरज ग्रामीण पोलिसांची शेळी-बोकड चोरट्यांवर कारवाई; 5 गुन्हे उघड, 2 आरोपी अटकेत

या प्रकाशन सोहळ्याचा विशेष भावनिक पैलू म्हणजे प्रा. वाघमोडे यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रेरणास्थान असलेले गुरुवर्य दिलीपराव वाघमोडे सर आणि सुवर्णा वाघमोडे मॅडम यांची उपस्थिती. आपल्या गुरुवर्यांच्या उपस्थितीत दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन होणे, हा लेखकासाठी आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण ठरला.

शिक्षण, क्रीडा, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रा. वाघमोडे यांनी लेखनाच्या माध्यमातून सामान्य माणसाचे जगणे, समाजातील वास्तव, संघर्ष आणि विविध अनुभवांना अभिव्यक्ती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या लेखनातून सामाजिक जाणिवा आणि मानवी संवेदनशीलतेचे दर्शन घडते.

या पुस्तक प्रकाशनानिमित्त उपस्थित मान्यवरांनी प्रा. प्रमोद वाघमोडे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ‘शिक्षण यात्री’पासून ‘तळातलं गाळातलं’पर्यंतचा त्यांचा प्रवास हा गुरुवर्यांच्या प्रेरणेतून समाजजीवनातील वास्तवाचा वेध घेणाऱ्या संवेदनशील लेखकाची साहित्यिक वाटचाल अधोरेखित करणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *